संगीत व कला (४ ते ८)
१९५० ते २०००
भाग १ मध्ये आपण मराठी सुगम संगीताचा मराठी माणसाच्या भावविश्वाशी घट्ट जोडलेला प्रवास पाहिला. परंतु या संपूर्ण सांगीतिक विश्वाला व्यापक लोकप्रियता, दृश्यात्मक विस्तार आणि जनमानसात खोलवर पोहोचवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर चित्रपट माध्यमानं केले. त्याचबरोबर तंत्रज्ञानातील बदलांनी संगीताची निर्मिती आणि प्रसारपद्धतींमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवलं. त्यामुळे सुगम संगीताचा हा प्रवास पूर्णपणे समजून घेण्यासाठी चित्रपट आणि तंत्रज्ञान या दोन्ही घटकांचा अभ्यास अपरिहार्य आहे.
चित्रपट संगीत
१९५० ते २००० या काळात मराठी चित्रपट संगीतानं अत्यंत समृद्ध, वैविध्यपूर्ण आणि परिवर्तनशील असा प्रवास केला. प्रारंभी नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीताचा प्रभाव असलेलं हे संगीत हळूहळू स्वतंत्र आणि लोकप्रिय कलाप्रकार म्हणून विकसित झालं. चित्रपटातील गाणी केवळ कथेला पूरक न राहता, ती प्रेक्षकांना आकर्षित करणारा मुख्य घटक बनली.
१९५० ते १९७० हा कालखंड मराठी चित्रपटसृष्टीतील पारंपरिक संगीताचा सुवर्णकाळ ठरला. या काळात गीतकार आणि संगीतकारांच्या काही अद्वितीय जोड्यांनी अनेक चित्रपटांतून अजरामर गीतांची निर्मिती केली. काही महत्त्वाची उदाहरणं येथे पाहता येतील.
राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमध्ये ग. दि. माडगूळकर यांची अर्थपूर्ण गीतरचना आणि सुधीर फडके यांचं सुरेल संगीत यांची सुंदर सांगड दिसते. ‘लाखाची गोष्ट’ (१९५२) या चित्रपटातील ‘त्या तिथे पलीकडे’ आणि ‘माझा होशील का?’ ही गाणी विशेष गाजली. त्याचप्रमाणे ‘जगाच्या पाठीवर’ (१९६०) मधील ‘एक धागा सुखाचा’, ‘जग हे बंदिशाला’, ‘नाच नाचुनी अति मी दमले’ आणि ‘विकत घेतला शाम…’ ही गाणीही अत्यंत लोकप्रिय ठरली. या गीतांमधून भावस्पर्शी आशय आणि सुरेलतेचा सुंदर मिलाफ दिसून येतो.
‘कन्यादान’ (१९६०) या माधव शिंदे दिग्दर्शित चित्रपटात पी. सावळाराम आणि वसंत प्रभू या जोडीनं ‘लेक लाडकी या घरची’, ‘कोकिळ कुहुकुहु बोले’, ‘माझिया नयनांच्या कोंदणी’ आणि ‘मानसीचा चित्रकार तो’ यांसारखी अजरामर गीतं दिली.
१९६३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोलकरीण’ या चित्रपटात वसंत देसाई यांनी सुरेल गीतांची मालिका साकारली. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी पी. सावळाराम आणि ग. दि. माडगूळकर या दोघांनीही गीतरचना केली. सावळारामांनी ‘देव जरी मज कधी भेटला’, ‘कशी झोकात चालली कोळ्याची पोर’ आणि ‘हसले आधी कुणी, तू का मी’ ही गीतं लिहिली; तर माडगूळकरांनी ‘एकवार तरी राम दिसावा’ आणि ‘दैव जाणिले कुणी’ ही भावपूर्ण गीतं दिली.
‘धर्मकन्या’ (१९६८) या माधव शिंदे दिग्दर्शित चित्रपटात हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिले. पी. सावळाराम यांच्या ‘चोच जयाने दिली बाळा’, ‘गोड गोजिरी लाज लाजरी’ आणि ‘सखी गं मुरली मोहन मोह मना’ यांसारख्या गीतांनी या चित्रपटाचं संगीत समृद्ध केले.
