संगीत व कला (४ ते ८)
१९५० ते २०००
१९५० ते २००० हा पन्नास वर्षांचा कालखंड केवळ महाराष्ट्रापुरता नाही, तर संपूर्ण भारताच्या शास्त्रीय संगीताच्या इतिहासातील एक परिवर्तनशील टप्पा मानला जातो. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या राजकीय व सामाजिक रचनेत आमूलाग्र बदल घडले. या बदलांचा प्रभाव विशेषतः कला क्षेत्रावर, प्रकर्षाने जाणवला.
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय शास्त्रीय संगीताचा मुख्य आधार संस्थानिक आणि राजदरबारी आश्रय हा होता. राजाश्रयामुळे कलावंतांना आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळत असे. मात्र, स्वातंत्र्यानंतर संस्थानांचे विलीनीकरण झाले आणि ही पारंपरिक आधारव्यवस्था कोसळली. परिणामी, शतकानुशतके राजाश्रयावर अवलंबून असलेल्या कलावंतांसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला.
या नव्या परिस्थितीत कलेच्या संवर्धनासाठी ‘राजाश्रय’ ऐवजी ‘लोकाश्रय’ ही संकल्पना उदयाला आली. नव्या सामाजिक वास्तवाशी जुळवून घेत, कलावंतांना समाजाशी थेट नाते निर्माण करणे अपरिहार्य ठरले. या अत्यंत कठीण आणि स्थित्यंतराच्या काळात महाराष्ट्राने शास्त्रीय संगीताला केवळ आश्रयच दिला नाही, तर त्याला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले. या काळात शास्त्रीय संगीत हे राजवाड्यांच्या बंदिस्त भिंतींमधून बाहेर पडून सर्वसामान्यांच्या घराघरात, मैफिलींमध्ये आणि भव्य महोत्सवांमध्ये पोहोचले. गायन आणि वादन या दोन्ही क्षेत्रांत महाराष्ट्राने स्वतःचा असा एक वेगळा आणि अत्यंत भक्कम ठसा उमटवला. या ५० वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात शास्त्रीय संगीताचा महाराष्ट्रात झालेला विस्तार, तंत्रज्ञानाचा वापर, संस्थात्मक पाठिंबा आणि दिग्गज कलावंतांचे अलौकिक योगदान यांचा आढावा घेण्याजोगा आहे.
शास्त्रीय संगीताला राजाश्रयाकडून लोकाश्रयाकडे नेण्याच्या या प्रवासात महाराष्ट्रातील संस्था, प्रसारमाध्यम आणि संगीत मोहोत्सवांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. संगीताचे शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे, या दोन्ही आघाड्यांवर या काळात मोठे काम झाले.
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय
१९०१ मध्ये पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी स्थापन केलेल्या ‘गंधर्व महाविद्यालय’ या संस्थेची परंपरा त्यांच्या निधनानंतरही अखंडपणे पुढे चालू राहिली. नारायण मोरेश्वर खरे, शंकर गणेश व्यास आणि विनायकबुवा पटवर्धन या त्यांच्या शिष्यांनी आणि विकास कशाळकर व इतर प्रभुतींनी मंडळाचे कार्य समर्थपणे सांभाळले आणि संस्थेची घडी मजबूत ठेवली.
स्वातंत्र्यानंतर संस्थेची मुंबई येथे अधिकृत नोंदणी झाली आणि संस्थेचे कार्य प्रामुख्याने महाराष्ट्रातूनच सुरू झाले. त्यानंतर पुणे, मुंबई, नागपूर यांसह ग्रामीण भागातही शाखांचे जाळे विस्तारले. यामुळे शास्त्रीय संगीत घराण्यापुरते मर्यादित न राहता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. संस्थेने अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीला शिस्तबद्ध रचना दिली. प्रारंभिक ते ‘संगीत आचार्य’ असा टप्प्याटप्प्याने अभ्यासक्रम विकसित झाला. ‘संगीत विशारद’ आणि ‘अलंकार’ या पदव्यांना मान्यता मिळाल्यामुळे संगीत शिक्षणाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली. संगीत हे केवळ छंद न राहता एक मान्यताप्राप्त शैक्षणिक क्षेत्र बनले. कालांतराने मिरज आणि वाशी येथे संस्थेची प्रमुख कार्यालये स्थापन करण्यात आली. तसेच त्रैवार्षिक संगीत संमेलनांच्या माध्यमातून कलाकार आणि विद्यार्थ्यांमध्ये थेट संवाद साधला गेला.
