क्रीडा (९ ते १०)
१९५० ते २०००
स्वातंत्र्यानंतर, विशेषतः १९५० ते २००० या पन्नास वर्षांत महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रानं मोठी झेप घेतली. पारंपरिक आखाडे आणि जिमखान्यांपासून सुरू झालेली ही वाटचाल पुढे व्यावसायिक आणि जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधांपर्यंत पोहोचली. या काळात कुस्ती, कबड्डी, खो-खो, हॉकी, बुद्धिबळ आणि इतर खेळांत महाराष्ट्रानं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला.
१९५० च्या दशकात खेळांना संघटित स्वरूप देण्याची प्रक्रिया सुरू झाली. ‘अखिल महाराष्ट्र शारीरिक मंडळा’नं कबड्डी, खो-खो आणि आट्यापाट्या यांसारख्या खेळांचे नियम ठरवून त्यांना शिस्तबद्ध आणि स्पर्धात्मक रूप दिलं. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर क्रीडा विकासासाठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा उभारण्यावर भर दिला गेला. त्यानुसार महाराष्ट्रानं शिक्षण प्रणालीत आवश्यक बदल केले. जुलै १९७० मध्ये स्वतंत्र ‘क्रीडा व युवक सेवा संचालनालया’ची स्थापना करण्यात आली. शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालये सुरू करण्यात आली. खेळाडू, प्रशिक्षक आणि प्रशासक यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी १९६९-७० मध्ये ‘शिवछत्रपती पुरस्कार’ सुरू केला.
१९५० ते २००० या काळात क्रीडा सुविधांचा विस्तार झाला. ‘नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया’ या संस्थेचं टेनिस, बॅडमिंटन, कुस्ती आणि इतर इनडोअर खेळांसाठी ‘सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियम’, मुंबई (१९५७) उभारलं गेलं. फुटबॉल सामन्यांसाठी ‘राजर्षी शाहू स्टेडियम’, कोल्हापूर (१९६०), ‘शहाजीराजे क्रीडा संकुल’ (अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स), मुंबई (१९८८) आणि ‘मेजर ध्यानचंद स्टेडियम’, पिंपरी-चिंचवड, पुणे (१९९३) अशी इतर महत्त्वाची स्टेडियमही उभारली. १९९४ मध्ये मुंबई आणि पुणे येथे २८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं भव्य आयोजन केलं गेलं. या निमित्तानं पुण्यातील बालेवाडी येथे ‘श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल’ उभारलं. येथे अनेक खेळांच्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्या.
क्रीडा संस्कृती जोपासून खेळाडूंच्या नैसर्गिक गुणांचा विकास व्हावा आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्याचा नावलौकिक वाढवावा, या उद्देशानं १९९६ मध्ये देशाचं व्यापक क्रीडा धोरण जाहीर झालं. पाठोपाठ महाराष्ट्रानंही सर्वसमावेशक क्रीडा धोरण लागू करून देशात आघाडी घेतली. या धोरणामुळे क्रीडा क्षेत्राची दिशा बदलली आणि व्यावसायिकतेकडे वाटचाल सुरू झाली.
१९९६ मध्येच ‘क्रीडा प्रबोधिनी’ या संस्थेची स्थापना झाली. ८ ते १४ वर्षे वयोगटातल्या गुणवान मुलांची निवड करून त्यांना निवासी प्रशिक्षण, योग्य आहार आणि आधुनिक सुविधा दिल्या. यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्याची प्रक्रिया अधिक मजबूत झाली.
कुस्ती
१९५० ते २००० या काळात महाराष्ट्रातील कुस्तीनं मातीच्या आखाड्यांपासून ते ऑलिम्पिकच्या मंचापर्यंतचा अत्यंत अभिमानास्पद प्रवास केला. या काळात कुस्तीला संघटित आणि व्यावसायिक रूप मिळालं. महाराष्ट्रानं देशाला अनेक नामांकित आणि पराक्रमी मल्ल दिले.