या सर्व उदाहरणांतून त्या काळातील मराठी चित्रपटसंगीताची समृद्धता, साधेपणा आणि भावविश्वाची खोली प्रकर्षानं जाणवते.
याच काळात लावणीसारख्या लोकसंगीतालाही मराठी चित्रपटांनी नवसंजीवनी दिली. तमाशा आणि ग्रामीण संस्कृतीशी जोडलेली ही कला चित्रपटांच्या माध्यमातून व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. ‘पिंजरा’ (१९७२) हा चित्रपट जरी १९७० नंतरचा असला, तरी तो १९५० ते १९७० या कालखंडात विकसित झालेल्या लावणीप्रधान चित्रपटपरंपरेचं प्रतिनिधित्व करणारा ठरतो.
‘सवाल माझा ऐका’ (१९६४) या चित्रपटातील ‘कसं काय पाटील, बरं हाय का’ आणि ‘सोळावं वारीस धोक्याचं’ या लावण्या विशेष गाजल्या. ‘एक गाव बारा भानगडी’ (१९६९) मधील ‘एक गाव बारा भानगडी’ आणि ‘आता लग्नाचं वय माझं झालं गं’ या गीतांमधून ग्रामीण ठसका आणि विनोद यांचा सुंदर मिलाफ दिसतो. ‘पिंजरा’ (१९७२) या चित्रपटातील ‘दिसला गं बाई दिसला’, ‘छबीदार छबी मी तोऱ्यात उभी’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’ आणि ‘मला लागली कुणाची उचकी’ या लावण्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली.
या सर्व चित्रपटांमधून लावणीला केवळ करमणुकीचा भाग न ठेवता तिला कथानकाचा आणि भावविश्वाचा केंद्रबिंदू बनवण्यात आलं. त्यामुळे लावणी ही लोककलेतून मुख्य प्रवाहातील प्रभावी सांस्कृतिक अविष्कार बनली.
१९७० नंतर मराठी चित्रपटसृष्टीला नवं वळण देण्यात दादा कोंडके यांचा महत्त्वाचा वाटा आहे. ग्रामीण प्रेक्षकांची नाडी ओळखून त्यांनी विनोद आणि ठसकेदार संगीत यांचा प्रभावी संगम साधला. त्यांच्या चित्रपटांनी मराठी सिनेमाला मोठं व्यावसायिक यश मिळवून दिले. दादा कोंडके आणि रामलक्ष्मण यांची जोडी ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी ‘फॉर्म्युला’ ठरली. दादांचे खुसखुशीत संवाद आणि रामलक्ष्मण यांच्या ढोलकीप्रधान चाली यांनी महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलं.
‘पांडू हवालदार’ (१९७५) या चित्रपटातून या जोडीची सुरुवात झाली. ‘तुमचं आमचं जमलं’ (१९७६) मधील ‘वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ’ आणि ‘ये जवळी ये, लाजू नको’ ही गाणी लोकप्रिय ठरली. ‘बोट लावीन तिथे गुदगुल्या’ (१९७८) मधील ‘हिल पोरी हिला’ आणि ‘आली अंगावर’ (१९८२) मधील ‘काय ग सखू’ या गीतांनी लोकप्रियता मिळवली.
या सर्व चित्रपटांमधून ढोलकीचा ठेका, सोपे आणि लक्षवेधी शब्द, तसेच लोकसंगीताचा ठसका यांचा प्रभावी वापर दिसतो. त्यामुळे ही गाणी सर्वसामान्य प्रेक्षकांच्या ओठांवर रेंगाळली. दादा कोंडके यांच्या चित्रपटांनी मनोरंजनासोबतच एक वेगळी लोकाभिमुख सांस्कृतिक परंपरा निर्माण केली. यानंतर हा प्रवाह ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धडाकेबाज’ आणि ‘हमाल दे धमाल’ यांसारख्या चित्रपटांतील गाण्यांतून पुढे चालू राहिला.