आकाशवाणी आणि दूरदर्शन
याच काळात आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमांनी शास्त्रीय संगीताच्या प्रसारात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात सांस्कृतिक चळवळींना वेग आला आणि त्याला माध्यमांची भक्कम साथ लाभली.
आकाशवाणीच्या केंद्रांवरून शास्त्रीय संगीताचे नियमित कार्यक्रम प्रसारित होऊ लागले. १९५२ मध्ये सुरू झालेला ‘राष्ट्रीय संगीत कार्यक्रम’ हा त्यातील महत्त्वाचा उपक्रम होता. दर शनिवारी रात्री साडेनऊ ते अकरा या वेळेत प्रसारित होणारा हा ९० मिनिटांचा कार्यक्रम देशभरातील दर्जेदार कलाकारांना व्यासपीठ देणारा ठरला.
१९७० च्या दशकात विविध भारतीवरील ‘संगीत सरिता’ हा कार्यक्रम विशेष लोकप्रिय झाला. सकाळी ७:३० ते ७:४५ या वेळेत प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमातून रागदारी संगीताचे सोप्या भाषेत विश्लेषण केले जाई. त्यामुळे सामान्य श्रोत्यांनाही रागांची ओळख निर्माण झाली. ‘संगीत संमेलन’सारख्या कार्यक्रमांनीही शास्त्रीय संगीत जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवले.
आकाशवाणीने कलाकारांच्या श्रेणीकरणाची पद्धत सुरू केली. त्यामुळे गुणवत्तेला प्रोत्साहन मिळाले. अनेक दिग्गज कलाकारांच्या मैफिली देशभर पोहोचू लागल्या. नवोदित कलाकारांनाही संधी मिळाली आणि त्यांची घडण झाली.
१९७० नंतर दूरदर्शनच्या आगमनामुळे संगीताचा अनुभव अधिक समृद्ध झाला. ‘राग रंग’ आणि ‘सुरबहार’ यांसारख्या कार्यक्रमांमधून दूरदर्शनवर शास्त्रीय संगीत सादर केले जाई. त्यामुळे श्रोत्यांना केवळ ऐकण्याचाच नव्हे, तर कलाकारांना पाहण्याचाही अनुभव मिळाला. कलाकारांची सादरीकरण शैली आणि भाव अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचले. या दोन्ही माध्यमांनी केवळ शास्त्रीय संगीताचा प्रसारच केला नाही, तर दुर्मिळ ध्वनिमुद्रिका जतन करून सांस्कृतिक वारसा सुरक्षित ठेवला. आजही हा ठेवा संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मौल्यवान आहे.
ध्वनिमुद्रण तंत्रज्ञानातील प्रगती
१९५० नंतर ध्वनिमुद्रण तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे शास्त्रीय संगीताच्या प्रसाराला नवे माध्यम मिळाले. सुरुवातीला ग्रामोफोन रेकॉर्ड (LP आणि EP) या स्वरूपात संगीताची नोंद केली जाऊ लागली. त्यामुळे महान कलाकारांच्या मैफिली आणि बंदिशी जतन होऊ लागल्या आणि त्या व्यापक श्रोत्यांपर्यंत पोहोचल्या. पुढे १९७०–८० च्या दशकात ऑडिओ कॅसेट्सच्या आगमनाने हा प्रसार अधिक वेगाने वाढला. कॅसेट्स स्वस्त, सहज वाहून नेता येणाऱ्या आणि पुन्हा-पुन्हा ऐकता येणाऱ्या असल्यामुळे शास्त्रीय संगीत घराघरात पोहोचले. विद्यार्थी आणि रसिकांना अभ्यासासाठी तसेच आनंदासाठी संगीत ऐकणे अधिक सुलभ झाले. या माध्यमांमुळे दुर्मिळ रागदारी आणि दिग्गज कलाकारांच्या मैफिली यांचे जतन झाले आणि शास्त्रीय संगीताच्या परंपरेला एक नवे, टिकाऊ अधिष्ठान प्राप्त झाले.
संगीत महोत्सव
शास्त्रीय संगीताच्या प्रसार आणि संवर्धन यात एक महत्त्वाचा ऐतिहासिक टप्पा म्हणजे १९५३ साली पुण्यात सुरू झालेला ‘सवाई गंधर्व महोत्सव’. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी आपल्या गुरु सवाई गंधर्व (रामभाऊ कुंदगोळकर) यांच्या स्मरणार्थ या महोत्सवाची सुरुवात केली. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित हा महोत्सव सुरुवातीला छोट्या स्वरूपात होता; मात्र कालांतराने तो भव्य सांगीतिक पर्व बनला.
