रंगभूमी व चित्रसृष्टी (१ ते ३)
१९५० ते २०००
१९५० ते २००० हा काळ मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळात संगीत, व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांनी मुख्य प्रवाह घडवला; पण त्याच वेळी समाजाच्या तळागाळाशी जोडलेले काही समांतर प्रवाहही ताकदीने पुढे आले. तमाशा, कामगार रंगभूमी, दलित रंगभूमी आणि बालरंगभूमी हे प्रवाह प्रस्थापित रंगभूमीच्या चौकटीबाहेर उभे राहिले, तरी त्यांनी मराठी नाटकाला नवा आशय आणि नवे प्रेक्षक दिले. लोकजीवनातील संघर्ष, शोषण, विद्रोह, स्वाभिमान आणि जीवन मूल्य यांचे थेट दर्शन या रंगभूमींने घडवले. या प्रवाहांनी नाटक केवळ करमणुकीचे माध्यम न ठेवता सामाजिक जागृतीचे प्रभावी साधन बनवले. या भागात या समांतर रंगभूमींचा प्रवास, त्यांची वैशिष्ट्ये आणि मराठी नाट्यसृष्टीला दिलेले योगदान यांचा संक्षिप्त आढावा घेण्यात आला आहे.
तमाशा रंगभूमीचे नवे वळण
तमाशा हा महाराष्ट्रातील लोकप्रिय लोकनाट्य प्रकार असून, दीर्घकाळ तो केवळ करमणुकीपुरता मर्यादित होता. लावणी, नृत्य आणि विनोद यांवर त्याचा भर होता. मात्र विसाव्या शतकाच्या मध्यावर अण्णाभाऊ साठे यांनी या परंपरेत मूलभूत बदल घडवून आणले आणि त्यातून १९५० नंतर तमाशाला सामाजिक आशयाचे वळण मिळाले. स्वातंत्र्यचळवळ, सामाजिक विषमता आणि वर्गसंघर्षाच्या अनुभवातून घडलेल्या अण्णाभाऊंनी कष्टकरी, दलित आणि उपेक्षितांच्या जीवनाचे वास्तव तमाशामध्ये समाविष्ट केले.
अण्णाभाऊ साठे यांच्या माध्यमातून तमाशाला सामाजिक आशय प्राप्त झाला. पारंपरिक देवपूजेचा ‘गण’ बदलण्यात आला आणि त्याऐवजी अन्याय, शोषण आणि संघर्ष मांडणारा नवा ‘गण’ निर्माण करण्यात आला. त्यांच्या ‘पुढारी मिळाला’ या नाटकात समाजाला दिशा देण्याऐवजी स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या पुढाऱ्यांची उपहासात्मक मांडणी आहे. खोटी आश्वासने, भावनिक घोषणाबाजी आणि भोळ्या जनतेचा गैरफायदा हे मुद्दे ठळकपणे मांडले आहेत. हसत-खेळत प्रेक्षकांना विचार करायला लावणे हेच या नाटकाचे वैशिष्ट्य आहे. तर ‘खापऱ्या चोर’ मधून समाजातील अंधश्रद्धा आणि भोळ्या समजुतींवर प्रहार करण्यात आला. ‘शेटजींचे इलेक्शन’ या लोकनाट्यातून भांडवलशाहीच्या माध्यमातून होणारा सत्तेचा गैरवापर आणि गरिबांचे होणारे शोषण उघड करण्यात आले.
त्यांची साधी आणि बोली भाषा थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. तमाशा हा केवळ करमणुकीपुरता मर्यादित नसून लोकप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे, हे अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यातून सिद्ध झाले. परंपरेला सामाजिक अर्थ देऊन तमाशाला जनजीवनाशी जोडण्यात आले. हेच त्यांचे ऐतिहासिक योगदान म्हणून मानले जाते.
