विचार प्रवाह (१७ ते १९)
१९५० ते २०००
महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावर विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक विचारप्रवाहांचा प्रभाव पडला. समाजवाद, गांधीवाद, आंबेडकरी चळवळ, इत्यादी. डाव्या विचारसरणीबरोबरच हिंदुत्ववाद हाही एक प्रभावी विचारप्रवाह म्हणून पुढे आला. हा प्रवाह केवळ राजकीय नव्हता. त्याने समाजजीवन, सांस्कृतिक व्यवहार, धार्मिक ओळख, राष्ट्रवाद, शिक्षण, स्वयंसेवी कार्य, युवक संघटन आणि जनमानस यांवर दीर्घकालीन परिणाम घडवले. १९५० ते २००० या काळात महाराष्ट्रात हिंदुत्ववादाचा प्रभाव सातत्याने वाढत गेला. या प्रवासात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा, जनसंघ, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांसारख्या संघटनांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
हिंदुत्ववादाची पार्श्वभूमी
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भारतात सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विचारातून ‘हिंदुत्व’ ही संकल्पना आकाराला आली. विशेष म्हणजे या विचाराला वैचारिक आणि संघटनात्मक स्वरूप देणाऱ्या दोन महत्त्वाच्या प्रवाहांचा उगम महाराष्ट्रातच झाला.
विनायक दामोदर सावरकर यांनी ‘हिंदुत्व’ या ग्रंथातून हिंदुत्वाची संकल्पना मांडली. त्यांच्या मते, समान इतिहास, संस्कृती आणि राष्ट्रीय स्मृती यांवर भारतीय राष्ट्राची उभारणी व्हावी. पुढे १९२५ मध्ये डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करून या विचाराला संघटनात्मक आधार दिला. शाखा, शिस्त, स्वयंसेवा आणि व्यक्तिनिर्मिती यांच्या माध्यमातून संघाने राष्ट्रभक्ती आणि हिंदू ऐक्याची भावना समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे सावरकरांचे वैचारिक योगदान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटनकार्य यांमुळे हिंदुत्ववादी विचारप्रवाहाचा विस्तार महाराष्ट्रातून देशभर झाला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांची हत्या झाली. नथुराम गोडसे हा पूर्वी संघाशी संबंधित होता, या कारणामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली. या घटनेनंतर संघाविषयी समाजात संशय आणि अविश्वास निर्माण झाला. अनेक स्वयंसेवकांना अटक झाली. संघाचे कार्य जवळजवळ थांबले. १९४९ मध्ये संघाने आपली लिखित घटना तयार केली. संघाचे कार्य कशा पद्धतीने चालेल, संघटनरचना काय असेल आणि संघाची उद्दिष्टे कोणती असतील, याची रूपरेषा या घटनेत निश्चित करण्यात आली. त्यानंतर जुलै १९४९ मध्ये संघावरील बंदी उठवण्यात आली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य उद्दिष्ट सुसंघटित आणि सशक्त हिंदू समाज निर्माण करणे हे होते. संघाच्या मते, जातिभेद, प्रांतीयता आणि सामाजिक विस्कळीतपणामुळे भारतीय समाज दुर्बल झाला होता. त्यामुळे हिंदूंमध्ये एकात्मता आणि राष्ट्रीय भावना निर्माण करणे आवश्यक आहे, असा विचार संघाने मांडला.
या उद्दिष्टासाठी संघाने व्यक्तिनिर्मिती आणि संघटनांवर भर दिला. शाखांमधून व्यायाम, खेळ, शिस्त आणि सामूहिक उपक्रमांद्वारे युवकांमध्ये संघभावना व देशभक्ती विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जात, भाषा आणि प्रदेश यांपलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे, असा संदेश दिला गेला.
संघाच्या मते, केवळ राजकीय स्वातंत्र्य पुरेसे नसून समाज संघटित आणि राष्ट्रनिष्ठ असणेही आवश्यक आहे. त्यामुळे सामाजिक सेवा, शिक्षण, ग्रामीण विकास आणि आपत्ती निवारण यांसारख्या क्षेत्रांतही संघाने कार्य केले. अशा प्रकारे हिंदू समाजाच्या संघटनातून राष्ट्रबांधणीचा विचार पुढे मांडण्यात आला.
