क्रीडा (९ ते १०)
१९५० ते २०००
१९५० ते २००० या काळातल्या महाराष्ट्राच्या क्रिकेटचा विचार करताना, महाराष्ट्राला एकसंध भौगोलिक घटक म्हणून पाहणं योग्य ठरत नाही. या काळात भारतातल्या बहुतेक राज्यांमध्ये क्रिकेटचं प्रशासन एकाच प्रादेशिक संघटनेमार्फत चालत होतं. परंतु महाराष्ट्रात मात्र परिस्थिती वेगळी होती. इथे क्रिकेटचा कारभार तीन स्वतंत्र संघटनांमध्ये विभागलेला होता — ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’, ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’ आणि ‘विदर्भ क्रिकेट असोसिएशन’. त्यामुळे राज्यातील क्रिकेटची घडण ही एकसंध न राहता तीन प्रवाहांत होती.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचं अधिकारक्षेत्र मुंबई शहर, उपनगरं, ठाणे आणि पालघर जिल्हा तसंच नवी मुंबईपर्यंत विस्तारलेलं होतं. १९५३ साली महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची औपचारिक स्थापना झाली आणि तिचं मुख्यालय पुण्यात ठेवण्यात आलं. मुंबई आणि पूर्वेकडील विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्राचा विस्तीर्ण प्रदेश या संघटनेच्या अखत्यारीत येत होता. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण या विभागांचा समावेश होता. तिसरी संस्था म्हणजे विदर्भ क्रिकेट असोसिएशन. ही संघटना राज्याच्या पूर्वेकडील विदर्भ प्रदेशाचं प्रतिनिधित्व करत होती. हा भाग पूर्वी ‘सेंट्रल प्रोव्हिन्स अँड बेरार’ म्हणून ओळखला जात असे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं (बीसीसीआय) मुख्यालय मुंबईत असल्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनला भारतीय क्रिकेटच्या प्रशासकीय कार्यात स्पष्ट वर्चस्व लाभलं होतं. याउलट, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला मुंबईसारख्या बलाढ्य शेजाऱ्याच्या छायेत काम करावं लागत होतं. प्रायोजकत्व आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागत होता. ग्रामीण आणि निमशहरी भागांतून प्रतिभावान खेळाडू शोधण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागत होते. विदर्भ क्रिकेट असोसिएशनची परिस्थितीही वेगळी नव्हती. कॉर्पोरेट आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे त्यांच्या विकासाचा वेग संथ राहिला.
राष्ट्रीय क्रिकेट
मुंबई क्रिकेटचं वर्चस्व केवळ भारतीय क्रिकेटच्या प्रशासकीय पातळीपुरतं मर्यादित नव्हतं, तर प्रत्यक्ष खेळातही त्यांची पकड निर्विवाद होती. मुंबईच्या खेळाडूंच्या खेळात एक ठळक वैशिष्ट्य दिसून येत असे. आपली विकेट सहजासहजी न देणं, चिकाटीनं आणि हट्टीपणानं फलंदाजी करणं, तसंच प्रतिस्पर्ध्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकवण्याची वृत्ती त्यांच्यात होती. ही वृत्ती मुंबईच्या अत्यंत गर्दीच्या स्पर्धात्मक वातावरणातून घडली होती. संघात स्थान टिकवण्यासाठी प्रत्येक खेळी महत्त्वाची असते, ही जाणीव खेळाडूंमध्ये खोलवर रुजलेली होती. त्यामुळे संयम, सातत्य आणि लढाऊ वृत्ती ही मुंबईच्या क्रिकेट संस्कृतीची ओळख बनली.
भारतातल्या स्थानिक क्रिकेटमध्ये प्रथम श्रेणी पातळीवरची सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणजे ‘रणजी करंडक’ होय. या स्पर्धेला भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, नवानगरचे महाराज कुमार श्री रणजितसिंहजी (‘रणजी’) यांच्या स्मरणार्थ ‘रणजी करंडक’ असं नाव दिलं. या काळात रणजी करंडक स्पर्धेत संघांची विभागणी प्रामुख्यानं उत्तर, पश्चिम, पूर्व, मध्य आणि दक्षिण अशा भौगोलिक झोननुसार केली जात होती. प्रत्येक झोनमधले पहिले तीन संघ (सुरुवातीच्या काळात दोन संघ) पुढे नॉक-आऊट फेरीत अंतिम विजेतेपदासाठी खेळत.
