साहित्य (११ ते १४)
१९५० ते २०००
मराठी साहित्याच्या प्रदीर्घ आणि समृद्ध परंपरेत १९५० ते २००० हा पन्नास वर्षांचा कालखंड अत्यंत महत्त्वाचा ठरतो. हा काळ केवळ राजकीय बदलांचा नव्हता. समाजरचना बदलत होती. आर्थिक व्यवस्था बदलत होती. सांस्कृतिक जाणिवाही नव्याने घडत होत्या. या सर्व बदलांचा थेट परिणाम साहित्यावर झाला.
स्वातंत्र्यपूर्व काळात मराठी साहित्यावर राष्ट्रवाद, आदर्शवाद आणि स्वच्छंदतावाद यांचा ठसा होता. मात्र स्वातंत्र्यानंतर वास्तव अधिक ठळकपणे समोर आले. स्वातंत्र्य मिळाले, पण त्याचे लाभ सर्वांपर्यंत पोहोचले नाहीत. ग्रामीण भाग, दलित समाज आणि कामगार वर्ग यांच्या आयुष्यात अपेक्षित बदल घडले नाहीत. त्यामुळे सामान्य माणसाचा भ्रमनिरास झाला. या अस्वस्थतेतून नव्या साहित्यप्रवाहांची निर्मिती झाली. लेखकांनी वास्तवाकडे अधिक थेट आणि चिकित्सक नजरेने पाहायला सुरुवात केली. साहित्याने केवळ आदर्श मांडण्यापेक्षा प्रश्न उपस्थित करणे सुरू केले. कथा, कादंबरी, कविता आणि वैचारिक लेखन या सर्व प्रकारांत नवे विषय आणि नवे प्रयोग आले. परिणामी, साहित्याची पारंपरिक व्याख्या बदलली आणि ते समाजाचे वास्तव दाखवणारे, विचारांना चालना देणारे तसेच परिवर्तनाची दिशा दाखवणारे प्रभावी माध्यम बनले.
१९५६ ते १९६० या काळात महाराष्ट्रात ‘संयुक्त महाराष्ट्र’ चळवळीने भाषिक आणि सांस्कृतिक अस्मितेला धारदार रूप दिले. मराठी माणसाच्या ओळखीचा प्रश्न अधिक तीव्र झाला. दीर्घ संघर्षानंतर १ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. या चळवळीने तळागाळातील माणसाला भाषेच्या धाग्यात बांधले. त्यामुळे समाजात नवी जागृती निर्माण झाली. या जागृतीचा थेट परिणाम साहित्यावर झाला. साहित्याचे क्षेत्र अधिक खुले झाले. नव्या अनुभवांना, नव्या आवाजांना आणि नव्या दृष्टिकोनांना स्थान मिळाले. परिणामी साहित्य अधिक लोकाभिमुख झाले. मोजक्या वर्गाची पकड सैल झाली आणि विविध स्तरांतील लोकांचे अनुभव साहित्याच्या केंद्रस्थानी आले.
या पाच दशकांच्या मराठी साहित्याचा विचार केला, तर त्याचे तीन प्रमुख प्रवाह स्पष्ट दिसतात—वैचारिक लेखन, ललित-वैचारिक लेखन आणि ललित लेखन. या तिन्ही प्रवाहांनी साहित्याला वेगवेगळ्या प्रकारे समृद्ध केले. वाचकांच्या जाणिवा अधिक व्यापक केल्या आणि साहित्याला अधिक अर्थपूर्ण दिशा दिली.
वैचारिक लेखन
वैचारिक लेखन हा पहिला आणि पारंपरिक प्रवाह मानला जातो. या प्रवाहातील लेखकांनी भावनेपेक्षा बुद्धीला आणि कल्पनेपेक्षा तथ्याला अधिक महत्त्व दिले. इतिहास, समाजशास्त्र, तर्कशास्त्र, धर्म आणि राजकारण या विषयांची त्यांनी तर्कशुद्ध, वस्तुनिष्ठ आणि पुराव्यांवर आधारित मांडणी केली. या लेखनाचा उद्देश मनोरंजन नव्हता. वाचकाला विचार करायला प्रवृत्त करणे हा त्यामागचा मुख्य हेतू होता. विषयाचे चिकित्सक विश्लेषण करून सत्याचा शोध घेणे हीच या प्रवाहाची ओळख ठरली.
