संगीत व कला (४ ते ८)
१९५० ते २०००
१९५० ते २००० हा कालखंड महाराष्ट्राच्या चित्र-शिल्प कलेच्या इतिहासात परिवर्तनशील मानला जातो. स्वातंत्र्यानंतर देश नव्या उभारणीच्या प्रक्रियेत असताना कलेतही नव्या जाणिवांचा उदय होत होता. पारंपरिक चौकटीत अडकलेली कला हळूहळू मुक्त होत होती. कलाकारांना नव्या प्रयोगशीलतेची आणि जागतिक संदर्भांची जाणीव होत होती. या संपूर्ण बदलाचा केंद्रबिंदू मुंबई शहर होतं.
मुंबईनं या काळात केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या कलाचळवळीला दिशा दिली. स्वातंत्र्यानंतर लगेचच १९४८ च्या सुमारास ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप’ची स्थापना झाली आणि आधुनिक भारतीय कलेचा पाया घातला गेला. या गटातील एफ. एन. सूझा, एम. एफ. हुसेन, के. एच. आरा, एस. एच. रझा, एच. ए. गाडे आणि सदानंद बाकरे यांनी भारतीय कलेला पारंपरिक वास्तववादाच्या चौकटीतून बाहेर काढलं. त्यांच्या कलेत व्यक्तिनिष्ठता, प्रतीकात्मकता आणि प्रयोगशीलता स्पष्ट दिसू लागली.
या गटाबरोबरच के. के. हेब्बर, शंकर पळशीकर, वासुदेव गायतोंडे आणि लक्ष्मण पै यांसारखे कलाकार स्वतंत्रपणे कार्यरत होते. त्यांनी भारतीय जीवन, संस्कृती आणि आधुनिक शैली यांचा संगम साधण्याचा प्रयत्न केला. हेब्बर यांच्या चित्रांमध्ये सामान्य माणसाचं जीवन, श्रम आणि संस्कृतीचं प्रतिबिंब दिसतं, तर पळशीकर यांच्या चित्रांमध्ये भारतीयत्वाची एक गूढ आणि चिंतनशील छटा जाणवते. या काळातच मोहन सामंत, डी. जी. कुलकर्णी यांसारखे कलाकारही नवीन अभिव्यक्तीच्या शोधात होते.
मुंबईतील कला चळवळीला संस्थात्मक आधार मिळाला तो १९५२ मध्ये सुरू झालेल्या जहाँगीर आर्ट गॅलरीमुळे. या आर्ट गॅलरीनं कलाकारांना प्रदर्शनासाठी कायमस्वरूपी व्यासपीठ मिळवून दिले. यामुळे कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचू लागली. १९५४ ते १९७० या काळात माधुरीबेन देसाई यांनी भुलाभाई मेमोरियल इन्स्टिट्यूट चालवली. तिथं नाममात्र भाड्यात कलाकारांना कामासाठी जागा मिळत होती. हुसेन, अकबर पदमसी, गायतोंडे, बी. प्रभा यांसारखे कलाकार इथं एकत्र येऊन काम करत होते. या वातावरणातून अनेक नवीन कल्पना आणि शैली विकसित झाल्या. त्याच वेळी डॉ. होमी भाभा यांनी टी.आय.एफ.आर.मध्ये भारतीय कलाकारांच्या कलाकृतींचा संग्रह सुरू करून कलेला एक प्रकारचा कॉर्पोरेट आश्रय दिला.
१९५७ च्या सुमारास ‘बॉम्बे ग्रुप’सारख्या कलामंडळांची स्थापना झाली आणि आधुनिक कलेचे प्रयोग अधिक व्यापक झाले. त्यांनी निव्वळ बंडखोरी न करता 'भारतीयत्व' आणि 'पाश्चात्य आधुनिकता' यांचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला. या गटात के. के. हेब्बर, डी. जी. कुलकर्णी, लक्ष्मण पै आणि बाबूराव सडवेलकर यांसारख्या कलाकारांचा सहभाग होता. त्यांनी १९५७ ते १९६२ दरम्यान अनेक प्रदर्शनं भरवली. या काळात इतर प्रवाहांत स्त्री चित्रकारांनीही आपली ओळख निर्माण केली. बी. प्रभा आणि प्रफुल्ला डहाणूकर यांचं योगदान विशेष उल्लेखनीय ठरते.
१९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर मुंबई हे सांस्कृतिक केंद्र अधिक बळकट झालं. १९६३ मध्ये ‘पुंडोले आर्ट गॅलरी’ची स्थापना काली पुंडोले यांनी मुंबईच्या गजबजलेल्या फोर्ट परिसरात केली. शहरातील चैतन्यमय, उदयोन्मुख कलाविश्वातील ही सुरुवातीच्या गॅलरींपैकी एक होती. त्याच वर्षी कलाप्रेमी केकू गांधी यांनीदेखील जहाँगीर आर्ट गॅलरीच्या इमारतीमध्येच ‘केमोल्ट आर्ट गॅलरी’ची स्थापना केली.
