संगीत व कला (४ ते ८)
१९५० ते २०००
मराठी रंगभूमीच्या इतिहासात १८८० ते १९३० हा काळ संगीत नाटकांचा 'सुवर्णकाळ' मानला जातो. याच काळात 'नाट्यसंगीत' हा एक अभिजात कलाप्रकार म्हणून प्रस्थापित झाला होता. १८८० मध्ये अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी 'संगीत शाकुंतल' हे नाटक रंगभूमीवर आणून खऱ्या अर्थानं 'संगीत नाटक' या प्रवाहाची मुहूर्तमेढ रोवली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला बालगंधर्व, केशवराव भोसले, मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि मास्टर कृष्णराव यांसारख्या अलौकिक दिग्गजांनी नाट्यसंगीताला सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवले. नाट्यसंगीताचा हा सुवर्णकाळ १९३० पर्यंत बहरत राहिला.
१९३० च्या दशकातल्या बोलपटांच्या आगमनानंतर संगीत नाटकाला आपल्या अस्तित्वासाठी तीव्र संघर्ष करावा लागला. रसिकांच्या बदलत्या अभिरुचीमुळे या काळात नाट्यसंगीतातील पदांची संख्या कमी करून जनमानसात आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न संगीतकार करू लागले. मो. ग. रांगणेकर आणि प्र. के. अत्रे यांच्या 'कुलवधू', 'पाणिग्रहण' यांसारख्या नाटकांमधून भावगीत-अंगानं जाणारं नाट्यसंगीत पुढे आले.
१९५० चं दशक संगीत नाटकासाठी अत्यंत निराशाजनक ठरले. या काळात संगीत नाटक जिवंत ठेवण्याचं मोठं श्रेय जयराम आणि जयमाला शिलेदार या दांपत्याला जातं. त्यांनी ‘मराठी रंगभूमी’ संस्थेच्या माध्यमातून या कलाप्रकाराला जिवंत ठेवलं. बालगंधर्वांच्या तालमीत घडलेल्या जयमालाबाईंनी ५० हून अधिक नाटकांत ४६ भूमिका साकारल्या. शिलेदार दांपत्यानं ‘एखाद्याचे नशीब’, ‘मुंबईची माणसं’, ‘अनंतफंदी’, ‘अभोगी’ यांसह १६ नवी संगीत नाटकं सादर केली. जयमालाबाईंच्या कार्याची दाखल घेत भारत सरकारने पुढे त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
१९६० च्या दशकात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पटलावर एक मोठी क्रांती घडली. १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मराठी भाषा आणि संस्कृतीबद्दलची अस्मिता नव्यानं जागृत झाली. याच दशकात नाट्यसंगीतानं पुन्हा एकदा कात टाकली आणि संगीत रंगभूमीचं एक 'दुसरं सुवर्णयुग' अवतरलं. या पुनरुज्जीवनाचे मुख्य शिल्पकार होते नाटककार विद्याधर गोखले आणि पुरुषोत्तम दारव्हेकर.
विद्याधर गोखले यांनी जुन्या काळातील भव्य नेपथ्य, अत्यंत आकर्षक वेशभूषा आणि विपुल सांगीतिक रचनांनी सजलेली संगीत नाटकं पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर आणली. १९६० ते १९८३ या प्रदीर्घ काळात त्यांनी सुमारे ६० नाटकं आणि ६६ नाट्यगीतं लिहून संगीत नाटकाला व्यावसायिक स्थैर्य प्राप्त करून दिले. १९६० मध्ये आलेली 'सुवर्णतुला' आणि 'पंडितराज जगन्नाथ', तसेच १९६३ मधील 'मंदारमाला' या नाटकांनी जुन्या आणि नव्या दोन्ही पिढ्यांतील प्रेक्षकांना पुन्हा एकदा नाट्यगृहांकडे खेचून आणलं. गोखले यांच्या नाटकांचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ऐतिहासिक, पौराणिक आणि सामाजिक विषयांची उत्तम सांगड घातली. त्यांनी 'रंगशारदा' या संस्थेची स्थापना करून संगीत नाटकांना व्यावसायिक स्तरावर यशस्वी केले.
'सुवर्णतुला' या नाटकातील ‘अंगणी पारिजात फुलला’, ‘कोण ही सुंदरा, यदुवरा’ आणि ‘फुलला मनी वसंत बहार’ ही पदं, तर वसंत देसाई यांनी संगीत दिलेल्या 'पंडितराज जगन्नाथ' या नाटकातील ‘जय गंगे भागीरथी’, ‘नयन तुझे जादूगार’ आणि ‘मदनाची मंजिरी साजिरी’ ही पदं अतिशय गाजली. राम मराठे यांनी स्वरबद्ध केलेल्या 'मंदारमाला' या नाटकातील ‘जय शंकरा गंगाधरा’, ‘जयोस्तुते उषादेवते’ आणि ‘सोहम हर डमरू बाजे’ ही पदं देखील रसिकांनी डोक्यावर घेतली.
पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित 'कट्यार काळजात घुसली' या नाटकानं मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. दोन घराण्यांच्या सांगीतिक ईर्षेवर आधारलेल्या या नाटकानं सांगीतिकदृष्ट्या अवघड असलेलं संगीत अत्यंत लोकप्रिय केले. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत आणि डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या आक्रमक गायनानं रसिकांना वेड लावलं. ‘कट्यार’मधील ‘घेई छंद मकरंद’, ‘तेजोनिधी लोहगोल’, ‘या भवनातील गीत पुराणे’, ‘लागी कालेजवा कट्यार’ आणि ‘सुरत पियांकी’ या पदांनी प्रसिद्धीचा कळस गाठला.
याशिवाय मराठी साहित्यातील काही दिग्गजांनीदेखील या काळात नाट्यसंगीतात मोलाची भर टाकली. वसंत कानेटकर लिखित आणि जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वररचनेतील 'मत्स्यगंधा (१९६४)' या नाटकातील ‘अर्थशून्य भासे मजला’, ‘गुंतता हृदय हे’, ‘नको विसरू संकेत मिलनाचा’ आणि ‘साद देती हिमशिखरे’ ही पदं खूप गाजली. वि. वा. शिरवाडकर यांचं 'ययाती आणि देवयानी (१९६६)' हे नाटकही काव्यात्म शैलीतील पदांमुळे विशेष गाजलं. जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबद्ध केलेली ‘यतिमम मन मानित त्या’ आणि ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ ही पदं खूप गाजली. बाळ कोल्हटकर यांच्या 'देव दीनाघरी धावला (१९७०)' या नाटकातील वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेली ‘उठी उठी गोपाला’ आणि ‘ऋणानुबंधाच्या…’ ही पदं तुफान गाजली.
या कालखंडात नाट्यसंगीताच्या सांगीतिक रचनेत सर्वांत मोठा आणि दूरगामी बदल पं. जितेंद्र अभिषेकी यांनी घडवून आणला. शास्त्रीय संगीतातील गुंतागुंतीच्या आणि बोजड रचना त्यांनी सुश्राव्य आणि भावपूर्ण केल्या. बालगंधर्वांच्या परंपरेतील केवळ आवाजाची कवायत म्हणजे नाट्यसंगीत, हा प्रचलित समज त्यांनी मोडून काढला. रागापेक्षा कथेतील भावाला प्राधान्य देत, तो अचूक व्यक्त करण्यासाठी त्यांनी मिश्र रागांचा कल्पक वापर केला. त्यामुळे नाट्यसंगीत अधिक अभिजात, पण तरीही सुलभ झाले.
अभिषेकी बुवांनी स्वतःला एका घराण्यापुरतं मर्यादित ठेवलं नाही. विविध घराण्यांच्या गायकीचा त्यांनी सखोल अभ्यास केला. आग्रा घराण्याचे जगन्नाथबुवा पुरोहित आणि अझमत हुसेन खान, तसेच जयपूर घराण्याचे गुल्लूभाई जसदनवाला यांच्याकडून त्यांनी तालीम घेतली. तरुणपणी आजारामुळे आवाज गमावण्याचा प्रसंग आला; पण कठोर रियाज आणि शास्त्रीय साधनेतून त्यांनी आपला आवाज पुन्हा कमावला आणि तो अधिक लवचिक व भावपूर्ण केला.
‘मत्स्यगंधा’ नाटकात वसंत कानेटकरांच्या काव्याला चाल देताना पं. जितेंद्र अभिषेकी यांनी भाव आणि राग यांचा सुंदर मेळ घातला. “गुंतता हृदय हे” आणि “नभ मेघांनी आक्रमिले” यांसारख्या रचना याची उत्कृष्ट उदाहरणं ठरली. ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील “घेई छंद मकरंद”, “तेजोनिधी लोहगोल” आणि “लागी कालेजवा कट्यार” ही पदं त्यांच्या सांगीतिक प्रगल्भतेची आणि कल्पकतेची साक्ष देणारी ठरली.
पं. अभिषेकी यांनी सुमारे १७ संगीत नाटकांना संगीत दिले. ‘मत्स्यगंधा’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘गोरा कुंभार’, ‘ययाती आणि देवयानी’, ‘लेकुरे उदंड जाली’, ‘हे बंध रेशमाचे’ आणि ‘महानंदा’ ही त्यांपैकी गाजलेली नाटकं होती.