१९५० ते १९७० हा काळ भारतीय क्रिकेटमध्ये ‘मुंबईचं सुवर्णयुग’ म्हणून ओळखला जातो. या दोन दशकांत मुंबई (तत्कालीन बॉम्बे) संघानं रणजी करंडक स्पर्धेवर अक्षरशः एकछत्री वर्चस्व गाजवलं. विशेषतः १९५८–५९ ते १९७२–७३ या काळात सलग १५ वेळा विजेतेपद जिंकण्याचा त्यांनी आजही अभेद्य असलेला विक्रम केला. १९७० ते १९९० हा कालखंड मात्र भारतीय क्रिकेटसाठी मोठ्या बदलांचा काळ ठरला. या काळात रणजी करंडक स्पर्धेमध्ये मुंबईचं दीर्घकाळ टिकलेलं वर्चस्व हळूहळू कमी झालं आणि इतर राज्यांचे संघ ताकदीनं पुढे आले.
१९९० ते २००० हे दशक भारतीय क्रिकेट आणि रणजी करंडक स्पर्धेसाठी बदलाचं आणि अत्यंत चुरशीचं ठरलं. या काळात मुंबईनं पुनरागमन करत १९९४ ते १९९७ दरम्यान तीन वेळा विजेतेपद जिंकून आपली ताकद पुन्हा सिद्ध केली. हे दशक सचिन तेंडुलकर या महान फलंदाजाच्या उदयाचं होतं. एकूणच, हे दशक ‘मुंबई विरुद्ध उर्वरित भारत’ अशा संघर्षाचं ठरलं.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा १९५० ते २००० हा कालखंड पायाभरणी, संघर्ष आणि अधूनमधून झळकलेल्या यशाचा प्रवास म्हणून पाहावा लागतो. पुण्याचं नेहरू स्टेडियम या काळात महाराष्ट्राच्या क्रिकेटचं प्रमुख केंद्र बनलं. चंदू बोर्डे यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या नेतृत्वामुळे ७० च्या दशकात संघानं उभारी घेतली आणि पश्चिम विभागातून अनेकदा बाद फेरी गाठली. १९७० ते १९९० दरम्यान महाराष्ट्रानं चंदू बोर्डे यांच्या व्यतिरिक्त बापू नाडकर्णी, यजुवेंद्र सिंग (मुळचे सौराष्ट्र राज्याचे, परंतु ते महाराष्ट्रासाठी अनेक वर्षे खेळले), चेतन चौहान, हेमंत कानिटकर, वसंत रांजणे, आणि यशवंत सिधये यांसारखे दर्जेदार खेळाडू भारतीय क्रिकेटला दिले. महाराष्ट्रानं या काळात रणजी करंडक जिंकला नाही परंतु १९७०-७१ आणि १९९२–९३ मध्ये संघानं रणजी करंडक सामन्याच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या अर्धशतकात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननं पुणे, नाशिक आणि औरंगाबाद यांसारख्या शहरांत क्रिकेटचा प्रसार केला आणि ग्रामीण भागातून प्रतिभावान खेळाडू शोधण्यावर भर दिला. एकूणच, या काळात महाराष्ट्र संघानं रणजी करंडक जिंकला नसला, तरी मुंबईसारख्या बलाढ्य संघाला सातत्यानं कडवे आव्हान देत आपली वेगळी ओळख निर्माण केली.
१९५० ते २००० या काळात विदर्भ क्रिकेट असोसिएशनचा प्रवास प्रामुख्यानं उमेदीचा आणि संघर्षाचा होता. स्वातंत्र्योत्तर काळात विदर्भ संघ रणजी करंडक स्पर्धेमध्ये मध्य विभागातून खेळत होता. या विभागातल्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांसारख्या बलाढ्य संघांमुळे त्यांना पुढे जाणं कठीण ठरत असे. १९७० आणि ८० च्या दशकात विदर्भानं हळूहळू आपली ओळख निर्माण केली आणि बाद फेरी गाठत मोठ्या संघांना धक्का दिला. या काळात सुधीर साहू, सुहास फडकर, प्रशांत वैद्य, प्रवीण हिंगणीकर यांसारखे खेळाडू पुढे आले आणि विदर्भाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. एकूणच, या अर्धशतकात विदर्भानं रणजी करंडक जिंकला नसली, तरी ‘लढाऊ संघ’ म्हणून आपली ओळख निर्माण केली आणि पुढील काळातील यशाचा भक्कम पाया घातला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
१९५० आणि ६० च्या दशकात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाची फलंदाजी मोठ्या प्रमाणावर मुंबईच्या पॉली उम्रीगर, विजय मांजरेकर आणि महाराष्ट्राच्या चंदू बोर्डे यांच्यावर अवलंबून होती, तर फिरकी गोलंदाजीमध्ये मुंबईचे सुभाष गुप्ते यांनी जागतिक दर्जाची कामगिरी केली.