लक्ष्मणशास्त्री जोशी आणि नरहर कुरुंदकर यांसारख्या विचारवंतांनी निबंध, प्रबंध आणि भाषणांच्या माध्यमातून समाजाला नवी वैचारिक दिशा दिली. त्यांच्या लेखनामुळे मराठी वाचक अधिक प्रगल्भ झाला. समाजाकडे पाहण्याची तर्कसंगत आणि चिकित्सक दृष्टी विकसित झाली.
लक्ष्मणशास्त्री जोशी (१९०१–१९९४) हे आधुनिक महाराष्ट्रातील प्रज्ञावंत विचारवंतांपैकी एक दीपस्तंभ होते. त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू तर्कशुद्धता, मानवतावाद आणि भारतीय संस्कृतीचे चिकित्सक विश्लेषण हा होता. ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ (१९५१) या ग्रंथातून त्यांनी परंपरेचे अंध समर्थन न करता ती आधुनिक विज्ञान आणि मानवी मूल्यांच्या कसोटीवर तपासली. या ग्रंथासाठी त्यांना १९५५ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ‘मराठी विश्वकोश’ मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांनी ज्ञानपरंपरेचा पाया भक्कम केला, तर ‘धर्मकोश’ प्रकल्पातून संस्कृत वाङ्मयाचे संपादन केले. स्वातंत्र्य चळवळीत सहभाग, साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (१९५४) आणि नेहरूंचे सल्लागारपद यांमुळे त्यांच्या कार्याला सामाजिक अधिष्ठान लाभले. त्यांच्या बहुमोल योगदानासाठी भारत सरकारने १९९२ मध्ये त्यांना पद्मविभूषण सन्मानाने गौरविले.
नरहर कुरुंदकर (१९३२–१९८२) हे मराठी साहित्यातील प्रखर बुद्धिवादी विचारवंत, समीक्षक आणि सामाजिक-राजकीय विश्लेषक म्हणून ओळखले जातात. स्वतःला नास्तिक आणि समाजवादी मानत असतानाही भारतीय इतिहास आणि संस्कृतीचा त्यांनी सखोल अभ्यास केला. तर्कशुद्धता, वस्तुनिष्ठता आणि निर्भीडता हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक गुण होते. ‘जागर’, ‘शिवछत्रपती’, ‘अन्वय’, ‘धार आणि काठ’ आणि ‘हैदराबाद विमोचन आणि त्यानंतर’ या ग्रंथांतून त्यांनी इतिहास, साहित्य आणि समाज यांचे चिकित्सक विश्लेषण केले. शिवाजी महाराजांकडे देवतुल्य दृष्टीने न पाहता त्यांना एक मुत्सद्दी शासक म्हणून पाहण्याचा नवा दृष्टिकोन त्यांनी मांडला. त्यांच्या लेखनामुळे मराठी वैचारिक गद्य अधिक तर्कशुद्ध, प्रगल्भ आणि समाजाभिमुख झाले.
याव्यतिरिक्त य. दि. फडके (१९३१–२००८), मे. पुं. रेगे (१९२४–२०००), रा. चिं. ढेरे (१९३०–२०१६) आणि सदानंद मोरे यांनी वैचारिक लेखनात मोलाची भर घातली. य. दि. फडके यांनी वैचारिक लेखनाबरोबरच चरित्र आणि ऐतिहासिक लेखनही केले; तसेच २००० साली बेळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. मे. पुं. रेगे हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे निकट सहकारी होते आणि त्यांच्या पश्चात मराठी विश्वकोश निर्मितीची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली.
रा. चिं. ढेरे यांनी दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास आणि लोकविद्या या क्षेत्रांत संशोधन करून १०५ ग्रंथांची निर्मिती केली. ‘श्री विठ्ठल : एक महासमन्वय’ या ग्रंथासाठी त्यांना १९८७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. संतसाहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांनी तत्त्वज्ञान आणि संत साहित्यावर व्यापक लेखन केले असून ‘तुकाराम दर्शन’ या ग्रंथासाठी त्यांना १९९८ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. या सर्व लेखकांच्या कार्यामुळे मराठी वैचारिक लेखन अधिक व्यापक, संशोधननिष्ठ आणि समृद्ध झाले.