त्यांच्या कार्याचा गौरव अनेक पुरस्कारांनी झाला. नाट्यदर्पण पुरस्कार (१९७८), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९८९), पद्मश्री (१९८८) आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९०) हे त्यांना प्राप्त झालेले प्रमुख सन्मान होते.
याच कालखंडात गायकीतही मोठं स्थित्यंतर पाहायला मिळालं. बालगंधर्वांच्या सुमधुर, कोमल आणि लयबद्ध गायकीकडून डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या अत्यंत दमदार, नाट्यमय आणि 'आक्रमक' गायकीकडे झालेले संक्रमण हे या काळाचं वैशिष्ट्य ठरले. पं. राम मराठे, पं. रामदास कामत आणि कीर्ती शिलेदार यांसारख्या दिग्गज गायक-नटांनी रंगभूमी आपल्या आवाजानं आणि अभिनयानं समृद्ध केली.
याच काळात रंगभूमीवर काही धाडसी प्रयोगही झाले, ज्यांनी नाट्यसंगीताला नवे आयाम दिले. 'लेकुरे उदंड जाली' या नाटकात पाश्चात्य संगीताचा 'ऑपेरा'च्या स्वरूपात यशस्वी वापर झाला, तर 'घाशीराम कोतवाल'मध्ये पारंपरिक रागदारीऐवजी लोकसंगीत आणि नमनाचा दशावतारी बाज प्रभावीपणे वापरण्यात आला.
१९८० आणि १९९० च्या दशकात समांतर रंगभूमीची चळवळ आणि वास्तववादी सिनेमा-टीव्हीचं आक्रमण यामुळे पाच-पाच तास चालणाऱ्या संगीत नाटकांचे प्रयोग कमी झाले आणि नाटकांना उतरती कळा लागली. परंतु, 'नाट्यसंगीत' संपलं नाही; उलट ते एका स्वतंत्र 'मैफिलीच्या' रूपात अधिक लोकप्रिय होत गेले. डॉ. वसंतराव देशपांडे, रामदास कामत, आशा खाडिलकर यांसारख्या कलाकारांनी नाट्यसंगीत नाटकाच्या चौकटीबाहेर काढून स्वरमंचावर स्वतंत्रपणे गाजवलं. आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमांनी नाट्यसंगीताचा प्रसार महाराष्ट्राच्या घराघरांत आणि खेड्यापाड्यांत केला. एस.एन.डी.टी.सारख्या विद्यापीठांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमात नाट्यसंगीताचा अधिकृत समावेश करून त्याला शैक्षणिक मान्यता देखील मिळवून दिली.
समारोप
१९५० ते २००० या पन्नास वर्षांच्या कालखंडात मराठी नाट्यसंगीतानं चढउतारांनी भरलेला प्रवास अनुभवला. १९५० च्या दशकातील अस्तित्वाच्या संघर्षातून सुरुवात करत, १९६० ते १९८० या काळात त्यानं पुन्हा एकदा आपल्या अभिजात परंपरेचं पुनरुज्जीवन साधलं. विद्याधर गोखले, पुरुषोत्तम दारव्हेकर आणि वसंत कानेटकर यांसारख्या नाटककारांनी संगीत नाटकांना नवसंजीवनी दिली, तर पं. जितेंद्र अभिषेकी आणि राम मराठे यांनी आपल्या प्रयोगशील आणि भावप्रधान संगीतानं नाट्यसंगीताला नवं सौंदर्य दिले.
या काळात ‘कट्यार काळजात घुसली’, ‘मत्स्यगंधा’, ‘ययाती आणि देवयानी’ यांसारख्या नाटकांनी लोकप्रियतेसोबत नाट्यसंगीताची कलात्मक ताकदही दाखवली. बालगंधर्वांच्या कोमल शैलीतून डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या दमदार, नाट्यमय शैलीकडे झालेले संक्रमण विशेष ठरले. ‘लेकुरे उदंड जाली’ आणि ‘घाशीराम कोतवाल’ यांनी नाट्यसंगीताला नवे आयाम दिले. त्यामुळे हे माध्यम परंपरेपुरतं न राहता बदलत्या काळाशी संवाद साधू लागले.
१९८० नंतर जरी संगीत नाटकांच्या प्रयोगांना काही प्रमाणात उतरती कळा लागली, तरी नाट्यसंगीताचा आत्मा जिवंत राहिला. तो मैफिलींच्या रूपात अधिक व्यापक झाला. आकाशवाणी, दूरदर्शन आणि ध्वनिमुद्रिकांमुळे नाट्यसंगीत महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलं. मराठी नाट्यसंगीत पुढील काळातही नक्कीच प्रेरणादायी सांस्कृतिक संपदा ठरेल.