पूर्वी शास्त्रीय संगीताचे सादरीकरण प्रामुख्याने राजदरबारात किंवा मर्यादित रसिक वर्गात होत असे. सवाई गंधर्व महोत्सवाने ही चौकट मोडून काढली. हजारो रसिकांसमोर, खुल्या आणि सर्वसमावेशक वातावरणात संगीत सादर होऊ लागले. त्यामुळे शास्त्रीय संगीत प्रथमच खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचले. पुण्यातील रमणबाग येथील विस्तीर्ण मैदानावर उभारलेल्या भव्य मंडपात हजारो श्रोते एकत्र येत. सलग अनेक दिवस, रात्रभर चालणाऱ्या मैफिलींमधून रसिक संगीताचा अखंड आनंद घेत. आजही हा वार्षिक कार्यक्रम अव्याहत सुरू आहे.
सवाई गंधर्व महोत्सवाच्या यशामुळे महाराष्ट्रात आणि देशभर संगीत महोत्सवांची एक समृद्ध परंपरा निर्माण झाली. या परंपरेत अनेक महत्त्वाचे उपक्रम पुढे आले आणि त्यांनी शास्त्रीय संगीताच्या प्रसाराला नवे आयाम दिले. मुंबईत पंडित सी. आर. व्यास यांनी आपल्या गुरुंच्या स्मरणार्थ १९७७ मध्ये ‘गुणिदास संमेलन’ सुरू केले. पुण्यात कृ. गो. धर्माधिकारी यांनी १९७८ साली ‘गानवर्धन’ कार्यक्रमाची सुरुवात केली. पंडित वसंतराव देशपांडे यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ १९८५ पासून पुण्यात ‘वसंतोत्सव’ सुरू झाला.
या उपक्रमातून दर्जेदार शास्त्रीय संगीताचे सादरीकरण नियमितपणे घडू लागले. अनेक नामवंत तसेच नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध झाले. या सर्व महोत्सवांची एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे ते आजही सातत्याने आणि उत्साहाने आयोजित केले जात आहेत. त्यामुळे शास्त्रीय संगीताची परंपरा जपली गेली असून, नव्या पिढीपर्यंत तिचा प्रभावी प्रसार होत राहिला आहे.
घराणी आणि त्यांचे प्रतिनिधी कलाकार
१९५० नंतर महाराष्ट्रात हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या विविध घराण्यांनी आपली पाळेमुळे अधिक घट्ट केली. प्रत्येक घराण्याने आपली मूळ ओळख जपत, गायकीत काळानुरूप काही सकारात्मक बदल केले. किराणा, ग्वाल्हेर, जयपूर-अत्रौली, पतियाळा आणि भेंडीबाजार या पाच प्रमुख घराण्यांनी महाराष्ट्राच्या सांगीतिक जडणघडणीत अत्यंत मोठे योगदान दिले.
किराणा (मूळ नाव कैराना) घराण्याचे मूळ उत्तर प्रदेशात असले तरी या घराण्याची पाळेमुळे महाराष्ट्रात आणि कर्नाटकच्या सीमाभागात रुजली. उस्ताद अब्दुल करीम खान यांनी महाराष्ट्रातील मिरज येथे वास्तव्य करून या घराण्याचा प्रचंड मोठा प्रसार केला. १९५० ते २००० या काळात किराणा घराण्याची धुरा हिराबाई बडोदेकर, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी (१९२२-२०११), गंगूबाई हनगळ, पंडित फिरोज दस्तूर आणि पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांसारख्या महान कलावंतांनी अत्यंत समर्थपणे पेलली. पंडित भीमसेन जोशी यांच्या अमोघ आणि पहाडी आवाजामुळे, तसेच त्यांच्या भावनिक सादरीकरणामुळे किराणा घराणे महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात पोहोचले.