कामगार रंगभूमी
औद्योगिकरणामुळे खेडी आणि पिढीजात व्यवसाय सोडून मुंबईत गिरण्यांत कामाला आलेल्या कामगारांनी गणेशोत्सव आणि इतर सणांमध्ये नाटके सादर करण्यास सुरुवात केली. हळूहळू या नाटकांत त्यांच्या रोजच्या जीवनातील प्रश्न, भांडवलदारांची पिळवणूक, स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा व्यक्त होऊ लागल्या. यातून कामगारांनी कामगारांसाठी सादर केलेली कामगार रंगभूमी निर्माण झाली. १९४० च्या दशकात या रंगभूमीचा उदय झाला. मात्र १९५० ते २००० या कालखंडात तिचा प्रवास, उत्कर्ष आणि उतरंड हे टप्पे स्पष्टपणे दिसून येतात.
१९५० ते १९८० हा काळ कामगार रंगभूमीचा सुवर्णकाळ मानला जातो. स्वातंत्र्यानंतरच्या काळात कामगार रंगभूमीने मराठी नाटकाचा नवा प्रेक्षक निर्माण केला. गिरणगाव, लालबाग–परळ, भायखळा, तसेच कोकण आणि मुंबईच्या उपनगरांमध्ये या नाटकांचे प्रयोग मोठ्या प्रमाणावर होत. शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, मामा वरेरकर इत्यादींनी रंगमंचाच्या माध्यमातून कामगारांच्या जाणिवा रंगभूमीवर मांडल्या. ‘सत्तेचे गुलाम’ आणि ‘सोन्याचा कळस’ यांसारख्या नाटकांतून कामगारांचे शोषण आणि संघर्ष ठळकपणे मांडले गेले.
कामगार रंगभूमीवरील एक महत्त्वाचे नाव म्हणजे राजाराम शिंदे. ते नट, दिग्दर्शक व निर्माते होते. उपजीविकेसाठी त्यांनी गिरणीत मजुरी आणि पेपर वाटप केले. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी ‘नाट्यमंदार’ व ‘नाट्यशृंगार’ संस्थांची स्थापना केली. सहकारी तत्त्वावर ‘अभिनव नट संघ’ स्थापन केला. त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवरही अनेक नाटके सादर केली. कामगार रंगभूमीवर याशिवाय अनेक दिग्गज कलाकार घडले होते किंवा त्यांनी या रंगभूमीला मोलाची साथ दिली होती. मा. दत्ताराम, शंकर घाणेकर, बाबासाहेब नाईक आणि राजाराम गावडे हे कामगार रंगभूमीवरील अत्यंत महत्त्वाचे नट होते. या कलाकारांनी अत्यंत तुटपुंज्या मानधनावर काम करून कामगार रंगभूमी जिवंत ठेवली.
मात्र १९९० नंतर कामगार रंगभूमीचा ऱ्हास सुरू झाला. जागतिकीकरण, खासगीकरण, गिरणी उद्योगाचा अंत आणि कामगार–मध्यमवर्गातील सीमारेषा पुसट होणे ही त्यामागची प्रमुख कारणे ठरली. कामगार चळवळीचे राजकीय आणि सामाजिक अधिष्ठान कमकुवत झाले.
तरीही, १९५० ते २००० या काळात कामगार रंगभूमीने मराठी नाट्यसृष्टीला दिलेले योगदान मोलाचे आहे. तिने नाटकाला लोकांच्या जगण्यात रुजवले आणि अनेक प्रतिभावंत कलाकार घडवले, हीच तिची खरी कामगिरी मानावी लागेल.
मराठी दलित रंगभूमी
महात्मा फुले यांनी लिहिलेले ‘तृतीयरत्न’ हे नाटक दलित नाट्यलेखनाचे पहिले महत्त्वाचे पाऊल मानले गेले. या नाटकात शूद्र समाजावर ब्राह्मण वर्गाकडून होणाऱ्या शोषणाचे वास्तव मांडले गेले. शिक्षण हेच शोषणाच्या विरुद्ध लढण्याचे प्रभावी माध्यम आहे, हा संदेश या नाटकातून दिला.