लोकसंगीत
सुगम संगीताची चर्चा करताना ‘लोकसंगीत’ हा घटक अत्यंत महत्त्वाचा ठरतो. मराठी सुगम संगीताचा खरा आत्मा आणि लय या मातीतल्या संगीतात दडलेली आहे. गावाच्या वेशीपलीकडे असलेला हा कलाप्रकार १९५० ते २००० या काळात कॅसेट्स, खाजगी अल्बम आणि चित्रपटांच्या माध्यमातून शहरी घरांमध्येही पोहोचला.
या प्रवाहात ‘शिंदे घराण्याचं’ योगदान विशेष उल्लेखनीय ठरलं. प्रल्हाद शिंदे हे केवळ गायक नव्हते, तर ते एका सामाजिक चळवळीचे प्रभावी आवाज होते. त्यांनी भक्तिगीतांसोबतच गावरान गीतं, आंबेडकरी गीतं आणि कव्वाली यांच्या माध्यमातून वंचित समाजाला मुख्य प्रवाहातील संगीताशी जोडलं. ‘पाऊले चालती पंढरीची वाट’, ‘अंबाबाईचा उदो उदो’ आणि ‘नामं तुझे घेता देवा होई समाधान’ यांसारख्या गीतांनी ग्रामीण आणि सामान्य रसिकांना अक्षरशः वेड लावलं.
त्यांच्या परंपरेला पुढे नेत आनंद शिंदे यांनी लोकसंगीताला पुढे नेलं. त्यांच्या धारदार आणि पहाडी आवाजामुळे, तसेच उच्च पट्टीत गाण्याच्या कौशल्यामुळे ते तळागाळातील रसिकांचे लाडके गायक बनले. ‘नवीन पोपट हा लागलाय मिठू मिठू बोलायला’ आणि ‘फणा काढून नागोबा डुलतोय गं’ यांसारख्या गीतांतून त्यांनी महाराष्ट्राला वेगळाच ठेका दिला.
१९५० ते २००० या काळात चित्रपटांच्या झगमगाटापासून दूर असलेल्या गैर-चित्रपट लावणीनं आणि पोवाडा या संगीत प्रकारांनी एक वेगळाच संघर्षमय आणि परिवर्तनशील प्रवास केला. या परंपरेला जिवंत ठेवण्याचं मोठं काम तमाशा कलावंत, शाहीर आणि रंगमंचावरील कलाकारांनी केले. १९५०–६० च्या दशकात संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पार्श्वभूमीवर शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे आणि शाहीर द. ना. गव्हाणकर यांनी पोवाडा आणि लावणीचा वापर सामाजिक व राजकीय प्रबोधनासाठी केला. पुढे १९६० ते १९८० या काळात यमुनाबाई वाईकर आणि रोशन सातारकर यांनी बैठकीची लावणी जिवंत ठेवली, तर विठाबाई नारायणगावकर आणि कांताबाई सातारकर यांनी ग्रामीण भागात फिरत्या तमाशातून तिचा रांगडा आणि अस्सल बाज जपला.
१९८०–९० च्या दशकात कॅसेट क्रांतीमुळे लावणीला नवं माध्यम मिळालं. १९९० नंतर शहरीकरणाच्या प्रभावामुळे लावणी तंबूतून नाट्यगृहात आली. सुरेखा पुणेकर, मंगला बनसोडे आणि छाया-माया खुटेगावकर यांनी व्यावसायिक ‘स्टेज शो’च्या माध्यमातून तिला नवं रूप दिले. आधुनिक वाद्यांचा वापर, नियोजित नृत्यरचना आणि सुसंगत सादरीकरण यांमुळे लावणीने नव्या काळाशी जुळवून घेतलं. अशा प्रकारे, सामाजिक प्रबोधनापासून ते शहरी रंगमंचापर्यंतचा हा प्रवास लावणीच्या जिवंतपणाची आणि लवचिकतेची साक्ष देणारा ठरला.
