साहित्य (११ ते १४)
१९५० ते २०००
१९५० ते २००० हा काळ मराठी काव्याच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध आणि बहुआयामी ठरतो. स्वातंत्र्यानंतरचा उत्साह, नव्या राष्ट्रनिर्मितीची धडपड, समाजातील बदलती मूल्यव्यवस्था आणि व्यक्तीच्या अंतर्मनातील गुंतागुंत—या साऱ्यांचे प्रतिबिंब या काळातील कवितेत दिसते. या पन्नास वर्षांच्या प्रवासात मराठी कवितेने परंपरेपासून आधुनिकतेकडे, आणि पुढे सामाजिक जाणीवेकडे अशी महत्त्वाची वाटचाल केली. या प्रवासात अनेक दिग्गज कवी उदयाला आले आणि त्यांनी आपल्या लेखनातून मराठी काव्यविश्वाला नव्या उंचीवर नेले.
भावकवितेची परंपरा
१९५० च्या दशकात मराठी कवितेवर अजूनही पारंपरिक भावकवितेचा प्रभाव ठळकपणे दिसून येत होता. प्रेम, निसर्ग, विरह, आठवणी, जीवनातील कोमल भावभावना—हे या कवितेचे मुख्य केंद्र होते. या कवितेत भाषेची माधुर्यपूर्ण लय, शब्दांची नजाकत आणि भावनांचे प्रतिबिंब दिसते. पण ही कविता केवळ परंपरेपुरती मर्यादित राहिली नाही; ती नव्या काळाच्या संवेदनांनाही स्पर्श करू लागली. बदलत्या समाजजीवनात माणसाच्या भावविश्वात जे सूक्ष्म बदल घडत होते, त्यांचे प्रतिबिंब या कवितेत दिसू लागले.
या काळातील भावकवितेची एक महत्त्वाची वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे तिची प्रचंड लोकप्रियता. ही कविता केवळ पुस्तकांत किंवा साहित्यिक वर्तुळांत मर्यादित राहिली नाही, तर ती थेट जनमानसात पोहोचली. यामागे विविध माध्यमांची मोठी भूमिका होती. नाट्यसंगीताच्या परंपरेतून आलेली गीतकविता आधीपासूनच लोकप्रिय होती; पण या काळात भावगीत आणि सुगम संगीत या स्वरूपांतून कवितेला नवे आयाम मिळाले. कवींच्या रचनांना संगीतकारांनी सुरांची साथ दिली आणि गायकांच्या आवाजातून त्या घराघरांत पोहोचल्या. आकाशवाणी या माध्यमाने या प्रक्रियेला मोठे बळ दिले.
रेडिओ हे त्या काळातील अत्यंत प्रभावी माध्यम होते. भावगीते, काव्यवाचन आणि संगीत कार्यक्रमांमधून कविता थेट श्रोत्यांपर्यंत पोहोचली. आकाशवाणी मुळे अनेक कविता घराघरांत पोहोचून लोकप्रिय झाल्या. त्याचबरोबर मराठी चित्रपटांतील गीतांनीही काव्याला मोठी चालना दिली. चित्रपटांसाठी लिहिलेली गीते ही केवळ प्रसंगापुरती मर्यादित न राहता, स्वतंत्र काव्य म्हणून लोकांच्या मनात रुजली. नाट्यसंगीत, भावगीत, सुगम संगीत, आकाशवाणी आणि चित्रपट या माध्यमांच्या संगमामुळे कविता लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणावर पोहोचली. ती केवळ वाचण्यापुरती न राहता ऐकली आणि गुणगुणली जाऊ लागली, आणि त्यामुळे तिची लोकप्रियता अधिक व्यापक झाली.