१९५० ते २००० या पन्नास वर्षांच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वावर महाराष्ट्राचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. या काळातील बहुतांश काळ संघाचे सरसंघचालक मराठी होते. माधव सदाशिव गोळवलकर (१९०६-१९७३) अर्थात ‘श्री गुरुजी’ यांनी १९४० ते १९७३ या काळात संघाचे नेतृत्व केले. त्यांच्या कार्यकाळात संघाचा देशभर मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आणि संघटनात्मक पायाभरणी अधिक मजबूत झाली. त्यानंतर मधुकर दत्तोपंत देवरस (१९१५-१९९६) अर्थात बाळासाहेब देवरस यांनी १९७३ ते १९९४ या काळात सरसंघचालक म्हणून काम पाहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने सामाजिक सेवा, समरसता आणि समाजसंपर्काच्या कार्याला अधिक गती दिली. १९५० ते १९९४ मध्ये प्रो. राजेंद्र सिंह अर्थात ‘रज्जू भैया यांच्याकडे नेतृत्व जाईपर्यंत म्हणजे जवळजवळ चव्वेचाळीस वर्षांच्या कालखंडात संघाचे सर्वोच्च नेतृत्व मराठी व्यक्तींकडेच होते. त्यामुळे संघाच्या वैचारिक आणि संघटनात्मक घडणीत महाराष्ट्राचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर जाणवतो.
संघ परिवार
१९५० ते २००० या काळात संघाने अनेक क्षेत्रांत काम केले. यासाठी त्या त्या विषयांसाठी स्वायत्त संस्था निर्माण करण्यात आल्या. या सर्व संस्थांना ‘संघ परिवार’ असे संबोधण्यात आले. शिक्षण, सेवा, ग्रामीण विकास, वनवासी कल्याण, कामगार संघटना, विद्यार्थी संघटना, महिला संघटना, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आपत्ती निवारण या क्षेत्रांत संघ परिवाराच्या विविध संस्थांनी काम केले.
१९४९ मध्ये स्थापन झालेल्या ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ने विद्यार्थी क्षेत्रात काम सुरू केले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वगुण विकसित करणे हे तिचे प्रमुख उद्दिष्ट होते. शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर भूमिका मांडणे आणि युवकांना सामाजिक कार्यासाठी प्रेरित करणे यावरही परिषदेने भर दिला. मुंबईहून कार्यरत असलेले प्रा. यशवंतराव केळकर (१९२५-१९८७) हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रमुख प्रेरणास्थान आणि संस्थापकांपैकी एक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या संघटनेची वैचारिक आणि संघटनात्मक पायाभरणी झाली. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रमुख कार्यालयही मुंबईमध्येच स्थापन करण्यात आले.
कामगार क्षेत्रात १९५५ मध्ये ‘भारतीय मजदूर संघा’ची स्थापना झाली. कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करताना औद्योगिक शांतता टिकवून ठेवणे आणि कामगारांना न्याय मिळवून देणे हे या संघटनेचे प्रमुख ध्येय होते. डाव्या कामगार संघटनांना पर्याय म्हणून भारतीय मजदूर संघ पुढे आला. भारतीय मजदूर संघाचे प्रणेते आणि संस्थापक श्री दत्तोपंत ठेंगडी (१९२०-२००४) हे देखील मूळचे वर्धा जिल्ह्यातील मराठी कुटुंबातील होते. कामगारांमध्ये राष्ट्रभावना जागृत ठेवत त्यांच्या हक्कांसाठी कार्य करणे, हा भारतीय मजदूर संघाचा प्रमुख विचार होता.
१९५२ पासून सुरु असलेल्या आदिवासी समाज विकासासाठीच्या कार्याला १९७८ मध्ये औपचारिक स्वरूप देऊन ‘वनवासी कल्याण आश्रमा’ची स्थापना करण्यात आली. शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि सामाजिक जागृती यांच्या माध्यमातून वनवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न या संस्थेने केला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून बाळासाहेब देशपांडे (१९१३-१९९५) यांची नियुक्ती करण्यात आली. बाळासाहेब देशपांडे, मोरूभाऊ केतकर, कृष्णराव सप्रे यासारख्या मराठी व्यक्तींनी वनवासी कल्याण आश्रमाच्या विकासात महत्वाचे योगदान दिले.