या प्रवासात खाशाबा दादासाहेब जाधव (१९२५-१९८४) यांचं नाव अग्रस्थानी येतं. १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी फ्रीस्टाईल कुस्तीत (५७ किलो गट) कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला. हे स्वतंत्र भारताचं पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक ठरलं. विशेष म्हणजे त्या ऑलिम्पिकमध्ये खेळलेल्या भारताच्या चार प्रतिनिधींपैकी तीन मल्ल हे कोल्हापूरचे होते.
यानंतर गणपतराव आंदळकर यांनी १९६२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून महाराष्ट्राची कीर्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर नेली. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना ‘अर्जुन पुरस्कारा’नं सन्मानित केलं. रुस्तम-ए-हिंद दादू मामा चौगुले हेही या काळातील अत्यंत गाजलेले मल्ल होते. त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये अजिंक्यपद मिळवलं.
'हिंद केसरी' या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेची सुरुवात मुळात १९५८ साली झाली. स्पर्धेच्या पहिल्या दोन दशकात महाराष्ट्रातील मल्लांनी या स्पर्धेवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. श्रीपती खंचनाळे (१९५९), गणपतराव आंदळकर (१९६०), मारुती माने (१९६४), हजरत पटेल (१९६६), हरिश्चंद्र बिराजदार (१९६९), दीनानाथ सिंग (१९७१), चंबा मुत्नाळ (१९७५) यांनी हिंद केसरी हा बहुमान पटकावला. १९७५ नंतर मात्र उत्तर भारतातील मल्लांचं या स्पर्धेवर वर्चस्व निर्माण झालं. त्यानंतर पुढच्या २५ वर्षांच्या काळात महाराष्ट्रातील एकाही मल्लाला 'हिंद केसरी' हा बहुमान जिंकता आला नाही.
१९५२ मध्ये हेलसिंकी येथे भरलेल्या ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांच्या व्यतिरिक्त केशव माणगावे आणि श्रीरंग जाधव यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं, तर १९५६ मधील मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये बबन दावरे यांनी प्रतिनिधित्व केलं. १९६४ च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये गणपतराव आंदळकर यांच्या व्यतिरिक्त मारुती माने आणि बंडू पाटील यांनी प्रतिनिधित्व केलं. १९७२ च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये हरिश्चंद्र बिराजदार आणि मारुती आडकर यांनी प्रतिनिधित्व केलं. १९७२ नंतर मात्र महाराष्ट्रातील मल्ल ऑलिम्पिकमध्ये दिसले नाहीत.
कोल्हापूरमधले खासबाग मैदान आणि तेथील तालीम परंपरा कुस्तीची प्रमुख केंद्रं ठरली. गंगावेश, शाहूपुरी आणि मोतीबाग आखाड्यांनी अनेक दर्जेदार मल्ल घडवले. या तालमींमध्ये शिस्त, कष्ट आणि पारंपरिक मातीतला सराव याला विशेष महत्त्व होतं. ‘अखिल महाराष्ट्र शारीरिक मंडळा’नं १९५० च्या दशकात कुस्तीचे नियम निश्चित करून तिला संघटित रूप दिलं.
१९५३ मध्ये ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा सुरू झाली. ग्रामीण भागातील मल्लांना मुख्य प्रवाहात आणण्यास या स्पर्धेनं मोठी मदत केली. आजही हा किताब अत्यंत मानाचा मानला जातो. शहरीकरणामुळे काही आखाडे कमी झाले, तरी कोल्हापूर, सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रात मातीतल्या कुस्तीची परंपरा टिकून राहिली.
मल्लखांब हा कुस्तीचा पूरक व्यायामप्रकार म्हणून या काळात अधिक महत्त्वाचा ठरला. १९९६ च्या क्रीडा धोरणामुळे त्यालाही स्वतंत्र आणि स्पर्धात्मक ओळख मिळाली.