या काळात ग. दि. माडगूळकर (१९१९–१९७७) यांचे नाव अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्यांनी गीतांच्या माध्यमातून मराठी मनावर अधिराज्य गाजवले. ‘गीतरामायण’ ही त्यांची निर्मिती केवळ काव्य नव्हे, तर एक सांस्कृतिक पर्व ठरली. त्यांच्या गीतांमध्ये लोकभाषेची सहजता, भावनांची प्रांजळता आणि आशयाची ताकद दिसते. साधी, बोलकी आणि थेट मनाला भिडणारी भाषा, कथात्मकता आणि लयबद्धता ही त्यांच्या लेखनशैलीची ठळक वैशिष्ट्ये होती. त्यामुळे त्यांची कविता सर्वसामान्यांपर्यंत सहज पोहोचली. त्यांनी अनेक गीतरचना, काव्यलेखन आणि चित्रपट-नाट्यसंगीतासाठी विपुल लेखन केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते ‘चैत्रबन’ (१९६२) ह्या नावाने संगृहीत आहेत. याव्यतिरिक्त ‘कविता–जोगिया’ (१९५६), गीत रामायण (१९५७), गीत गोपाल (१९६७) हे त्यांचे उल्लेखनीय काव्य संग्रह आहेत.
त्यांच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक योगदानाची दखल घेत त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले. १९७३ साली यवतमाळ येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे ते काही काळ नियुक्त सदस्य होते तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाचेही ते सदस्य होते. भारत सरकारने त्यांना पद्मश्री (१९६९) या सन्मानाने गौरविले. त्यांच्या कार्याला व्यापक सामाजिक आणि सांस्कृतिक मान्यता लाभली, हे या सन्मानांवरून स्पष्ट होते.
या काळात शांताबाई शेळके (१९२२–२००२) यांचे नाव अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्यांनी गीतांच्या आणि कवितांच्या माध्यमातून मराठी मनाला एक कोमल, संवेदनशील स्पर्श दिला. त्यांच्या कवितेत निसर्ग, प्रेम, आठवणी आणि स्त्रीमनातील सूक्ष्म भावविश्व अत्यंत सुंदरपणे व्यक्त झाले. ‘तोच चंद्रमा नभात’, ‘शब्दावाचून कळले सारे’ यांसारखी अनेक गीते लोकप्रिय ठरली. त्यांनी अनेक गीतरचना, भावगीते, तसेच काव्यसंग्रह लिहिले आणि मराठी गीतकाव्य समृद्ध केले. शांता शेळके यांच्या विपुल साहित्यापैकी काही विशेष गाजलेले काव्यसंग्र म्हणजे, ‘वर्षा’ (१९४७), ‘रूपसी’ (१९५६), ‘गोंदण’ (१९७५), ‘तोच चंद्रमा’ (१९७३), ‘जन्मजान्हवी’ (१९९०). शांताबाईंनी लहान मुलांसाठीही गोड कविता लिहिल्या आहेत. ‘चिमणचारा’ (१९६०), ‘थुई थुई नाच मोरा’ (१९६१), ‘टिप टिप चांदणी’ (१९६६) या संग्रहांमधील कविता आजही मराठी साहित्यात आणि संगीतात महत्त्वाचे स्थान टिकवून आहेत. त्यांच्या साहित्यिक योगदानाची दखल म्हणून १९९६ साली आळंदी येथे पार पडलेल्या ६९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.
या काळात मंगेश पाडगावकर (१९२९–२०१५) यांचे नावही तितकेच उल्लेखनीय आहे. त्यांनी प्रेम, नातेसंबंध आणि जीवनातील साध्या भावनांना अत्यंत सहज आणि गेय भाषेत व्यक्त केले. त्यांच्या कवितेत साधेपणा, लयबद्धता आणि संवादशीलता दिसते. त्यांनी अनेक काव्यसंग्रह, गीते आणि अनुवाद लिहून मराठी काव्यविश्व समृद्ध केले. ‘धारानृत्य’ (१९५०), जिप्सी' (१९५२), 'छोरी' (१९५४), 'उत्सव' (१९६२), 'विदुषक' (१९६६), 'सलाम' (१९७८), 'गझल' (१९८३), 'भटके पक्षी' (१९८४), ‘तुझे गीत गाण्यासाठी’ (१९८९), 'बोलगाणी' (१९९०) हे पाडगावकर यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. मीरा, कबीर आणि तुलसीदास यांच्या कवितांचे भावानुवादही पाडगावकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले होते. 'भोलानाथ, 'बबलगम', 'चांदोमामा' हे त्यांचे बालकविता संग्रह प्रसिद्ध आहेत. १९६४ मध्ये प्रकाशित झालेला 'वात्रटिका'या कवितासंग्रहाने पाडगावकर यांची एक वेगळी ओळख करुन दिली. मंगेश पाडगावकर यांना १९८० साली त्यांच्या 'सलाम' या कवितासंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाडगावकरांचे , ‘जिप्सी’, ‘सलाम’, हे काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध झाले. भारत सरकारने साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल २०१३ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. त्यांना २००८ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.
