प्रकल्पाची पार्श्वभूमी
१९५० ते २००० हा पन्नास वर्षांचा कालखंड महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण आणि तेजस्वी पर्व मानला जातो. स्वातंत्र्यानंतर नव्या भारताच्या उभारणीचे मोठे आव्हान देशासमोर उभे होते. राजकीय स्वातंत्र्य मिळाले असले, तरी आर्थिक विषमता, सामाजिक मागासलेपण, निरक्षरता, गरिबी आणि सांस्कृतिक न्यूनगंड यांसारख्या अनेक समस्यांनी देशाला पोखरले होते. इंग्रजांच्या जवळपास दोनशे वर्षांच्या राजवटीने भारताचे केवळ आर्थिक शोषण केले नाही, तर देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनालाही पद्धतशीर आघात दिला. भारतीय समाजाची सांस्कृतिक परंपरा खच्ची करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. एवढ्या विशाल देशावर मूठभर इंग्रजांना राज्य करायचे असेल, तर येथील जनतेचा आत्मसन्मान आणि सांस्कृतिक अभिमान कमकुवत करणे आवश्यक आहे, या भूमिकेतून इंग्रजांनी शिक्षण, इतिहासलेखन, प्रशासन आणि सामाजिक धोरणे राबवली. परिणामी अनेक स्तरांवर समाजात न्यूनगंड निर्माण झाला.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात समाजसुधारक, विचारवंत, शिक्षणप्रेमी आणि स्वातंत्र्यसैनिक यांनी भारतीय समाजात नवचैतन्य निर्माण केले. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा अनेक नेत्यांनी समाजात आत्मभान जागवले. स्वातंत्र्यलढ्याने भारतीय जनतेत राष्ट्रीय एकात्मतेची आणि स्वाभिमानाची भावना निर्माण केली.
या सर्व प्रयत्नांचे फलित स्वातंत्र्यानंतरच्या काळात स्पष्टपणे दिसून आले. देश स्वतंत्र झाला तेव्हा आर्थिक दारिद्र्य, सामाजिक विषमता आणि विकासाचा अभाव अशी अनेक आव्हाने समोर होती. तरीही संपूर्ण देश नव्या आशा आणि नव्या ध्येयांनी प्रेरित होऊन राष्ट्राच्या पुनर्बांधणीसाठी सज्ज झाला होता. या राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या प्रक्रियेत महाराष्ट्राने अत्यंत प्रभावी, आणि दूरगामी प्रगती साधली. आर्थिक, औद्योगिक आणि कृषी क्षेत्रांत महाराष्ट्राने इतर अनेक राज्यांच्या तुलनेत उल्लेखनीय झेप घेतली. उद्योगधंद्यांचा विस्तार, शेतीतील बदल आणि शिक्षणाचा प्रसार यांमुळे महाराष्ट्र देशातील प्रगत राज्यांपैकी एक म्हणून पुढे आला. याचबरोबर रस्ते, धरणे, वीज प्रकल्प, सिंचन व्यवस्था, रेल्वे, दळणवळण आणि शहरी सुविधा अशा पायाभूत सुविधांमध्येही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी विकासाची नवी जाळी निर्माण झाली. या पायाभूत विकासामुळे उद्योग, व्यापार, शिक्षण आणि सामाजिक जीवनाला नवी गती मिळाली.
आर्थिक विकासाबरोबरच महाराष्ट्राने सांस्कृतिक क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली. महाराष्ट्राला असलेल्या पायाभूत सांस्कृतिक वारशाव्यतिरिक्त या सांस्कृतिक विकासाला दिशा देण्यात राज्य सरकारचा आणि विशेषतः यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर त्यांनी सांस्कृतिक विकासाकडे केवळ परंपरा म्हणून न पाहता, समाजनिर्मितीचे आणि राज्याच्या ओळखीचे एक प्रभावी माध्यम म्हणून पाहिले. त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी पद्धतशीर आखणी केली आणि अनेक महत्त्वाचे उपक्रम सुरू केले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारख्या विद्वान व्यक्तींवर जबाबदारी सोपवून मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांना संस्थात्मक आधार देण्याचे काम करण्यात आले. मराठी विश्वकोश निर्मितीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला. ज्ञान विविध विषयांतून मराठीत उपलब्ध व्हावे आणि मराठी भाषेला आधुनिक ज्ञानभाषेचे स्वरूप प्राप्त व्हावे, हा त्यामागचा उद्देश होता. याचबरोबर मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळ, भाषा संचालनालय आणि विविध सांस्कृतिक संस्थांच्या माध्यमातून साहित्यनिर्मिती, संशोधन, लोककला संवर्धन आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यात आली.
'मराठिका ' : महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाचे डिजिटल जतन
तंत्रज्ञानाच्या आणि इंटरनेटच्या या अतिवेगवान युगात माहितीचे विश्व अमर्याद झाले आहे; परंतु याच गतिमान प्रवाहात आपली नवी पिढी आपल्या मुळांपासून आणि समृद्ध परंपरेपासून दुरावू नये, हे एक मोठे आव्हान आहे. हीच बाब प्रकर्षाने लक्षात घेऊन, आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा, तसेच येथील सामाजिक व सांस्कृतिक विकासाचा गौरवशाली इतिहास काळाच्या ओघात हरवू नये, यासाठी 'मराठीका' हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि दूरगामी प्रकल्प आकारास आला आहे.
गेल्या काही दशकांमध्ये महाराष्ट्राने कला, साहित्य, समाजसुधारणा, लोकशाही मूल्ये आणि वैचारिक परिवर्तन या सर्वच क्षेत्रांत जी अभूतपूर्व आणि देदीप्यमान प्रगती केली आहे, त्याचे जतन करणे ही काळाची गरज आहे. हा अभिमानास्पद इतिहास केवळ ग्रंथांमध्ये किंवा कागदोपत्री बंदिस्त न राहता, तो आजच्या आणि उद्याच्या पिढीच्या हातातील 'स्क्रीन'वर डिजिटल स्वरूपात कायम जिवंत राहावा, हे या प्रकल्पाचे मुख्य सूत्र आहे.
आजच्या तरुण पिढीला त्यांच्याच माध्यमात महाराष्ट्राची खरी ओळख करून देणे आणि येथील लोकोत्तर व्यक्तींचे कर्तृत्व त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. म्हणूनच, महाराष्ट्राची ही अंगभूत अस्मिता, येथील पुरोगामी विचार आणि सांस्कृतिक संचित येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक ठरावा, या ध्येयाने 'मराठीका' प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली आहे.