१९६५ मध्ये राज्य सरकारनं ‘कला संचालनालय’ स्थापन करून कलाविकासाला अधिकृत दिशा दिली. या काळात कलेत विविध प्रवाह निर्माण झाले. अकबर पदमसी यांनी पारंपरिक चौकट मोडून मुक्त अभिव्यक्ती केली. त्यांच्या नग्नचित्रांमुळे मोठा वाद निर्माण झाला. तय्यब मेहता यांच्या चित्रांमध्ये मानवी संघर्ष आणि अस्वस्थता तीव्रतेनं व्यक्त झाली. प्रभाकर बरवे यांनी दैनंदिन वस्तूंमधून सूक्ष्म आणि अंतर्मुख कलाभाषा निर्माण केली.
१९७० च्या दशकात महाराष्ट्राच्या चित्रकला क्षेत्रात अत्यंत प्रतिभावान आणि अभ्यासू नवीन पिढी पुढे आली. त्यात वासुदेव कामथ आणि सुहास बहुळकर या दोन दिग्गजांची नावं प्रकर्षानं घेतली जातात. मुंबईच्या 'सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट'च्या मुशीत घडलेल्या या दोन्ही समकालीन कलाकारांनी पाश्चात्य आधुनिकतेच्या अंधानुकरणापेक्षा आपली मुळं शोधण्यावर आणि 'वास्तववादी' चित्रशैलीला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवण्यावर भर दिला. वासुदेव कामथ यांनी आपल्या अत्यंत हुबेहूब, जिवंत व्यक्तिचित्रणातून जागतिक स्तरावर ख्याती मिळवली; तर सुहास बहुळकर यांनी आपल्या कलाकृतींमधून जुन्या वास्तू, हरवत चाललेली सांस्कृतिक मूल्यं आणि नॉस्टॅल्जिया अतिशय तरलतेनं कॅनव्हासवर मांडला.
मुंबईत उपयोजित कलेचाही मोठा विकास झाला. जाहिरात, प्रकाशन आणि प्रिंटमेकिंग या क्षेत्रांत कलाकारांनी नवे प्रयोग केले. एअर इंडियाचा ‘महाराजा’ आणि एशियन पेंट्सचा ‘गट्टू’ ही त्याची लोकप्रिय उदाहरणं आहेत. त्यामुळे कला गॅलरीबाहेर येऊन लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली.
१९५० ते २००० या कालखंडात महाराष्ट्रातील शिल्पकलेतही महत्त्वपूर्ण बदल घडून आले. स्वातंत्र्यानंतरच्या काळात शिल्पकला प्रामुख्याने स्मारकशिल्पं आणि व्यक्तिशिल्पं या स्वरूपात विकसित झाली. सार्वजनिक ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या पुतळ्यांमधून राष्ट्रीय नेते, समाजसुधारक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचं स्मरण जपलं गेलं. या क्षेत्रात राम सुतार यांसारख्या शिल्पकारांनी विशेष ख्याती मिळवली. त्यांच्या शिल्पांमध्ये वास्तववादी अचूकता, भव्यता आणि व्यक्तिमत्त्वाचा सजीवपणा दिसून येतो. याचबरोबर काही कलाकारांनी पारंपरिक चौकटीपलीकडे जाऊन आधुनिक आणि अमूर्त शिल्पनिर्मितीचे प्रयोग सुरू केले. धातू, दगड, लाकूड यांसारख्या पारंपरिक माध्यमांसोबतच नवीन साहित्यांचा वापर करून अभिव्यक्तीचे नवे मार्ग शोधले गेले. मुंबई आणि पुणे येथे शिल्पप्रदर्शनांना चालना मिळाली आणि शिल्पकला हळूहळू सार्वजनिक जागा आणि कला दालनांमध्ये अधिक दृश्यमान झाली. एकूणच, या काळात शिल्पकलेनं स्मारकात्मकतेपासून आधुनिक अभिव्यक्तीकडे वाटचाल करत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
१९८० आणि १९९० च्या दशकात कलेच्या क्षेत्रात मोठा बदल घडला. १९८७ मध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘ख्रिस्तीज’ या लिलाव संस्थेनं मुंबईतील ताजमहाल हॉटेलमध्ये हेल्पएज इंडिया या संस्थेसाठी निधी उभारण्याच्या उद्देशानं एक महत्त्वपूर्ण कला लिलाव आयोजित केला. या लिलावापूर्वी भारतीय चित्रकलेची बाजारपेठ मर्यादित स्वरूपाची होती आणि चित्रांची किंमत काही हजार रुपयांतच ठरत असे; परंतु या लिलावामुळे प्रथमच भारतीय चित्रांना लाखांच्या घरात किंमत मिळू लागली. एम. एफ. हुसेन, तैय्यब मेहता, अकबर पदमसी यांसारख्या कलाकारांच्या कलाकृतींना मोठी आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त झाली. या घटनेनं भारतीय कलेच्या व्यापारीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि कलेला गुंतवणुकीचं स्वरूप मिळू लागलं. पुढे १९८९ मध्ये ‘सोथबीज’च्या लिलावामुळे ही प्रक्रिया अधिक वेगानं पुढे गेली.