याच काळात पी. सावळाराम (१९१४–१९९८) आणि जगदीश खेबुडकर (१९३२–२०११) या गीतकारांनीही मराठी भावकवितेला लोकाभिमुख रूप दिले. सावळाराम यांच्या गीतांत स्त्रीमन आणि भक्तीभाव दिसतो, तर खेबुडकर यांच्या लेखनात ठसकेदार शैली आणि मराठी अस्मितेची जाणीव प्रकर्षाने व्यक्त होते. दोघांनीही चित्रपट, नाट्यसंगीत आणि भावगीतांच्या माध्यमातून विपुल लेखन केले. त्यांची गीते सर्वसामान्यांच्या जीवनाचा भाग बनली. त्यांच्या योगदानामुळे मराठी गीतकाव्य अधिक व्यापक आणि लोकाभिमुख झाले. पी. सावळाराम यांच्या गीतांचा संग्रह ‘गंगा जमुना’ या नावाने प्रसिद्ध झाला.
मराठी काव्यविश्वात गझल या काव्यप्रकाराला स्वतंत्र आणि लोकप्रिय स्थान मिळवून देण्याचे श्रेय सुरेश भट (१९३२–२००३) यांना जाते. त्यांनी उर्दू गझलेची परंपरा आत्मसात करत तिला मराठी भाषेत प्रभावीपणे रुजवले आणि गझलला नवे, समकालीन रूप दिले. ‘रूपगंधा’ (१९६१), ‘रंग माझा वेगळा’ (१९७४), ‘एल्गार’ (१९८३), ‘झंझावात’ (१९९४), ‘सप्तरंग’ (२००२) यांसारख्या त्यांच्या संग्रहांनी मराठी काव्यविश्वात वेगळा ठसा उमटवला. त्यांच्या गझलांमध्ये प्रेम, विरह, वेदना, सामाजिक अस्वस्थता आणि मानवी मनातील ताण यांचे अत्यंत प्रभावी चित्रण दिसते. मराठी गझल परंपरेचे ते प्रमुख शिल्पकार म्हणून ओळखले जाऊ लागले.
या काळात इंदिरा संत (१९१४–२०००), बा. भ. बोरकर (१९१०–१९८४) आणि वसंत बापट (१९२२–२००२) यांची नावेही विशेष उल्लेखाने घ्यावी लागतात. या तिन्ही कवींनी मराठी कवितेला संवेदनशीलता, वैचारिकता आणि सौंदर्यदृष्टीची वेगवेगळी रूपे दिली.
इंदिरा संत यांनी आपल्या कवितांमधून स्त्रीमनातील सूक्ष्म भावना आणि नात्यांतील कोमल छटा यांचे प्रभावी चित्रण केले. ‘मेंदी’ (१९५५), ‘मृगजळ’ (१९५७), ‘रंगबावरी’ (१९६४) आणि ‘गर्भरेशीम’ (१९८२) हे त्यांचे महत्त्वाचे काव्यसंग्रह मराठी भावकवितेतील मोलाचे टप्पे मानले जातात. ‘गर्भरेशीम’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना १९८४ साली साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बा. भ. बोरकर यांच्या कवितेत निसर्ग, संगीत, अध्यात्म आणि सौंदर्यदृष्टी यांचा सुरेल संगम दिसतो. ‘आनंद भैरवी’ (१९५०), ‘चित्रवीणा’ (१९६०), ‘गीतार’ (१९६६), ‘चैत्रपुनव’ (१९७०) आणि ‘कांचनसंध्या’ (१९८१) हे त्यांचे उल्लेखनीय काव्यसंग्रह होत. वसंत बापट यांच्या कवितेत राष्ट्रभावना, सामाजिक जाणीव आणि तरुणाईची ऊर्जा यांचा प्रभावी आविष्कार दिसतो. ‘बिजली’ (१९५२), ‘सेतु’ (१९५७), ‘अकरावी दिशा’ (१९६२), ‘सकीना’ (१९७२) आणि ‘मानसी’ (१९७७) हे त्यांचे महत्त्वाचे काव्यसंग्रह मराठी काव्यविश्वात विशेष मानले जातात.