१९६४ मध्ये स्थापन झालेल्या ‘विश्व हिंदू परिषदे’ने हिंदू समाजाच्या संघटनावर भर दिला. हिंदू संस्कृती, धार्मिक परंपरा आणि मूल्यांचे जतन व संवर्धन करणे, तसेच विविध पंथ आणि संप्रदायांना एकत्र आणणे हे तिचे प्रमुख उद्दिष्ट होते. महाराष्ट्रातील दादासाहेब आपटे (१९०७-१९८५) हे विश्व हिंदू परिषदेच्या संस्थापकांपैकी एक होते. संस्थेच्या प्रारंभीच्या कार्यकाळात त्यांनी पहिले सरचिटणीस म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. या व्यतिरिक्त विश्व हिंदू परिषदेच्या कामकाजात मोरोपंत पिंगळे यांचे नावही प्रकर्षाने घेता येते.
शिक्षण क्षेत्रात भारतीय संस्कारांवर आधारित शिक्षण देण्यासाठी १९७७ मध्ये ‘विद्या भारती’ची स्थापना झाली. विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक आणि नैतिक विकास घडवून त्यांना राष्ट्रनिष्ठ आणि सुसंस्कृत नागरिक बनवण्याचा प्रयत्न या संस्थेने केला. भारत रत्न नानाजी देशमुख यांनी सुरु केलेल्या सरस्वती शिशु मंदिराच्या प्रेरणेने विद्या भरती संस्थेची निर्मिती झाली.
समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांसाठी सेवा कार्य करण्याच्या उद्देशाने १९८९ मध्ये ‘सेवा भारती’ची स्थापना झाली. आरोग्य, शिक्षण, कौशल्यविकास आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून गरीब आणि उपेक्षित समाजघटकांना स्वावलंबी बनवण्यावर या संस्थेने भर दिला.
संघाच्या विस्तारामागील समाजभान
संघ परिवारातील संस्थांनी ग्रामीण भागात शाळा, वसतिगृहे, संस्कार वर्ग आणि सेवा प्रकल्प सुरू केले. वनवासी भागात शिक्षण आणि आरोग्य सेवा पोहोचवण्याचे प्रयत्न झाले. भूकंप, पूर किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्वयंसेवकांनी मदतकार्य केले. या कार्यामुळे संघाला समाजातील काही घटकांमध्ये विश्वासार्हता मिळाली. संघाने व्यक्तिनिर्मितीवर विशेष भर दिला. शाखांमधून शिस्त, वेळेचे पालन, सामूहिक जीवन, देशभक्ती आणि संघटन कौशल्य विकसित केले जात होते. अनेक कार्यकर्ते पुढे सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय झाले.
महाराष्ट्रात मध्यमवर्गीय आणि शहरी समाजात संघाचा प्रभाव विशेषतः वाढला. शिक्षक, सरकारी कर्मचारी, व्यापारी, विद्यार्थी आणि व्यावसायिक वर्गात संघाने मजबूत पाया तयार केला. संघाच्या कार्यामुळे राष्ट्रवादाची एक विशिष्ट व्याख्या समाजात रूढ झाली. भारताची सांस्कृतिक ओळख हिंदू परंपरेशी जोडली जाऊ लागली. शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, गुरु गोळवलकर, सावरकर यांसारख्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव या विचारप्रवाहात महत्त्वाचा मानला गेला.
महाराष्ट्रातील सांस्कृतिक व्यवहारांवर हिंदुत्ववादी विचारांचा मोठा प्रभाव पडला. सार्वजनिक उत्सव, व्याख्याने, संस्कारवर्ग, देशभक्तिपर कार्यक्रम, व्यायामशाळा आणि धार्मिक यात्रांमधून हा प्रभाव वाढत गेला.
शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला नव्या पद्धतीने अधोरेखित करण्यात आले. शिवाजी महाराज हे केवळ मराठा राजा नसून “हिंदूंचे रक्षक” होते, ही प्रतिमा जनमानसात अधिक दृढ झाली. गणेशोत्सव आणि शिवजयंती यांसारखे उत्सव अधिक व्यापक आणि राजकीय-सांस्कृतिक स्वरूपाचे झाले. दूरदर्शनच्या काळात रामायण आणि महाभारत यांसारख्या मालिकांनीही धार्मिक-सांस्कृतिक ओळख अधिक बळकट केली. मंदिर, यात्रा, धर्मसभा आणि सामूहिक धार्मिक कार्यक्रमांमध्ये युवकांचा सहभाग वाढला.