पॉली उम्रीगर (१९२६–२००६) हे एक भक्कम आणि अष्टपैलू खेळाडू होते. १९४८ ते १९६२ या कालावधीत त्यांनी ५९ कसोटी सामन्यांत ३,६३१ धावा केल्या आणि ३५ बळी घेतले. त्यांची सर्वोच्च खेळी २२३ धावांची होती. १९५५ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारे ते पहिले भारतीय फलंदाज ठरले.
विजय मांजरेकर (१९३१–१९८३) हे भारतीय क्रिकेटमधले तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण फलंदाज म्हणून ओळखले जातात. १९५१ ते १९६५ या कालावधीत त्यांनी ५५ कसोटी सामन्यांत ३,२०८ धावा केल्या. त्यांची सर्वोच्च खेळी १९६१–६२ मध्ये दिल्ली इथे इंग्लंडविरुद्ध केलेल्या १८९ धावांची होती.
मुंबईच्या या फलंदाजांना महाराष्ट्राच्या चंदू बोर्डे यांनी भक्कम साथ दिली. चंदू बोर्डे हे भारतीय क्रिकेटमधले एक उत्कृष्ट अष्टपैलू म्हणून ओळखले जातात. १९५८ ते १९६९ या कालावधीत त्यांनी ५५ कसोटी सामन्यांत ३,०६१ धावा केल्या आणि ५२ बळी घेतले. त्यांची सर्वोच्च खेळी १७७ अशी होती.
सुभाष गुप्ते (१९२९–२००२) हे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातले सर्वोत्तम लेग स्पिनरपैकी एक मानले जातात. १९५१ ते १९६१ या कालावधीत त्यांनी ३६ कसोटी सामन्यांत १४९ बळी घेतले. १९५८ मध्ये कानपूर इथे वेस्ट इंडिजविरुद्ध घेतलेले ९/१०२ हे त्यांचं सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन आजही क्रिकेट इतिहासातली उल्लेखनीय कामगिरी मानली जाते.
१९७१ हे वर्ष भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला एक महत्वाचा टप्पा ठरला आणि या यशामागे मुंबईच्या खेळाडूंचा मोठा वाटा होता. अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतानं वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत इतिहास घडवला. वेस्ट इंडिज दौऱ्यात मुंबईचे अजित वाडेकर, दिलीप सरदेसाई, अशोक मंकड, एकनाथ सोलकर आणि नव्यानं पदार्पण करणारे सुनील गावस्कर या खेळाडूंनी संघाचा कणा तयार केला. अजित वाडेकर (१९४१–२०१८) हे भारतीय क्रिकेटमधले एक उत्कृष्ट फलंदाज आणि दूरदृष्टी असलेले कर्णधार म्हणून ओळखले जातात. १९६६ ते १९७४ या कालावधीत त्यांनी ३७ कसोटी सामन्यांत २,११३ धावा केल्या. १४३ धावा ही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. मात्र त्यांचं सर्वात मोठं योगदान कर्णधार म्हणून राहिलं.
१९७० च्या दशकात केरी पॅकर यांच्या वर्ल्ड सिरीज क्रिकेटमुळे एक दिवसीय क्रिकेटची सुरुवात झाली. पुढील दोन दशकात एकदिवसीय क्रिकेटनं वेगवान, रंगतदार आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असा नवा चेहरा प्राप्त केला. डे-नाईट सामने, प्रकाशझोतातील खेळ, रंगीत कपडे, पांढरा चेंडू आणि क्षेत्ररक्षणावरील निर्बंध यांसारख्या बदलांमुळे क्रिकेट अधिक आक्रमक आणि गतिमान बनलं. फलंदाजांकडून स्फोटक फटकेबाजी, क्षेत्ररक्षणातील चपळता आणि शेवटच्या काही षटकांतील योजनाबद्ध गोलंदाजी हे या नव्या क्रिकेटचं वैशिष्ट्य ठरलं. दूरचित्रवाणीवरील प्रसारण, प्रायोजकत्व व जाहिरातींच्या वाढत्या प्रभावामुळे एकदिवसीय क्रिकेट प्रचंड लोकप्रिय झालं.
१९८० च्या दशक भारतीय क्रिकेटसाठी सुवर्णकाळ ठरला. मुंबईचे सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, संदीप पाटील आणि बलविंदर संधू या खेळाडूंनी याही काळात संघामधलं मुंबईचं वर्चस्व कायम ठेवलं.