विसाव्या शतकाच्या अखेरीस मराठी सुगम संगीतामध्ये नव्या प्रवाहांची चाहूल लागली. पारंपरिक भावगीत आणि चित्रपटसंगीताच्या चौकटीबाहेर जाऊन स्वतंत्र अल्बम आणि नव्या अभिव्यक्तीचे प्रयोग पुढे येऊ लागले. मिलिंद इंगळे यांचा ‘गारवा’ हा अल्बम शहरी, संवेदनशील भावविश्व आणि स्वतंत्र संगीतप्रवाहाचा संकेत देणारा ठरला. त्यानंतरच्या नजीकच्या काळात सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांच्या ‘आयुष्यावर बोलू काही’ या उपक्रमानं या प्रवाहाला अधिक व्यापक आणि दीर्घकालीन रूप दिले. साधी, आत्मीय आणि काव्यात्म भाषा, तसेच सादरीकरणातील थेट संवाद यांमुळे या नव्या शैलीनं तरुण पिढीशी जवळीक साधली. अशा प्रकारे मराठी suगम संगीतानं परंपरेचा वारसा जपत आधुनिकतेशी सुसंगत असा नवा अविष्कार स्वीकारला.
तंत्रज्ञानाचा प्रभाव
१९५० ते २००० या काळात संगीत क्षेत्रात मोठी तांत्रिक आणि व्यावसायिक क्रांती घडली. या काळात संगीत निर्मिती, वितरण आणि ऐकण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाले. १९५०–६० च्या दशकात ‘एचएमव्ही’ (ग्रामोफोन कंपनी ऑफ इंडिया)चं वर्चस्व होतं. रेकॉर्ड्स महाग असल्यामुळे सर्वसामान्यांना रेडिओवरच अवलंबून राहावं लागत होतं. १९६९ नंतर ‘पॉलीडोर’सारख्या कंपन्यांमुळे काही प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली, पण संगीत अजूनही मर्यादित वर्गापुरतंच होतं.
रेडिओनंतर दूरदर्शनच्या आगमनानं संगीताला एक नवं दृश्य माध्यम मिळालं. ‘चित्रहार’ आणि ‘रंगोली’सारख्या कार्यक्रमांमधून गाणी केवळ ऐकण्यापुरती न राहता ती पाहण्याचा अनुभवही मिळू लागला. त्यामुळे कलाकारांची प्रतिमा, सादरीकरण आणि गाण्यांची लोकप्रियता यांना एक नवं रूप मिळालं.
खरा बदल १९८० च्या दशकात ऑडिओ कॅसेट्सच्या आगमनानं झाला. स्वस्त, पोर्टेबल आणि सोप्या अशा या माध्यमामुळे संगीत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं. ‘टी-सिरीज’ आणि ‘व्हिनस’सारख्या कंपन्यांनी कमी किमतीत कॅसेट्स उपलब्ध करून देत संगीताचं लोकशाहीकरण केले. या काळात गाणी रेकॉर्ड करून घेणं, स्वतःच्या आवडीच्या कॅसेट्स तयार करणं ही नवी संस्कृती निर्माण झाली. पुढे १९९० च्या दशकाच्या शेवटी ‘सीडी’ आल्यामुळे ध्वनीची गुणवत्ता आणि टिकाऊपणा वाढला आणि संगीताच्या डिजिटल युगाची पायाभरणी झाली.
१९९० चं दशक मराठी सुगम संगीतातील नव्या बदलांचं साक्षीदार ठरलं. कॅसेट आणि सीडी तंत्रज्ञान स्वस्त झाल्यामुळे, तसंच अनेक खाजगी संगीत कंपन्या उदयाला आल्यामुळे, चित्रपटांबाहेर केवळ ऐकण्यासाठी तयार होणाऱ्या ‘खाजगी अल्बम्स’चा एक नवा प्रवाह सुरू झाला. या प्रक्रियेमुळे संगीतकार आणि गायक चित्रपट निर्मात्यांच्या चौकटीतून बाहेर पडून अधिक स्वतंत्र झाले. त्यांनी आपल्या आवडीनुसार आणि प्रयोगशीलतेनुसार संगीत निर्माण करायला सुरुवात केली आणि त्यामुळे मराठी सुगम संगीताला नवे विषय, नवे सूर आणि नवी दिशा मिळाली. कॅसेट तंत्रज्ञानामुळे प्रत्येक श्रोता जणू स्वतःच निर्माता बनला. आवडीची गाणी निवडून स्वतःची कॅसेट तयार करण्याची संस्कृती निर्माण झाली आणि संगीत अधिक वैयक्तिक अनुभव बनलं.