ग्वाल्हेर घराण्याला हिंदुस्तानी ख्याल गायकीचा पाया मानले जाते. या कालखंडात महाराष्ट्रात पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे सुपुत्र, सांगली जिल्ह्यातील पंडित दत्तात्रय विष्णू (डी. व्ही.) पलुस्कर (१९२१-१९५५) यांनी ग्वाल्हेर घराण्याची गायकी खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. याशिवाय, पंडित सी. आर. व्यास, पंडित उल्हास कशाळकर तसेच पंडित शरदचंद्र आरोलकर आणि त्यांच्या शिष्यांनी ग्वाल्हेर घराण्याची ही समृद्ध परंपरा महाराष्ट्रात पुढे नेली.
जयपूर-अत्रौली घराण्याचे प्रवर्तक उस्ताद अल्लादिया खान यांच्यानंतर या घराण्याची परंपरा गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर, आणि पद्मविभूषण किशोरी आमोणकर (१९३१-२०१७) यांनी पुढे नेली. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी या घराण्याच्या गायकीला एक नवीन भावनिक आणि अत्यंत आध्यात्मिक परिमाण दिले.
महाराष्ट्राच्या सांगीतिक इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा परंतु तुलनेने कमी चर्चिला गेलेला अध्याय म्हणजे 'भेंडीबाजार घराणे'. उस्ताद छज्जू खान, उस्ताद नझीर खान आणि उस्ताद खादीम हुसेन खान या तीन भावांनी मुंबईमध्ये या घराण्याची स्थापना केली. १९५० ते २००० या काळात अंजनीबाई मालपेकर आणि मास्टर नवरंग, सुहासिनी कोरटकर यांनी भेंडीबाजार घराण्याची परंपरा पुढे नेली.
पंजाबमध्ये उगम पावलेल्या पतियाळा घराण्याचा महाराष्ट्राच्या सांगीतिक जडणघडणीत अत्यंत मोठा वाटा राहिला आहे. मियाँ कल्लू यांनी स्थापन केलेल्या या घराण्याचा महाराष्ट्रात प्रभाव वाढवण्यात उस्ताद बडे गुलाम अली खान यांचा मोठा वाटा होता; त्यांनी मुंबईत राहून अनेक शिष्यांना पतियाळा गायकीची तालीम दिली. बडे गुलाम अली खान यांच्या भावनाप्रधान गायकीमुळे या घराण्याला महाराष्ट्रातही प्रचंड लोकप्रियता मिळाली.
१९५० ते २००० या पन्नास वर्षांच्या कालखंडात महाराष्ट्रातील अनेक दिग्गज गायकांनी शास्त्रीय संगीताला नवी उंची प्राप्त करून दिली. या काळात पारंपरिक घराणेदार गायकीच्या चौकटी ओलांडून ‘मिश्र’ आणि ‘संशोधनात्मक’ शैलीचा उदय झाला.
पंडित वसंतराव देशपांडे (१९२०–१९८३) हे या प्रवाहातील एक महत्त्वाचे नाव ठरतात. ग्वाल्हेर, किराणा, पतियाळा आणि भेंडीबाजार या विविध घराण्यांच्या संस्कारांतून त्यांनी स्वतःची स्वतंत्र शैली घडवली. याच काळात पद्मविभूषण कुमार गंधर्व (१९२४-१९९२) यांनी घराण्यांच्या बंधनांना छेद देत लोकसंगीताचा आधार घेत एक स्वतंत्र आणि विद्रोही गायकी विकसित केली. पंडित जितेंद्र अभिषेकी (१९२९-१९९८) यांनी आग्रा आणि जयपूर घराण्यांच्या वैशिष्ट्यांचा प्रभावी वापर केला तर पंडित राम मराठे (१९२४-१९८९) यांनी आग्रा आणि ग्वाल्हेर शैलीचा संगम साधला. पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे (१९३२-२०२४) यांनीही किराणा घराण्याचा भक्कम पाया जपत इतर घराण्यांतील वैशिष्ट्ये आपल्या गायकीत समर्थपणे आणली.
या सर्व कलाकारांनी कोणत्याही एकाच घराण्याच्या मर्यादेत स्वतःला बांधून न ठेवता शास्त्रीय संगीत अधिक लवचिक, प्रवाही आणि रसिकाभिमुख केले. त्यामुळे या कालखंडात शास्त्रीय संगीताच्या अभिव्यक्तीला नवे परिमाण मिळाले.