एकूणच, या पन्नास वर्षांत महाराष्ट्रानं कुस्तीची परंपरा जपली आणि तिला आधुनिकतेची जोड दिली. त्यामुळेच महाराष्ट्र भारतीय कुस्तीचं एक प्रभावी आणि ऐतिहासिक केंद्र म्हणून उभा राहिला.
कबड्डी
शारीरिक ताकद आणि सांघिक कौशल्य यांचा संगम असलेला कबड्डी हा महाराष्ट्रातला अत्यंत लोकप्रिय पारंपरिक खेळ आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात तो मोठ्या उत्साहानं खेळला जातो. १९५० ते २००० या पन्नास वर्षांत महाराष्ट्रानं या खेळाला मातीपासून उचलून राष्ट्रीय आणि व्यावसायिक स्तरावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
१९५० च्या दशकात ‘अखिल महाराष्ट्र शारीरिक मंडळा’ने कबड्डीचे नियम निश्चित केले. त्यामुळे खेळाला शिस्तबद्ध आणि स्पर्धात्मक रूप मिळालं. स्पर्धांचं आयोजन नियमित झालं आणि खेळाचा प्रसार वाढला. पुढे १९९६ मध्ये राज्याच्या क्रीडा धोरणांतर्गत ‘क्रीडा प्रबोधिनी’ सुरू झाली. या उपक्रमामुळे कबड्डीला हौशी पातळीवरून निम-व्यावसायिक स्तराकडे नेण्यास गती मिळाली. ‘महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन’नं राज्यभर जिल्हास्तरीय निवड चाचण्या आणि राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केल्या. यामुळे अनेक गुणवान खेळाडू पुढे आले आणि त्यांना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळाली. १९७० च्या दशकात महाराष्ट्राच्या संघांनी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली.
१९५० ते २००० या काळात महाराष्ट्राने भारतीय कबड्डीला अनेक दिग्गज आणि जागतिक दर्जाचे खेळाडू दिले. या सुवर्णकाळातील महाराष्ट्रातील काही अत्यंत महत्त्वाचे आणि 'अर्जुन पुरस्कार' विजेते कबड्डी खेळाडू पुढील प्रमाणे आहेत: सदानंद शेटये (१९७२-७३), शकुंतला खटावकर, (१९७८-७९) शांताराम जाधव (१९८०-८१), माया मेहेर (१९८१-८२), अशोक शिंदे (१९९४-९५), श्रीराम (राजू) भावसार (१९९५-९६), आणि नीता दडवे (१९९७-१९९८). नामावलीत महर्षी शंकरराव (बुवा) साळवी (१९३२-२००७) हे नाव नमूद केल्याशिवाय कबड्डीचा इतिहास पूर्ण होत नाही. त्यांना 'कबड्डी महर्षी' बुवा साळवी असं म्हटलं जातं. ते कबड्डी खेळाचे नि:स्वार्थी प्रशासक आणि दिग्गज संघटक होते. त्यांनी महाराष्ट्राच्या मातील्या कबड्डीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यात आणि खेळाडूंना नोकऱ्या मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून १५ जुलै हा त्यांचा जन्मदिन महाराष्ट्रात 'महाराष्ट्र कबड्डी दिन' म्हणून साजरा केला जातो.
या पन्नास वर्षांत महाराष्ट्रानं कबड्डीचा वारसा जपला आणि त्याला आधुनिक रूप दिलं. कोणत्याही विशेष साधनांशिवाय खेळला जाणारा हा खेळ शाळा आणि महाविद्यालयांतून तळागाळापर्यंत पोहोचला. त्यामुळे व्यापक पातळीवर खेळाडू तयार झाले. आज व्यावसायिक स्पर्धांमध्ये दिसणाऱ्या महाराष्ट्राच्या वर्चस्वाचा पाया याच कालखंडात घातला गेला.