मराठी सुगम संगीताच्या जतन, संवर्धन आणि प्रसारासाठी आकाशवाणीने महत्त्वाची भूमिका बजावली. परंतु नव्या तंत्रज्ञानाच्या जगात प्रसारमाध्यमांत अनेक बदल झाले. पुण्यातील ‘अलूरकर म्युझिक हाऊस’नं दुर्मिळ ध्वनिमुद्रिका जतन करून आणि नव्या कलाकारांना संधी देऊन मोठं काम केले. पुढे दूरचित्रवाणीच्या युगात ‘नक्षत्रांचे देणे’सारख्या कार्यक्रमांमधून जुन्या सुगम संगीताला आधुनिक रूप मिळालं आणि ते नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचलं.
समारोप
१९५० ते २००० हा पन्नास वर्षांचा कालखंड मराठी सुगम संगीताच्या इतिहासातील अत्यंत सर्जनशील आणि परिवर्तनशील काळ ठरला. एका छोट्या झऱ्यासारखा सुरू झालेला हा प्रवास पुढे एका समृद्ध आणि व्यापक सांगीतिक प्रवाहात रूपांतरित झाला. मास्टर कृष्णराव यांच्या ‘सहजभावा’तून आकार घेतलेल्या या संगीताला गदिमा, पी. सावळाराम, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, जगदीश खेबुडकर आणि सुरेश भट यांच्या लेखणीतून भावविश्वाची विलक्षण समृद्धी मिळाली. सुधीर फडके, वसंत प्रभू, राम कदम, दशरथ पुजारी आणि श्रीनिवास खळे यांच्या चालींनी या गीतांना चिरंतनता प्राप्त झाली. लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, सुधीर फडके, अरुण दाते आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजानं हे संगीत महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलं.
या संपूर्ण प्रवासात तंत्रज्ञानानं निर्णायक भूमिका बजावली. ग्रामोफोनच्या मर्यादित रेकॉर्ड्सपासून सुरू झालेला प्रवास कॅसेट्स आणि वॉकमनमुळे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला. आकाशवाणीने या संगीताला दिशा, शिस्त आणि व्यासपीठ दिले. पुढे खासगी संस्थांनी त्याचा प्रसार वाढवला. त्यामुळे संगीत अधिक लोकाभिमुख झालं.
याच काळात सुगम संगीत आणि चित्रपट संगीत यांनी एकमेकांना पूरक अशी वाटचाल केली. चित्रपटांनी या संगीताला व्यापक लोकप्रियता मिळवून दिली. अशा प्रकारे अभिजातता आणि लोकप्रियता यांचा सुंदर संगम घडला. तंत्रज्ञानातील बदलांमुळे संगीताचा प्रसार अधिक वेगवान झाला. कॅसेट, सीडी आणि पुढे डिजिटल माध्यमांनी संगीत सर्वदूर पोहोचवलं. त्यामुळे संगीत निवडक वर्गापुरतं मर्यादित न राहता सर्वसामान्यांच्या जीवनाचा भाग बनले.
या सुवर्णकाळात निर्माण झालेली अनेक गाणी आजही तितक्याच प्रभावीपणे मनात घुमतात. ‘शुक्रतारा मंद वारा’, ‘गीत रामायण’, ‘गारवा’ किंवा ‘ओंकार स्वरूपा’ ही गाणी केवळ संगीत नाहीत, तर ती आठवणी, भावना आणि अंतर्मनाचा अनुभव बनून राहिली आहेत.
म्हणूनच, हा कालखंड केवळ संगीताचा इतिहास नाही; तो महाराष्ट्राच्या भावनिक आणि सांस्कृतिक जडणघडणीची एक जिवंत नोंद आहे. परंपरा आणि प्रयोग, शास्त्रीयता आणि लोकप्रियता, तसेच ग्रामीण आणि शहरी संस्कृती यांचा सुंदर संगम या काळात घडला.
या अजरामर परंपरेचा प्रभाव पुढील पिढ्यांवरही कायम राहील. मराठी माणसाचं भावविश्व समृद्ध करत ही सुरेल परंपरा पुढेही प्रेरणा देत राहील.