पुढे आंबेडकरांच्या प्रेरणेतून समाजाच्या व्यथा, वेदना आणि दुःख यांना नाट्यात्मक पद्धतीने मांडून समाजापुढे आणण्याच्या कल्पनेतून दलित रंगभूमी आकाराला आली. १९८० ते १९९० हा काळ दलित रंगभूमीचा महत्त्वाचा टप्पा ठरला. या काळात दलित नाट्यसंमेलने आयोजित झाली, ‘दलित रंगभूमी’ हे मासिक सुरू झाले आणि अनेक शहरांत ही चळवळ सक्रिय झाली. भि. शि. शिंदे, टेक्सास गायकवाड, रामनाथ चव्हाण, प्रेमानंद गज्वी, प्रा. दत्ता भगत यांसारख्या नाटककारांनी दलित जीवनातील वेदना, विद्रोह आणि स्वाभिमान रंगमंचावर मांडला. ‘काळेखाच्या गर्भात’, ‘बायको मी देवाची’, ‘तनमाजोरी’, ‘वाटेवरचा वाटसरू’ यांसारख्या नाटकांनी जातीव्यवस्था, शोषण, अपमान आणि विद्रोह यांचे तीव्र आणि प्रभावी चित्रण केले. त्यामुळे मराठी रंगभूमीला नवा सामाजिक आशय मिळाला आणि अस्वस्थतेची जाणीव निर्माण झाली.
दलित साहित्य आणि दलित रंगभूमी यांचे नाते जवळचे असले, तरीही प्रेक्षकांचा अभाव, संस्थात्मक पाठबळाची कमतरता आणि मुख्य प्रवाहाशी असलेला दुरावा यांमुळे दलित रंगभूमी दीर्घकाळ टिकू शकली नाही. १९८० नंतर बदललेल्या सामाजिक-राजकीय परिस्थितीचा तिच्यावर प्रतिकूल परिणाम झाला. दलित रंगभूमी ही मानवी सन्मान, समता आणि न्याय यांची मागणी करणारी एक महत्त्वाची सांस्कृतिक चळवळ होती. जरी ती हळूहळू क्षीण झाली, तरी मराठी रंगभूमीला दिलेला वैचारिक पाया आणि सामाजिक प्रश्नांची थेट मांडणी हे तिचे अमूल्य योगदान ठरले.
बाल रंगभूमीचा विकास
बालरंगभूमी ही लहान मुलांच्या वयोगटासाठी तयार केलेली, रंगभूमीची स्वतंत्र आणि महत्त्वाची शाखा आहे. लहान मुलांची कल्पनाशक्ती, कुतूहल आणि वयानुसार निर्माण होणारे प्रश्न लक्षात घेऊन खास त्यांच्यासाठी नाटके सादर केली जातात. करमणुकीबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास, संस्कार आणि संवेदनशीलता घडवणे हे तिचे मुख्य उद्दिष्ट आहे.
१९६० नंतर बालरंगभूमी स्वतंत्र प्रवाह म्हणून विकसित झाली. बदलत्या शिक्षणपद्धती आणि सांस्कृतिक धोरणांमुळे बालनाट्याला स्वतंत्र ओळख मिळाली. शालेय शिक्षणासोबत कला व नाट्याच्या माध्यमातून सर्वांगीण विकासावर भर दिला गेला. बालनाटकांमध्ये परीकथा, लोककथा, साहसकथा तसेच मुलांच्या दैनंदिन जीवनातील प्रश्न, भीती, मैत्री, प्रामाणिकपणा व धैर्य यांचा आशय असतो. विनोद व खेळकरपणामुळे ही नाटके उपदेशक न वाटता सहजपणे मुलांवर प्रभाव टाकतात. रंगीबेरंगी वेशभूषा, कल्पक नेपथ्य, संगीत, नृत्य, प्रकाश व ध्वनी परिणाम यामुळे नाट्यअनुभव अधिक आकर्षक होतो.