ललित-वैचारिक लेखन
ललित-वैचारिक लेखन हा दुसरा आणि अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण प्रवाह या काळात उदयास आला. या प्रकारात विचार आणि साहित्यिकता यांचा सुंदर संगम दिसतो. इरावती कर्वे, दुर्गा भागवत आणि विंदा करंदीकर यांसारख्या लेखकांनी कोरड्या निबंधाऐवजी कथा, व्यक्तिरेखा किंवा निसर्गवर्णन यांचा आधार घेत वैचारिक आशय प्रभावीपणे मांडला. येथे ‘ललित’ हे माध्यम असले, तरी केंद्रस्थानी तात्त्विक चिंतनच राहते.
पौराणिक कथांमधून मानवी संस्कृतीचा शोध घेणे किंवा कल्पित कथांमधून नियती, अस्तित्व यांसारख्या संकल्पना उलगडणे हे या लेखनाचे वैशिष्ट्य ठरते. त्यामुळे वाचकाला एकाच वेळी सौंदर्याचा आनंद आणि विचारांची खोली अनुभवता येते. असे लेखन वाचकाला अंतर्मुख करते आणि जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहायला भाग पाडते.
इरावती कर्वे (१९०५–१९७०) या ज्येष्ठ मानववंशशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ म्हणून ओळखल्या जात असल्या, तरी त्यांच्या ललित लेखनाने मराठी साहित्यात स्वतंत्र स्थान निर्माण केले. ‘युगांत’ (१९६७) या त्यांच्या गाजलेल्या ग्रंथात महाभारतातील व्यक्तिरेखांचे देवत्व बाजूला ठेवून त्यांच्या मानवी स्वभावाचा चिकित्सक वेध घेतला आहे. त्यामुळे हा ग्रंथ पौराणिक कथेला नवा, तर्कशुद्ध आणि वास्तववादी दृष्टिकोन देणारा ठरतो. युगांत या कादंबरीला १९६८ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ‘परिपूर्ती’, ‘भोंवरा’ आणि ‘गंगाजळ’ या कथासंग्रहांतूनही त्यांच्या अनुभवसंपन्न आणि संवेदनशील लेखनाची झलक दिसते. संशोधक दृष्टी, संस्कृतीचे भान आणि मानवी स्वभावाचे सूक्ष्म निरीक्षण यांमुळे त्यांच्या लेखनाला वेगळी उंची प्राप्त झाली आणि ललित-वैचारिक लेखनाला त्यांनी समृद्ध दिशा दिली.
दुर्गा भागवत (१९१०–२००२) या मराठी साहित्यातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, विचारवंत आणि संशोधक म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या लेखनात सखोल अभ्यास आणि संवेदनशील अभिव्यक्ती यांचा सुंदर संगम दिसतो. ‘व्यासपर्व’ या ग्रंथातून त्यांनी महाभारतातील व्यक्तिरेखांचा मानवी आणि मानसिक वेध घेतला. ‘पैस’ (१९७०) या चिंतनशील ललित निबंधसंग्रहासाठी त्यांना १९७१ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ‘ऋतुचक्र’, ‘भावमुद्रा’ आणि ‘डूब’ यांसारख्या ललित लेखनातून त्यांनी निसर्ग, भावना आणि मानवी जीवनाचे सूक्ष्म आणि काव्यात्म चित्रण केले. त्यांनी मराठी वैचारिक-ललित लेखनाला एक स्वतंत्र आणि उंच दिशा दिली. १९७५ साली कराड येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले. आणीबाणीच्या काळात त्यांनी निर्भयपणे सरकारचा विरोध केला.
विंदा करंदीकर (१९१८–२०१०) यांची ओळख प्रामुख्याने कवी म्हणून असली, तरी त्यांच्या लघुनिबंध लेखनालाही स्वतंत्र महत्त्व आहे. ‘स्पर्शाची पालवी’ (१९५८) आणि ‘आकाशाचा अर्थ’ (१९६५) या संग्रहांमधील त्यांच्या लघुनिबंधांत कविता आणि गद्य यांचे कल्पक नाते स्पष्ट दिसते. विचार, भावना आणि संवेदना यांचा समतोल साधत त्यांनी लघुनिबंधाला एक वेगळी अभिव्यक्ती दिली. करंदीकरांच्या लघुनिबंधांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रसरणशील विचार आणि लालित्य यांचा सुंदर मिलाफ. त्यांच्या कवितेसारखेच हे लेखनही वाचकाच्या मनात घर करते आणि जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहायला प्रवृत्त करते.