खो-खो
महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीत रुजलेला आणि वेग व रणनीतीवर आधारलेला खो-खो हा अत्यंत लोकप्रिय खेळ आहे. त्याची पाळंमुळं प्राचीन काळात सापडतात. चक्रव्यूहासारख्या युद्धनीतीशी त्याचा संबंध जोडला जातो. १९५० ते २००० या काळात महाराष्ट्रानं या पारंपरिक खेळाला आधुनिक आणि नियमबद्ध करून राष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक रूप दिलं.
१९५० च्या दशकात अखिल महाराष्ट्र शारीरिक मंडळानं खो-खोचे नियम निश्चित केले. त्यामुळे खेळ अधिक शिस्तबद्ध झाला आणि स्पर्धात्मक स्वरूप प्राप्त झालं. यानंतर ग्रामीण भागात या खेळाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. पुण्यातील डेक्कन जिमखान्यानेही खो-खोचे नियम घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे महाराष्ट्र खो-खो असोसिएशननं या खेळाच्या विकासाला गती दिली. राज्यभर निवड चाचण्या आणि स्पर्धा आयोजित करून गुणवान खेळाडू घडवण्याचे काम या संस्थेने प्रभावीपणे केलं.
१९७० च्या दशकापर्यंत महाराष्ट्राच्या संघांनी राष्ट्रीय स्तरावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. अनेक स्पर्धांमध्ये राज्यानं विजेतेपदं मिळवली. भारतीय खो खो महासंघातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील वरिष्ठ गटाच्या स्पर्धेत १९७० ते १९९० या दोन दशकात दोन अपवाद वगळता सातत्यानं विजेतेपद पटकावलं.
एकूणच, या पन्नास वर्षांत महाराष्ट्रानं खो-खोचा केवळ प्रसारच केला नाही, तर त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. त्यामुळे या मातीतल्या खेळाला राष्ट्रीय दर्जा मिळाला आणि त्यात महाराष्ट्राची ठोस ओळख निर्माण झाली.
बुद्धिबळ
महाराष्ट्राला बुद्धिबळाची समृद्ध आणि मजबूत परंपरा लाभली आहे. १९५० ते २००० या पन्नास वर्षांत राज्यानं भारताच्या जागतिक बुद्धिबळ प्रवासात मोलाची भूमिका बजावली. या काळात महाराष्ट्रानं देशाला अनेक ग्रँडमास्टर आणि आंतरराष्ट्रीय मास्टर्स दिले. त्यांच्या कामगिरीमुळे भारताला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली.
पुण्याचे प्रवीण महादेव ठिपसे हे भारताचे प्रख्यात बुद्धिबळपटू असून त्यांनी भारतीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा नऊ वर्षं जिंकली. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं. त्यांनी कॉमनवेल्थ आणि आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत अनेक पदकं मिळवली. १९८४ साली भारत सरकारनं त्यांना ‘अर्जुन पुरस्कार’ प्रदान केला. १९९७ मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्रँडमास्टर हा किताब प्रदान करण्यात आला. ते विश्वनाथ आनंद आणि दिब्येंदू बरुआ यांच्यानंतर ग्रँडमास्टर किताब मिळवणारे भारतातील तिसरे खेळाडू ठरले.
पुण्याचेच अभिजित कुंटे यांनी भारतीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत अनेक वेळा भाग घेतला. त्यात त्यांना दोनवेळा सुवर्णपदक तर चारवेळा कांस्यपदक मिळवले. कुंटे यांनी ओलीम्पियाड, आशियायी अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक पदकं मिळवली. २००० मध्ये अभिजित कुंटे यांना ग्रँडमास्टर या किताबाने सन्मानित करण्यात आलं.