वाद्यसंगीताचा स्वतंत्र प्रवास
१९५० पूर्वी वाद्यसंगीताचे स्थान हे प्रामुख्याने गायकाला 'साथ' करण्यापुरते मर्यादित होते. मात्र, १९५० ते २००० या ५० वर्षांच्या काळात महाराष्ट्रात या वाद्यांनी आणि त्यांच्या वादकांनी एक मोठी क्रांती घडवून आणली, ज्यामुळे ही वाद्ये 'स्वतंत्र सादरीकरणाची' मुख्य वाद्ये म्हणून प्रस्थापित झाली.
व्हायोलिन वादनाच्या क्षेत्रात पंडित गजाननराव जोशी (गजाननबुवा जोशी) यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे. गजाननबुवांनी ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर घराण्यांच्या परंपरांचा सखोल अभ्यास करून गायन आणि व्हायोलिन या दोन्ही क्षेत्रांत प्राविण्य मिळवले. १९७२ साली त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. पंडित विष्णू गोविंद जोग हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील अग्रगण्य व्हायोलिनवादक होते. भारतीय शास्त्रीय संगीतात व्हायोलिनला मानाचे स्थान मिळवून देण्यात त्यांचे योगदान मोलाचे मानले जाते.
पंडित अप्पा जळगावकर आणि पंडित तुळशीदास बोरकर यांनी आपल्या बोटांच्या जादूने हार्मोनियमच्या स्वतंत्र वादनाची प्रभावी नवी पद्धत विकसित केली. दोन्ही कलाकारांना त्यांच्या योगदानासाठी ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ मिळाला. पंडित तुळशीदास बोरकर यांना २०१६ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांनी तबला वादनात नवे युग सुरू केले. त्यांनी पंडित विजय घाटे व पंडित रामदास पळसुले यांसारखे उत्कृष्ट शिष्य घडवून गुरू-शिष्य परंपरा समृद्ध केली. उस्ताद अल्ला रखा यांचे सुपुत्र आणि मुंबईत जन्मलेले पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन (१९५१-२०२४) यांनी याच कालखंडात तबल्याला खऱ्या अर्थाने भारताच्या सीमेबाहेर नेले. त्यांनी पाश्चात्य आणि इतर जागतिक संगीताशी जुळवून घेत तबल्याला जागतिक स्तरावर एक अभूतपूर्व ओळख आणि अफाट लोकप्रियता मिळवून दिली.
याच काळात महाराष्ट्राने अनेक अमराठी कलाकारांनाही मानाचे स्थान दिले. या दिग्गजांनी महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानले आणि येथेच आपल्या कलेचा विस्तार घडवला. त्यामध्ये डॉ. एन. राजम, पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पंडित शिवकुमार शर्मा यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. या तिन्ही कलाकारांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण वादनशैलीतून हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताला जागतिक पातळीवर नेले. महाराष्ट्राने त्यांना केवळ व्यासपीठच दिले नाही, तर रसिकांचा व्यापक प्रतिसादही दिला. त्यांच्या कलेची दखल घेत त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले. यामध्ये भारत सरकारकडून प्रदान करण्यात येणारा ‘पद्मविभूषण’ हा सर्वोच्च नागरी सन्मानही समाविष्ट आहे.
समारोप
१९५० ते २००० हा पन्नास वर्षांचा कालखंड महाराष्ट्रातील शास्त्रीय संगीताच्या परंपरेचा खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ ठरला. जाणकार आणि रसिक श्रोत्यांनी विविध संगीत महोत्सवांमधून शास्त्रीय संगीताला व्यापक लोकाश्रय दिला. आकाशवाणी आणि दूरदर्शन यांनी या परंपरेचे जतन आणि प्रसार करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. या लोकाश्रयाला समर्थ प्रतिसाद देत महाराष्ट्रातील अनेक कलाकारांनी गायन आणि वादन या दोन्ही क्षेत्रांत अजरामर कार्य केले. त्यांनी शास्त्रीय संगीताला उच्च दर्जा आणि व्यापकता प्राप्त करून दिली. या कालखंडात स्त्रियांनीही गायकीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत शास्त्रीय संगीताच्या परंपरेला नवे परिमाण दिले. याच काळात महाराष्ट्राने इतर प्रांतांतील अनेक दिग्गज कलाकारांनाही मानाचे स्थान दिले. या कलाकारांनी महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानून येथेच आपल्या कलेचा विकास केला आणि हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले.
भूतकाळातील या वैभवशाली परंपरेतून प्रेरणा घेत, शास्त्रीय संगीताला नव्या युगात सजीव ठेवणे, हेच आपल्या सांस्कृतिक जाणीवेचे खरे मोजमाप ठरेल.