सुनील गावस्कर हे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील महान फलंदाजांपैकी एक मानले जातात. १९७१ ते १९८७ या कालावधीत त्यांनी १२५ कसोटी सामन्यांत १०,१२२ धावा केल्या. त्यांची सर्वोच्च खेळी २३६ अशी होती. ते कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावांचा टप्पा ओलांडणारे पहिले फलंदाज ठरले आणि आपल्या नावावर ३४ शतकांची नोंद केली. सुनील गावस्कर यांना १९७५ मध्ये 'अर्जुन पुरस्कार' देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
दिलीप वेंगसरकर (११६ सामन्यात ६८६८ धाव), रवी शास्त्री (८० सामन्यात ३८३० धाव) आणि संदीप पाटील हे १९८० च्या दशकात भारतीय क्रिकेटच्या मधल्या फळीचे आणि संघरचनेचे महत्त्वाचे आधारस्तंभ होते तर बलविंदर संधू आणि कर्सन घावरी हे भारतीय क्रिकेटमधील अत्यंत प्रभावी मध्यमगती स्विंग गोलंदाज म्हणून ओळखले जात.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ‘क्रिकेट वर्ल्ड कप १९८३’ आणि १९८५ ची वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेट या दोन स्पर्धा सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेल्या आहेत. या दोन्ही विजयांमध्ये मुंबईच्या क्रिकेट संस्कृतीचा मोलाचा वाटा होता.
१९८३ च्या विश्वचषकात कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतानं अंतिम फेरीत लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर वेस्ट इंडिजचा ४३ धावांनी पराभव करून जगज्जेतेपदाचा बहुमान पटकावला. विजेत्या संघात सुनील गावसकर, संदीप पाटील, बलविंदर संधू, रवी शास्त्री आणि दिलीप वेंगसरकर असे पाच खेळाडू मुंबईचे होते. संदीप पाटील आणि बलविंदर संधू यांची कामगिरी वाखाणण्यासारखी होती.
१९८५ च्या एकदिवसीय वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मेलबॉर्न इथे अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून भारतीय संघ विजेता ठरला. या सामन्यात तर मुंबईच्या खेळाडूंचा प्रभाव अधिक ठळकपणे दिसून आला. सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली भारतानं एकही सामना न गमावता ही स्पर्धा जिंकली. रवी शास्त्री यांनी अष्टपैलू कामगिरी करत ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ हा किताब पटकावला, तर दिलीप वेंगसरकर यांनी मधल्या फळीत संयमी फलंदाजी करत मोलाची भूमिका बजावली.
१९८० च्या दशकातील दिग्गज खेळाडू निवृत्त झाल्यानंतर १९९० च्या दशकात मुंबई–महाराष्ट्र–विदर्भ या परिसरातून नव्या पिढीचा उदय झाला आणि त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाची धुरा समर्थपणे सांभाळली. नोव्हेंबर १९९३ मध्ये झालेल्या हिरो कप स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत वेस्टइंडीजचा पराभव करून विजेतेपद मिळवलं. विनोद कांबळी यांनी अंतिम सामन्यात ६८ धावा करून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. शारजा इथे झालेल्या १९९५ च्या आशिया कपमध्ये श्रीलंकेला हरवून भारतानं विजेतेपद मिळवलं. मुंबईचा फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्या निर्णायक कामगिरीनं भारताच्या यशात हातभार लावला.
१९९० च्या दशकात सचिन तेंडुलकर यांचा झालेला उदय हा भारतीय क्रीडा इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. आपल्या अप्रतिम फलंदाजीने, सातत्यपूर्ण कामगिरीने आणि संयमी स्वभावाने सचिनने केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण क्रिकेटविश्वात एक वेगळी छाप निर्माण केली. २००० नंतरही सचिनची कामगिरी तितकीच प्रभावी राहिली. सचिनच्या यशाचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना अनेक सन्मान प्रदान केले. १९९४ मध्ये अर्जुन पुरस्कार, २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. अखेर २०१३ मध्ये क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर भारत सरकारने त्यांना “भारतरत्न” हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला.