याच काळात ग्रामीण जीवन आणि मातीतल्या संवेदनांना शब्द देणारे ना. धों. महानोर (१९४२–२०२३), साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ना. घ. देशपांडे (१९०९–२०००), संवेदनशील भावकवयित्री संजीवनी मराठे (१९१६–२०००) आणि बालगीतांच्या माध्यमातून लोकप्रिय ठरलेल्या वंदना विटणकर यांसारख्या कवींनीही मराठी काव्यसृष्टीत मोलाचे योगदान दिले.
नवकाव्याचा उदय
१९६० च्या सुमारास मराठी काव्यविश्वात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला, तो म्हणजे नवकाव्याचा उदय. पारंपरिक भावकवितेच्या मर्यादा ओलांडत, नव्या काळातील अस्वस्थता, शहरी जीवनातील एकाकीपणा, तुटलेली नाती आणि अस्तित्वाचे प्रश्न यांना अभिव्यक्त करण्यासाठी नवे काव्यरूप आकाराला आले. या प्रवाहात मुक्तछंदाचा स्वीकार झाला, कविता अधिक अंतर्मुख, वैचारिक आणि चिंतनशील झाली. नवकाव्याने मराठी कवितेला नवे भान दिले. ती केवळ भावनांची अभिव्यक्ती न राहता विचारांचे, प्रश्नांचे आणि आत्मशोधाचे माध्यम बनली.
१९४० च्या अखेरीस–१९५० च्या सुरुवातीला मराठी कवितेत आधुनिकतेची बीजे रोवण्याचे श्रेय बा. सी. मर्ढेकर (१९०९–१९५६) यांना जाते. ‘शिशिरागम’ हा प्रारंभीचा संग्रह पारंपरिक होता; पण ‘काही कविता’ व ‘आणखी काही कविता’ यांनी नवकाव्याची ठळक सुरुवात करून साहित्यविश्वात खळबळ उडवली. त्यांच्या कवितेत महानगरीय बकालपणा, नैराश्य, आणि यंत्रयुगातील तुटलेपण प्रभावीपणे येते. युद्धोत्तर अस्थिरता व औद्योगिकीकरणामुळे झालेली मूल्यांची पडझड हे केंद्रस्थानी विषय होते. पाश्चात्य आधुनिकतावाद व भारतीय परंपरेचा संगम, आणि जुन्या शैलीविरुद्ध बंड हे त्यांचे वैशिष्ट्य. ते साहित्य समीक्षकही होते; ‘सौंदर्य आणि साहित्य’ (१९५६) या ग्रंथसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
विंदा करंदीकर हे मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे आणि प्रभावी कवी मानले जातात. त्यांना निश्चितपणे नवकाव्य (आधुनिक काव्य) या प्रवाहात स्थान द्यावे लागते. ते बा. सी. मर्ढेकर यांच्या बरोबरीने मराठी नवकाव्याचे प्रमुख आधारस्तंभ मानले जातात. विंदांच्या कवितेची वैशिष्ट्ये पाहिली तर त्यांचे नवकाव्यातील स्थान अधिक स्पष्ट होते. पारंपरिक कवितेतील निसर्ग, प्रेम किंवा भावनात्मकतेपुरते मर्यादित विश्व त्यांनी विस्तारले. त्यांनी यंत्रयुग, सामाजिक विषमता, गरिबी आणि मानवी संघर्ष यांसारखे वास्तववादी विषय कवितेत आणले. त्यांनी पारंपरिक यमक-वृत्तांच्या चौकटी मोडून मुक्तछंदाचा प्रभावी वापर केला. त्यामुळे त्यांच्या कवितेला नवे रूप आणि व्यापकता मिळाली. जुन्या छंदांचे, वृत्तांचे, अभंग-ओवी यांसारख्या पारंपरिक रचनापद्धतींचा वापर त्यांनी केला. परंतु त्या चौकटीतही त्यांनी विचार मात्र पूर्णपणे आधुनिक मांडले.