याव्यतिरिक्त या काळात झालेल्या ललित-वैचारिक लेखनात जी. ए. कुलकर्णी (१९२३–१९८७), प्रभाकर पाध्ये (१९०९–१९८४) आणि गो. पु. देशपांडे (१९३८–२०१३) यांची नावे आवर्जून घ्यावी लागतात. जी. ए. कुलकर्णी यांचे ‘काजळमाया’ आणि ‘पिंगळावेळ’ यांसारखे लेखन विशेष गाजले; ‘काजळमाया’ या संग्रहाला १९७३ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांच्या लेखनात मानवी अस्तित्वाचे गूढ आणि नियतीचा वेध घेणारी वैचारिकता दिसते.
प्रभाकर पाध्ये हे आधुनिक मराठी साहित्यातील विचारवंत आणि 'सौंदर्यमीमांसक' म्हणून ओळखले जातात. त्यांनी कलेच्या स्वरूपासंबंधी मूलभूत प्रश्न उपस्थित करून 'सौंदर्यमीमांसा' या विषयात मोलाची भर घातली. गो. पु. देशपांडे यांनी प्रामुख्याने नाट्यलेखनातून ललित-वैचारिक लेखन समृद्ध केले. ‘उध्वस्त धर्मशाळा’ आणि ‘सत्यशोधक’ ही त्यांची गाजलेली नाटके असून त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारांनी गौरविण्यात आले. या लेखकांच्या कार्यामुळे ललित-वैचारिक लेखन अधिक बहुआयामी आणि विचारप्रधान बनले.
ललित लेखन
ललित लेखन हा तिसरा आणि महत्त्वाचा प्रवाह मानवी संवेदना आणि कल्पनाशक्तीवर आधारलेला आहे. कथा, कादंबरी, नाटक आणि कविता या माध्यमांतून लेखक वाचकाला भावविश्वात घेऊन जातो. येथे उद्देश केवळ माहिती देणे नसून जीवनाचा अनुभव समृद्ध करणे हा असतो. मानवी स्वभावाचे विविध पैलू, नातेसंबंध, संघर्ष तसेच आनंद-दुःख यांचे प्रभावी चित्रण यातून घडते.
वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर आणि पु. ल. देशपांडे यांसारख्या लेखकांनी या प्रवाहाला मोठी उंची दिली. त्यांच्या लेखनात इतिहासातील शौर्य, मानवी मूल्ये तसेच मध्यमवर्गीय जीवनातील विनोद आणि करुणा यांचे जिवंत दर्शन घडते. या साहित्यामुळे मराठी वाचकांची अभिरुची घडली आणि भाषेचे सौंदर्य अधिक खुलले.
वि. स. खांडेकर (१८९८–१९७६) यांच्या लेखनाचा सुवर्णकाळ जरी १९२० ते १९६० असा मानला जात असला, तरी १९५० नंतर त्यांच्या साहित्याने अधिक परिपक्व आणि प्रभावी रूप धारण केले. या काळात प्रकाशित झालेली ‘ययाति’ (१९५९) ही कादंबरी त्यांच्या साहित्याचा शिखरबिंदू ठरली. महाभारताच्या कथानकावर आधारलेली असली, तरी आधुनिक माणसाच्या भोगलालसेचे, तृष्णेचे आणि नैतिक संघर्षाचे त्यांनी केलेले चित्रण अत्यंत प्रभावी आहे. या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार (१९६०) मिळाला आणि पुढे १९७४ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांचा गौरव झाला. याच काळात ‘अमृतवेल’ आणि ‘अश्रू’ या कादंबऱ्यांबरोबरच त्यांच्या ललित निबंध आणि रूपक कथांनीही मराठी साहित्यात वेगळे स्थान निर्माण केले. भारत सरकारने १९६८ मध्ये त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरविले.