महिला क्रिकेट
याच काळात महिला क्रिकेटचाही प्रवास आकार घेत होता. १९५० ते २००० या कालखंडात भारतातील महिलांच्या क्रिकेटचा प्रवास हा जिद्दीचा आणि सातत्याचा प्रवास होता. सुरुवातीला हा खेळ औपचारिक नव्हता. १९५० आणि ६० च्या दशकात काही ठिकाणी सामने होत असत, पण त्यांची नोंद ठेवली जात नव्हती. खेळाची आवड होती, पण रचना नव्हती. परिस्थिती कठीण होती, तरीही या खेळाची बीजे रुजत होती.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर अनौपचारिकरित्या महिला क्रिकेट सामने अस्तित्वात आले. परंतु त्याला औपचारिक रूप आलं ते ७०च्या दशकात. १९७३ साली महिला क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली आणि महिला क्रिकेटला पहिल्यांदा संघटित रूप मिळालं. यानंतर देशभरात महिला क्रिकेट स्पर्धा आयोजित होऊ लागल्या. या संपूर्ण प्रक्रियेत मुंबई–महाराष्ट्र–विदर्भ हा पट्टा विशेष पुढे होता. या भागाने महिला क्रिकेटच्या विकासात मोठी भूमिका बजावली.
मुंबईतील डायना एदलजी यांसारख्या खेळाडूंनी केवळ उत्कृष्ट कामगिरीच केली नाही, तर महिला क्रिकेटला मान्यता मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले. त्यांच्या कार्याचा गौरव करत भारत सरकारनं त्यांना अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री यांनी सन्मानित केलं. त्यांनी सुविधांसाठी आवाज उठवला. त्यामुळे पुढील पिढ्यांसाठी मार्ग मोकळा झाला. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या शुभांगी कुलकर्णी लेग स्पिनर गोलंदाज म्हणून नावारूपाला आल्या. त्यांनी प्रशासकीय पातळीवरही मोठं योगदान दिलं. त्यामुळे खेळाच्या विकासाला दिशा मिळाली. १९९० च्या दशकात मैथिली राज यांच्यासारख्या नव्या दमाच्या खेळाडूंचं आगमन झालं.
या पन्नास वर्षांच्या प्रवासाने भारतीय महिला क्रिकेटला भक्कम पाया दिला. त्यावरच पुढील यशाची इमारत उभी राहिली.
समारोप
१९९६ च्या टायटन कप या एकदिवसीय त्रिकोणी स्पर्धेमध्ये सचिन तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली भारतानं विजय मिळवला. अंतिम सामन्यात त्यांनी ६७ धावा करत संघाला यश मिळवून दिलं आणि संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या. १९८९ मध्ये पदार्पण केलेल्या तेंडुलकर यांनी १९९० च्या दशकात जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवलं. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि सुरेख फलंदाजीमुळे ते त्या काळातील सर्वोत्तम फलंदाज ठरले. जगातील अव्वल गोलंदाजांविरुद्ध देशांतर्गत आणि परदेशी खेळपट्ट्यांवरही त्यांनी उच्च सरासरी राखत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
१९५० ते २००० या अर्धशतकात क्रिकेटनं केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणून आपली ओळख निर्माण केली. किंबहुना क्रिकेट हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनला, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. शहरांपासून खेड्यापर्यंत, शाळांपासून सार्वजनिक मैदानांपर्यंत क्रिकेटचा प्रभाव सर्वत्र दिसून येऊ लागला.
१९७१ मध्ये भारतानं वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये मिळवलेले कसोटी मालिकाविजय, १९८३ मध्ये क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून मिळवलेला विश्वविजय, तसेच १९८५ मध्ये ऑस्ट्रेलियात जिंकलेली ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेट’ हे भारताच्या क्रिकेटच्या इतिहासात अतिशय महत्वाचे टप्पे ठरले. या विजयांनी भारतीय क्रिकेटला आत्मविश्वास दिला आणि जनमानसात अभिमानाची भावना निर्माण केली.
१९९० च्या दशकात सचिन तेंडुलकर यांच्या उदयानंतर क्रिकेटची लोकप्रियता अधिकच वाढली. त्यांच्या फलंदाजीने नव्या पिढीला अक्षरशः मंत्रमुग्ध केलं. दूरदर्शनवरचं सामन्यांचं थेट प्रक्षेपण, रेडिओवरचं समालोचन आणि वृत्तपत्रातलं सविस्तर वार्तांकन यामुळे क्रिकेट घराघरांत पोहोचलं.
या सर्व प्रक्रियेत मुंबई, महाराष्ट्र आणि विदर्भ या भागातील खेळाडूंनी दिलेलं योगदान अत्यंत महत्त्वाचं ठरलं. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताचं नाव उज्ज्वल केलं.
एकूणच, या पन्नास वर्षांच्या प्रवासात क्रिकेट हा केवळ एक खेळ राहिला नाही; तो एक भावना, एक ओळख आणि सांस्कृतिक एकात्मतेचा धागा बनला. आजही महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सामाजिक जीवनात क्रिकेटचं असलेलं स्थान हे या ऐतिहासिक वाटचालीचंच फलित आहे.