हिंदुत्ववादाने समाजात सांस्कृतिक अभिमान आणि संघटनभावना निर्माण केली, असे त्याचे समर्थक मानतात. अनेक युवकांना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली. स्वयंसेवा आणि राष्ट्रभक्तीचे संस्कार निर्माण झाले. परंतु या विचारप्रवाहावर टीकाही झाली. हिंदुत्ववादामुळे धार्मिक ध्रुवीकरण वाढले, असा आरोप विरोधकांनी केला. “हिंदू राष्ट्र” या संकल्पनेमुळे अल्पसंख्याक समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली, असे मत अनेक विचारवंतांनी व्यक्त केले. जातिव्यवस्थेविषयी संघाची भूमिका, धर्मनिरपेक्षतेविषयीची मते आणि अल्पसंख्याकांविषयीचा दृष्टिकोन यांवर सतत चर्चा होत राहिली. काही ठिकाणी धार्मिक तणाव आणि दंगलींमध्ये हिंदुत्ववादी संघटनांची भूमिका वादग्रस्त ठरली.
संघ आणि राजकारण
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरुवातीला थेट राजकारणापासून दूर राहण्याची भूमिका घेतली होती. परंतु पुढे राजकीय क्षेत्रातही त्याचा प्रभाव वाढू लागला. १९५१ मध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. संघाशी संबंधित अनेक कार्यकर्ते जनसंघात सक्रिय झाले. जनसंघाने सांस्कृतिक राष्ट्रवाद, अखंड भारत आणि समाजवादी आर्थिक धोरणांना विरोध अशी भूमिका घेतली. महाराष्ट्रात जनसंघ सुरुवातीला मर्यादित प्रभावाचा पक्ष होता. शहरी मध्यमवर्ग, व्यापारी समाज आणि काही उच्चवर्णीय घटकांत त्याचा आधार वाढत गेला.
१९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली. या काळात संघावर पुन्हा बंदी घालण्यात आली. अनेक स्वयंसेवक आणि विरोधी पक्षांचे नेते तुरुंगात गेले. आणीबाणीविरोधी आंदोलनात संघाने सक्रिय सहभाग घेतला. या संघर्षामुळे संघाला लोकशाही रक्षणकर्ता म्हणून काही प्रमाणात मान्यता मिळाली. १९७७ मध्ये जनता पक्षाची स्थापना झाली. जनसंघ त्यात सहभागी झाला. जनता पक्षाच्या सरकारमध्ये संघाशी संबंधित नेते महत्त्वाच्या भूमिकेत आले. परंतु “दुहेरी सदस्यत्वा”च्या प्रश्नावर जनता पक्षात मतभेद झाले. त्यानंतर १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. आणि पक्षाने स्पष्टपणे हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारली.
महाराष्ट्रातही या आंदोलनाचा मोठा प्रभाव पडला. शहरी मध्यमवर्ग, युवक आणि हिंदुत्ववादी विचारांशी सहानुभूती असलेल्या घटकांमध्ये भाजपचा प्रभाव वाढला.
शिवसेनेचा उदय
१९६६ मध्ये व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे (१९२६-२०१२) यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्व, आक्रमक शैली आणि जनमानसाशी थेट संवाद साधण्याच्या कौशल्याच्या बळावर शिवसेनेची स्थापना केली. सुरुवातीला “मराठी माणूस” हा शिवसेनेचा मुख्य मुद्दा होता. मुंबईतील वाढत्या स्थलांतरामुळे स्थानिक तरुणांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाला त्यांनी प्रभावीपणे आवाज दिला. त्यामुळे अल्पावधीतच बाळासाहेब ठाकरे हे शहरी महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते बनले.
पुढे १९८० नंतर शिवसेनेने हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारली. बाबरी आंदोलनानंतर शिवसेना अधिक आक्रमक हिंदुत्ववादी संघटना म्हणून पुढे आली. शिवाजी महाराज, भगवा झेंडा, गणेशोत्सव आणि हिंदू अस्मिता यांचा प्रभावी वापर करून शिवसेनेने हिंदुत्वाला स्थानिक आणि भावनिक स्वरूप दिले. विशेषतः मुंबई आणि शहरी महाराष्ट्रातील तरुणांमध्ये शिवसेनेचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढला.