वि. वा. शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ (१९१२–१९९९) हे आधुनिक मराठी ललित साहित्यातील एक बहुआयामी आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व होते. कविता, नाटक, कादंबरी आणि कथा या सर्वच प्रकारांत त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. ‘किनारा’, ‘मराठी माती’, ‘स्वगत’, ‘हिमरेषा’ आणि ‘वादळवेल’ या संग्रहांतून त्यांच्या कवितेची अंतर्मुखता आणि मानवतावाद अधिक प्रकर्षाने व्यक्त झाला. कादंबरी आणि कथालेखनात ‘वैष्णव’, ‘जान्हवी’, ‘कल्पनेच्या तीरावर’ तसेच ‘फुलोरा’, ‘काही वृद्ध, काही तरुण’ या कृतींमधून त्यांनी काव्यात्मता आणि विचारप्रवृत्त आशय यांचा सुंदर संगम साधला. मराठी रंगभूमीवर ‘नटसम्राट’ (१९७०) हे त्यांचे अजरामर नाटक ठरले. याशिवाय ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘राजमुकुट’, ‘ययाति आणि देवयानी’ आणि ‘दुसरा पेशवा’ ही त्यांची गाजलेली नाटके आहेत. त्यांच्या साहित्यसेवेबद्दल ‘नटसम्राट’साठी १९७४ चा साहित्य अकादमी पुरस्कार, १९८७ चा ज्ञानपीठ पुरस्कार आणि १९९१ चा पद्मभूषण सन्मान त्यांना मिळाला. वि. वा. शिरवाडकर हे १९६४ साली मडगाव येथे झालेल्या ४५ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते
पु. ल. देशपांडे (१९१९–२०००) यांचे स्थान मराठी ललित लेखनात अग्रक्रमाचे मानले जाते. त्यांनी मध्यमवर्गीय समाजातील सामान्य माणसाचे जीवन अत्यंत जिवंतपणे मांडले. ‘बटाट्याची चाळ’ (१९५८), ‘व्यक्ती आणि वल्ली’ (१९६२) आणि ‘असा मी असामी’ (१९६४) या पुस्तकांतील व्यक्तिरेखा मराठी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या लेखनात विनोद आणि कारुण्य यांची सुंदर सांगड दिसते; वाचकाला हसवत असतानाच ते अंतर्मुखही करतात. ‘गणगोत’ (१९६६) आणि ‘गुण गाईन आवडी’ (१९७५) यांसारख्या ग्रंथांत त्यांनी महान व्यक्तींचे प्रभावी व्यक्तिचित्रण केले.
व्यक्तिचित्रणाबरोबरच त्यांची लेखनप्रतिभा इतर प्रकारांतही फुललेली दिसते. ‘अपूर्वाई’ (१९६०) आणि ‘पूर्वरंग’ (१९६३) ही प्रवासवर्णने, ‘गोळाबेरीज’सारखे ललित लेख, तसेच ‘तुझे आहे तुजपाशी’ (१९५७) आणि ‘ती फुलराणी’ (१९७५) ही नाटके त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची साक्ष देतात. पु. ल. देशपांडे यांना १९६५ साली 'व्यक्ती आणि वल्ली' या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. पु. ल. देशपांडे १९७४ साली इचलकरंजी येथे झालेल्या ५० व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. १९९० मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरविले. पु. ल. देशपांडे त्या काळातील सर्वात लोकप्रिय आणि लाडके लेखक ठरले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
या व्यतिरिक्त या काळात ललित लेखनात अमूल्य योगदान देणाऱ्यात गो. नि. दांडेकर (१९१६-१९९८), व्यंकटेश माडगूळकर (१९२७-२००१), द. मा. मिरासदार (१९२७-२०२१), रणजित देसाई (१९२८-१९९२), व. पु. काळे (१९३२-२००१), भालचंद्र नेमाडे, इत्यादी मान्यवरांचा समावेश होतो.