महाराष्ट्राच्या रोहिणी खाडिलकर, भाग्यश्री साठे ठिपसे आणि अनुपमा गोखले या भारतातील आघाडीच्या महिला बुद्धिबळपटू असून तिघींनाही ‘वुमन इंटरनॅशनल मास्टर’ हा किताब प्राप्त झाला आहे. तिघींनीही भारतीय महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा पाच वेळा जिंकली आणि अनेक अंतर्राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकं मिळवली. भारत सरकारनं तीनही महिला खेळाडूंचा 'अर्जुन पुरस्कार' देऊन गौरव केला. रोहिणी खाडिलकर यांना जगातील आठव्या क्रमांकाच्या खेळाडू असा सन्मान प्राप्त झाला तर भाग्यश्री साठे ठिपसे आणि अनुपमा गोखले यांना 'पद्मश्री' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अनुपमा गोखले वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी 'पद्मश्री' मिळवणाऱ्या त्या सर्वात तरुण व्यक्ती ठरल्या.
या काळात पुणे आणि मुंबई ही शहरे बुद्धिबळाची प्रमुख केंद्रे म्हणून विकसित झाली. विशेष म्हणजे महिलांना बुद्धिबळात पुढे आणण्यात महाराष्ट्रानं मोठा वाटा उचलला. साधनसुविधांची कमतरता असूनही खेळाडूंनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर जागतिक स्तरावर ठसा उमटवला.
एकूणच, या पन्नास वर्षांत महाराष्ट्रानं बुद्धिबळाचा मजबूत पाया घातला. आज भारत बुद्धिबळातला जागतिक महासत्ता म्हणून उभा आहे, त्यामागे महाराष्ट्राच्या या सातत्यपूर्ण आणि समृद्ध परंपरेचा मोठा वाटा आहे.
इतर खेळ
१९५० ते २००० या काळात कुस्ती, कबड्डी, क्रिकेट, खो-खो आणि बुद्धिबळ यांबरोबरच महाराष्ट्रात अनेक इतर खेळांतही उल्लेखनीय प्रगती झाली. पारंपारिक आणि आधुनिक खेळांचा समतोल राखत राज्याने क्रीडा क्षेत्र अधिक व्यापक केलं.
महाराष्ट्रात, विशेषतः मुंबई आणि पुणे येथे हॉकीची समृद्ध परंपरा होती. या काळात अनेक नामांकित हॉकीपटू घडले. पुण्याचा धनराज पिल्ले यानं १९८९ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करून जागतिक हॉकीत आपली छाप पाडली. त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं १९९८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. १९९९ मध्ये त्यांना ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्कार मिळाला. मुंबईचे मर्विन फर्नांडिस आणि ज्यूड मेनेझेस, विरेन रास्किन्हा आणि महिला खेळाडू एलिझा नेल्सन या खेळाडूंची देखील हॉकी खेळामध्ये उल्लेखनीय कामगिरी आहे.
फुटबॉल हा विशेषतः मुंबईत लोकप्रिय खेळ होता. १९५६ च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये हॅट्ट्रिक नोंदवणारे ते पहिले आशियाई आणि आजतागायतचे एकमेव भारतीय फुटबॉलपटू आहेत. त्यांनी 'संतोष करंडक' या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचं अत्यंत यशस्वीपणे प्रतिनिधित्व केलं. १९५४ साली मुंबई संघानं जिंकलेल्या संतोष ट्रॉफीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. १९५५ मध्ये ते मुंबई संघाचे कर्णधारही होते. या काळात महाराष्ट्राच्या संघाने ‘संतोष करंडक’ स्पर्धा चार वेळा जिंकली.