मराठी बालरंगभूमीच्या विकासात सुधा करमरकर, रत्नाकर मतकरी, सई परांजपे, पु. ल. देशपांडे व श्रीधर राजगुरू यांचे योगदान महत्त्वाचे आहे. ‘अलबत्त्या गलबत्त्या’, ‘निम्मा शिम्मा राक्षस’, ‘अल्लादीन आणि जादूचा दिवा’ यांसारखी नाटके विशेष गाजली. आज बालरंगभूमी ही करमणूक, शिक्षण व सर्जनशीलतेची प्रभावी चळवळ म्हणून विकसित झाली आहे.
या समांतर प्रवाहांकडे एकत्रितपणे पाहिले, तर मराठी रंगभूमीचा इतिहास अधिक व्यापक आणि बहुआयामी स्वरूपात समोर येतो. तमाशाने लोकनाट्याला सामाजिक अर्थ दिला; कामगार रंगभूमीने कष्टकरी वर्गाच्या जगण्याला व्यासपीठ मिळवून दिले; दलित रंगभूमीने अन्याय, अपमान आणि विद्रोह यांना वाचा फोडली; तर बालरंगभूमीने भावी पिढीच्या जडणघडणीत रंगभूमीची भूमिका अधोरेखित केली. हे प्रवाह मुख्य रंगभूमीच्या कडेला उभे राहिले असले, तरी त्यांनी नाटकाला जनसामान्याशी घट्ट जोडले. सामाजिक वास्तव, जीवनाचे मूल्य आणि आत्मसन्मान यांची जाणीव या रंगभूमींनी सातत्याने जागृत ठेवली. त्यामुळे मराठी नाट्यसृष्टीचा सुवर्णकाळ केवळ व्यावसायिक यशापुरता मर्यादित न राहता, सामाजिक आशय आणि सांस्कृतिक जबाबदारीनेही समृद्ध ठरला, असेच म्हणावे लागेल.
समारोप
१९५० ते २००० हा काळ आधुनिक मराठी रंगभूमीच्या विकासाचा, विस्ताराचा आणि वैचारिक परिपक्वतेचा महत्त्वाचा टप्पा ठरला. संगीत रंगभूमीने परंपरेचे पुनरुज्जीवन केले, व्यावसायिक रंगभूमीने व्यापक लोकप्रियता मिळवली, तर प्रायोगिक रंगभूमीने नाटकाला नवे वैचारिक आणि कलात्मक आयाम दिले. याचबरोबर तमाशा, कामगार, दलित आणि बालरंगभूमी या समांतर प्रवाहांनी मराठी नाटक अधिक लोकाभिमुख आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील बनवले.
या काळातील मराठी नाटकाने केवळ करमणूक केली नाही, तर समाजातील बदल, संघर्ष, अन्याय, नातेसंबंध, सत्तासंबंध आणि मानवी मनातील गुंतागुंत यांचे प्रभावी चित्रण केले. विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर, कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर यांसारख्या नाटककारांनी मराठी रंगभूमीला राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून दिली. कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि तंत्रज्ञ यांच्या सामूहिक योगदानामुळे रंगभूमी अधिक समृद्ध होत गेली.
१९९० नंतर दूरचित्रवाणी, चित्रपट आणि नव्या मनोरंजन माध्यमांमुळे रंगभूमीसमोर आव्हाने उभी राहिली; तरीही मराठी नाटकाने बदलत्या काळाशी जुळवून घेत स्वतःची ओळख टिकवून ठेवली. प्रयोगशीलता, सामाजिक भान आणि प्रेक्षकांशी असलेला जिवंत संवाद ही मराठी रंगभूमीची मोठी ताकद ठरली.
म्हणूनच आधुनिक मराठी रंगभूमीचा इतिहास हा केवळ नाटकांचा इतिहास नाही; तो महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक परिवर्तनाचाही इतिहास आहे.