गो. नी. दांडेकर यांनी इतिहास, पुराण आणि लोकजीवन यांचा सुंदर संगम साधणारे लेखन केले. ‘स्मरणगाथा’ आणि ‘जैत रे जैत’ या त्यांच्या साहित्यकृती विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांच्या लेखनात अध्यात्म, संस्कृती आणि निसर्ग यांचे प्रभावी चित्रण दिसते. १९७६ मध्ये ‘स्मरणगाथा’ या त्यांच्या आत्मचरित्रासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आणि १९८१ मध्ये ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
व्यंकटेश माडगूळकर यांनी ग्रामीण जीवनाचे वास्तववादी आणि हृद्य चित्रण केले. ‘बनगरवाडी’ आणि ‘वावटळ’ या त्यांच्या साहित्यकृतींनी मराठी साहित्यात वेगळे स्थान मिळवले. त्यांच्या लेखनात ग्रामीण समाजजीवनाचे सूक्ष्म निरीक्षण दिसते. १९८३ मध्ये ‘सत्तांतर’ या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आणि त्याच वर्षी ते मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
द. मा. मिरासदार हे ग्रामीण विनोदी साहित्याचे दिग्गज लेखक होते. ‘मिरासदारी’ आणि ‘गप्पागोष्टी’ या त्यांच्या पुस्तकांतून ग्रामीण जीवनातील विनोद आणि वास्तव जिवंत झाले. त्यांच्या लेखनात सहजता आणि खुमासदार शैली आढळते. १९९८ मध्ये ते मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
रणजित देसाई यांनी ऐतिहासिक कादंबरीला नव्या उंचीवर नेले. ‘स्वामी’, ‘श्रीमन् योगी’ आणि ‘पावनखिंड’ या त्यांच्या कादंबऱ्या विशेष गाजल्या. ऐतिहासिक व्यक्तिरेखा जिवंत करण्याची त्यांची ताकद लक्षणीय होती. ‘स्वामी’ या कादंबरीसाठी त्यांना १९६४ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, तर १९७३ मध्ये पद्मश्री सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले.
व. पु. काळे हे मराठीतील अत्यंत लोकप्रिय ललित लेखक म्हणून ओळखले जातात. ‘वपुर्झा’, ‘पार्टनर’ आणि ‘ही वाट एकटीची’ या त्यांच्या पुस्तकांतून मध्यमवर्गीय जीवनातील सूक्ष्म भावना आणि नातेसंबंधांचे जिवंत चित्रण दिसते. त्यांच्या सहज, ओघवत्या शैलीमुळे त्यांना प्रचंड वाचकप्रियता मिळाली. त्यांच्या साहित्याला महाराष्ट्र राज्य पुरस्कारानेही गौरविण्यात आले.
१९५० २००० या काळात बाबासाहेब पुरंदरे हे महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय इतिहासकार, अभ्यासक, लेखक आणि प्रभावी वक्ते होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा त्यांनी आयुष्यभर सखोल अभ्यास केला आणि शिवचरित्र सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे कार्य केले. त्यांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक योगदानाबद्दल भारत सरकारने २०१९ मध्ये ‘पद्मविभूषण’ हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान प्रदान केला.
भालचंद्र नेमाडे यांनी मराठी कादंबरीला नवा विचारप्रवाह दिला. ‘कोसला’, आणि ‘बिढार’ या त्यांच्या कादंबऱ्या वैचारिक दृष्ट्या महत्त्वाच्या ठरल्या. त्यांच्या लेखनात भाषिक जाणीवेचा यांचा ठसा दिसतो. १९९१ मध्ये त्यांना ‘टीका स्वयंवर’ या ग्रंथासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आणि २०१४ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांचा गौरव झाला.
समारोप
१९५० ते २००० हा कालखंड मराठी साहित्याच्या इतिहासात परिवर्तन, विस्तार आणि समृद्धीचा काळ म्हणून उभा राहतो. सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक बदलांच्या पार्श्वभूमीवर साहित्याने स्वतःचे स्वरूप बदलले आणि नव्या वास्तवाशी संवाद साधला. वैचारिक, ललित-वैचारिक आणि ललित अशा तिन्ही प्रवाहांनी परस्परपूरक पद्धतीने कार्य करत साहित्याला व्यापकता दिली. विचारांची खोली, लेखनातील विविधता आणि अनुभवांची समृद्धता या तिन्हींचा सुंदर संगम या काळात दिसून येतो.
या कालखंडातील लेखकांनी केवळ साहित्यनिर्मिती केली नाही, तर समाजाच्या जाणिवा घडवल्या. त्यांनी वास्तवाचा वेध घेतला, प्रश्न उपस्थित केले आणि माणसाच्या जीवनाला नव्या अर्थांनी समजून घेण्याची दृष्टी दिली. त्यामुळे मराठी साहित्य अधिक लोकाभिमुख, विचारप्रधान आणि संवेदनशील बनले. या सर्व प्रक्रियेमुळे १९५० ते २००० हा कालखंड मराठी साहित्याच्या उत्क्रांतीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरतो, असे निश्चितपणे म्हणता येते.