१९५० ते २००० या काळात महाराष्ट्रानं भारतीय बॅडमिंटनला काही अत्यंत महान आणि दिग्गज खेळाडू दिले आहेत. नंदू नाटेकर हे भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासातील पहिले 'सुपरस्टार' मानले जातात. १९५६ साली मलेशियामध्ये 'सेलांगोर इंटरनॅशनल' स्पर्धा जिंकून कोणतेही आंतरराष्ट्रीय विजेतेपद मिळवणारे ते पहिले भारतीय बॅडमिंटनपटू ठरले. त्यांच्या उत्कृष्ट खेळासाठी भारत सरकारनं १९६१ साली ‘अर्जुन पुरस्कारा’नं सन्मानित केलं. याच काळात अमी घिया-शहा या भारतीय महिला खेळाडूंचं बॅडमिंटनवर निर्विवाद वर्चस्व होतं. १९७६ मध्ये त्यांना 'अर्जुन पुरस्कारानं' सन्मानित करण्यात आलं. प्रदीप गंधे हे महाराष्ट्राचे एक अत्यंत प्रतिभावान खेळाडू होते. त्यांच्या बॅडमिंटन मधील योगदानाबद्दल त्यांना १९८२ साली 'अर्जुन पुरस्कार' प्रदान करण्यात आला. याशिवाय लिरॉय डिसा आणि १९९७ सालापासून सलग राष्ट्रीय विजेतेपद जिंकणाऱ्या मुंबईच्या अपर्णा पोपट यांनीही याच दशकाच्या अखेरीस आपल्या शानदार कारकिर्दीची सुरुवात केली.
अथेलेटिक्समध्येही या काळात संघटित प्रशिक्षणाची सुरुवात झाली. याचबरोबर आट्यापाट्या, लगोरी आणि लंगडी यांसारखे खेळ शाळा आणि ग्रामीण भागात लोकप्रिय राहिले.
एकूणच, या कालखंडात महाराष्ट्रानं विविध खेळांमध्ये संतुलित विकास साधला. पारंपारिक खेळांचे जतन करत आधुनिक क्रीडाप्रकारांनाही चालना दिली आणि राज्याची क्रीडा संस्कृती अधिक समृद्ध केली.
समारोप
१९५० ते २००० या पन्नास वर्षांत महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राने परंपरा आणि आधुनिकता यांचा संतुलित संगम साधत भक्कम प्रगती केली. मातीतील कुस्ती, कबड्डी आणि खो-खो यांसारख्या पारंपारिक खेळांचा वारसा जपत त्यांना संघटित, नियमबद्ध आणि स्पर्धात्मक रूप दिलं. त्याचवेळी बुद्धिबळ, हॉकी, बॅडमिंटन आणि फुटबॉल यांसारख्या आधुनिक खेळांतही महाराष्ट्रानं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ठोस ओळख निर्माण केली.
या प्रगतीमागे शासनाच्या धोरणांचा, क्रीडा संस्थांच्या कार्याचा आणि प्रशिक्षकांच्या समर्पणाचा मोठा वाटा होता. ‘शिवछत्रपती पुरस्कार’, ‘क्रीडा प्रबोधिनी’ आणि सर्वसमावेशक क्रीडा धोरण यांसारख्या उपक्रमांनी खेळाडूंना योग्य दिशा मिळाली. ग्रामीण भागातील गुणवान खेळाडूंना संधी देण्याची प्रक्रिया अधिक मजबूत झाली. त्यामुळे क्रीडा चळवळ राज्यभर विस्तारली.
या काळात महाराष्ट्रानं केवळ विजेते खेळाडू घडवले नाहीत, तर क्रीडामूल्यांचीही जपणूक केली. शिस्त, जिद्द, संघभावना आणि कष्ट यांसारखे गुण समाजात रुजले. महिलांचा वाढता सहभाग हे या कालखंडाचे विशेष वैशिष्ट्य ठरलं.
एकूणच, या पन्नास वर्षांच्या वाटचालीकडे पाहिलं तर महाराष्ट्राचं क्रीडा क्षेत्र प्रेरणादायी ठरतं. परंपरेचा मजबूत पाया आणि आधुनिकतेची जोड यामुळे पुढील पिढ्यांसाठी समृद्ध क्रीडा संस्कृती घडली. हीच या कालखंडाची सर्वात महत्त्वाची ऐतिहासिक देणगी आहे.