त्यांच्या कवितेत मार्क्सवादी सामाजिक बांधिलकी आणि अद्वैत तत्त्वज्ञानाचा सुरेख मेळ दिसतो. 'स्वेदगंगा' (१९४९), 'मृद्गंध' (१९५४), 'ध्रुपद' (१९५९), 'जातक' (१९६८) आणि 'विरूपिका' (१९८१) हे त्यांचे प्रमुख काव्यसंग्रह होत. त्यांना २००३ साली प्रतिष्ठित 'ज्ञानपीठ पुरस्कार' प्राप्त झाला.
समारोप
१९५० ते २००० हा कालखंड मराठी काव्यविश्वाच्या दृष्टीने अत्यंत परिवर्तनशील आणि समृद्ध ठरतो. स्वातंत्र्योत्तर काळातील सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक बदलांचे प्रतिबिंब या काळातील कवितेत स्पष्टपणे उमटलेले दिसते. या पन्नास वर्षांच्या प्रवासात मराठी कवितेने परंपरेचा आधार कायम ठेवत आधुनिकतेचा स्वीकार केला आणि नव्या संवेदनांना अभिव्यक्त करण्यासाठी सतत स्वतःचे रूप बदलले.
या काळातील भावकवितेने मराठी मनाला विशेष स्पर्श केला. प्रेम, विरह, निसर्ग, आठवणी, मानवी नात्यांतील कोमलता आणि जीवनातील भावविश्व यांचे प्रभावी चित्रण या कवितेत दिसते. ग. दि. माडगूळकर, शांताबाई शेळके, मंगेश पाडगावकर, इंदिरा संत, बा. भ. बोरकर, वसंत बापट, पी. सावळाराम, जगदीश खेबुडकर यांसारख्या कवींनी मराठी कवितेला गेयता, संवेदनशीलता आणि लोकाभिमुखता दिली. भावगीत, सुगम संगीत, नाट्यसंगीत, आकाशवाणी आणि चित्रपट या माध्यमांमुळे कविता थेट जनमानसात पोहोचली. त्यामुळे कविता ही केवळ पुस्तकांपुरती मर्यादित न राहता लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली.
याच काळात मराठी कवितेत नवकाव्याचा उदय झाला आणि कवितेने आधुनिकतेचे नवे भान स्वीकारले. बा. सी. मर्ढेकर यांनी या प्रवाहाची पायाभरणी केली, तर विंदा करंदीकर यांनी त्याला वैचारिक आणि कलात्मक विस्तार दिला. नवकाव्यामुळे कविता अधिक अंतर्मुख, चिंतनशील आणि वास्तवाभिमुख झाली. अस्तित्वाचे प्रश्न, शहरी जीवनातील ताण, यंत्रयुगातील एकाकीपणा आणि बदलत्या मूल्यव्यवस्थेची अस्वस्थता या विषयांना कवितेत स्थान मिळाले. मुक्तछंद, नव्या प्रतिमा आणि वेगळी अभिव्यक्ती यांमुळे मराठी कवितेला नवे रूप प्राप्त झाले.
या कालखंडात सुरेश भट यांनी मराठी गझलेला स्वतंत्र ओळख मिळवून दिली, तर ना. धों. महानोर, ना. घ. देशपांडे, संजीवनी मराठे, वंदना विटणकर यांसारख्या कवींनी ग्रामीण जीवन, भावविश्व आणि बालसाहित्य यांना समृद्ध केले. त्यामुळे मराठी कवितेचा आशय अधिक व्यापक आणि बहुआयामी बनला.
एकूणच, १९५० ते २००० या काळातील मराठी कविता ही परंपरा आणि आधुनिकता, सौंदर्य आणि वास्तव, वैयक्तिक भावना आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम म्हणून उभी राहते. या कवितेने मराठी समाजाच्या भावविश्वाला शब्द दिले, बदलत्या काळाचे प्रतिबिंब दाखवले आणि संवेदनशीलतेची नवी दृष्टी निर्माण केली. म्हणूनच या कालखंडातील मराठी काव्यविश्व हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि समृद्ध पर्व मानावे लागते.