हिदुत्ववादाचा वाढता जनाधार
१९८० आणि १९९० च्या दशकात रामजन्मभूमी आंदोलन हे हिंदुत्ववादी राजकारणाचे केंद्र बनले. अयोध्येतील बाबरी मस्जिद ही रामजन्मभूमीवर बांधली गेली होती, हा दावा पुढे आला. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मस्जिद पाडण्यात आली. या घटनेनंतर देशभर दंगली उसळल्या. मुंबईतही मोठ्या प्रमाणावर सांप्रदायिक हिंसा झाली. या घटनेने हिंदुत्ववादाला व्यापक जनाधार मिळवून दिला, पण त्याचबरोबर धार्मिक ध्रुवीकरणही वाढले. समाजात हिंदू-मुस्लिम संबंध अधिक ताणले गेले.
स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेची भूमिका स्वीकारली होती. परंतु १९८० नंतर “अल्पसंख्याकांचे लांगूलचालन” केल्याचा आरोप काँग्रेसवर होऊ लागला. शाहबानो प्रकरण, मुस्लिम वैयक्तिक कायदा आणि धार्मिक तुष्टीकरणाच्या आरोपांमुळे मध्यमवर्गीय हिंदू समाजात असंतोष वाढला. हिंदुत्ववादी संघटनांनी या असंतोषाला प्रभावीपणे राजकीय आणि सांस्कृतिक रूप दिले. “बहुसंख्याक समाजाच्या भावना दुर्लक्षित केल्या जात आहेत” अशी भावना समाजातील काही घटकांत निर्माण झाली.
महाराष्ट्रात हिंदुत्ववाद एक प्रभावी सामाजिक-सांस्कृतिक शक्ती बनला. त्याने युवक संघटन, स्वयंसेवा, सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि धार्मिक ओळख यांना नवे स्वरूप दिले. त्याचबरोबर समाजात धार्मिक ध्रुवीकरणही वाढले. धर्मनिरपेक्षता, बहुसांस्कृतिकता आणि भारतीय राष्ट्रवाद यांवरील चर्चा अधिक तीव्र झाली. महाराष्ट्रातील सार्वजनिक जीवनात भगवा प्रतीक, शिवाजी महाराजांची प्रतिमा, धार्मिक उत्सव आणि राष्ट्रवादी भाष्य अधिक ठळकपणे दिसू लागले. माध्यमे, साहित्य, सार्वजनिक व्याख्याने आणि राजकीय प्रचार यांतही हिंदुत्ववादी विचारप्रवाहाचा प्रभाव वाढला.
समारोप
महाराष्ट्रातील हिंदुत्ववादाचा प्रवास हा सामाजिक, सांस्कृतिक आणि संघटनात्मक परिवर्तनाचाही महत्त्वाचा भाग होता. सावरकरांच्या वैचारिक मांडणीतून आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यातून या विचारप्रवाहाला दिशा मिळाली. विशेष म्हणजे या दोन्ही प्रवाहांचा उगम महाराष्ट्रात झाला आणि अनेक दशकांपर्यंत संघाचे नेतृत्वही मराठी व्यक्तींकडे राहिले.
संघ आणि संघ परिवारातील संस्थांनी शिक्षण, विद्यार्थी चळवळी, कामगार संघटन, वनवासी विकास आणि सामाजिक सेवा या क्षेत्रांत व्यापक कार्य केले. दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने हिंदुत्ववादी विचारांना राजकीय आणि जनआंदोलनाचे स्वरूप दिले. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने हिंदुत्वाला प्रादेशिक आणि भावनिक अभिव्यक्ती दिली.
रामजन्मभूमी आंदोलन आणि बाबरी मस्जिद प्रकरणानंतर हिंदुत्ववादाचा जनाधार मोठ्या प्रमाणावर वाढला. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात भगवा प्रतीक, शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद अधिक ठळकपणे दिसू लागला. या प्रवाहामुळे राष्ट्रभावना आणि सांस्कृतिक अभिमान वाढल्याचे समर्थक मानतात; तर धार्मिक ध्रुवीकरण वाढल्याची टीकाही झाली. तरीही १९५० ते २००० या काळातील महाराष्ट्राचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास समजून घेताना हिंदुत्ववादाच्या या प्रवासाचा विचार अपरिहार्य ठरतो.