इतर महाराष्ट्र
मुंबईबरोबरच महाराष्ट्राच्या इतर भागांतही कलेचा विकास होत होता; मात्र तो अधिक स्थानिक स्वरूपाचा होता.
पुण्यातूनही अनेक कलाकार कलासेवेत कार्यरत होते. पुण्यात प्रामुख्यानं पुस्तकं आणि नियतकालिकं यांच्या मुखपृष्ठनिर्मितीवर भर होता.
पुण्याचे ग. ना. जाधव (१९१७–२००४) हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिभाशाली आणि वास्तववादी शैलीचे चित्रकार होऊन गेले. त्यांनी 'किर्लोस्कर', 'स्त्री' आणि 'मनोहर' यांसारख्या प्रसिद्ध मासिकांची मुखपृष्ठं आणि कथाचित्रं रंगवून महाराष्ट्रातील घराघरांत आपली ओळख निर्माण केली. डॉ. भैयासाहेब ओंकार (१९३०–१९९९) हे पुण्यातील अत्यंत प्रतिष्ठित चित्रकार आणि कला-शिक्षक म्हणून प्रसिद्धीस आले. महाराष्ट्राच्या चित्रकला आणि कला-शिक्षणात त्यांचं मोठं योगदान होतं.
पुण्याचे शि. द. फडणीस हे अत्यंत ख्यातनाम मराठी व्यंगचित्रकार आहेत. त्यांच्या शब्दविरहित चित्रांनी अनेक पुस्तकं आणि नियतकालिकांची मुखपृष्ठं सजली. 'हंस', 'नवल' आणि 'मोहिनी' या मासिकांमधून त्यांची चित्रं सातत्यानं प्रसिद्ध होत राहिली. सुभाष अवचट या १९७० च्या दशकातील कलाकारानं मुखपृष्ठरचनांकडे केवळ सजावटीच्या दृष्टीने न पाहता, त्या पुस्तकाच्या आशयाचा दृश्यार्थ उलगडणारं माध्यम म्हणून वापर केला. प्रतीकात्मकता, विरूपीकरण आणि रंगसंगतीचा प्रभावी वापर ही त्यांच्या शैलीची ठळक वैशिष्ट्यं ठरली. त्यांच्या मुखपृष्ठांतून पुस्तकांना एक वेगळी कलात्मक ओळख मिळाली.
कोल्हापूरमध्ये आबालाल रहमान आणि बाबूराव पेंटर यांनी निर्माण केलेली वास्तववादी परंपरा कायम राहिली. पुढे काही कलाकारांनी आधुनिकतेकडे वाटचाल केली. नाशिक आणि जळगावमध्ये ‘नाशिक कला निकेतन’सारख्या संस्थांनी कलेचं वातावरण तयार केले. विदर्भात नागपूरमध्ये प्रयोगशील चित्रकला विकसित झाली, तर ‘बालजगत’ आणि ‘बसोली’सारख्या उपक्रमांमुळे बालचित्रकलेची चळवळ उभी राहिली. मराठवाड्यात नांदेड येथील ‘अभिनव चित्रशाळा’ आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयानं कला शिक्षणाचा प्रसार केला.
या काळात लोककला आणि आदिवासी कलेलाही नवी ओळख मिळाली. वारली चित्रकलेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. जिव्या सोमा म्हसे यांसारख्या कलाकारांनी या कलेला जागतिक स्तरावर पोहोचवलं. पिंगुळीची चित्रकथी आणि सावंतवाडीचे गंजीफा यांचाही अभ्यास करण्यात आला.
अद्वितीय कलाकार
एकंदरीत १९५० ते २००० हा कालखंड मुंबईतील काही अद्वितीय कलाकारांनी गाजवला. यामध्ये एम. एफ. हुसेन, शंकर पळशीकर, प्रभाकर बरवे, राम सुतार, तसेच के. के. हेब्बर, अकबर पदमसी आणि के. एच. आरा यांसारख्या अमराठी कलाकारांचा आवर्जून उल्लेख करणं आवश्यक आहे.
मकबूल फिदा हुसेन ऊर्फ एम. एफ. हुसेन (१९१५–२०११) हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय चित्रकार म्हणून या काळात प्रसिद्धीस आले. त्यांना कलाजगतात 'भारताचा पिकासो' म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रातील पंढरपूर येथे बोहरा कुटुंबात जन्मलेल्या हुसेन यांचं इंदूरमध्ये शालेय शिक्षण झाल्यानंतर १९३४ पासून त्यांनी मुंबई आपली कर्मभूमी मानली. १९४८ मध्ये ते 'प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप' या प्रागतिक चित्रकार संघात सामील झाले. या गटाचा दृष्टिकोन अत्यंत आधुनिक होता. अमूर्त (ॲबस्ट्रॅक्ट) या पाश्चात्य शैलीचा वापर करून त्यांनी भारतीय परंपरेला अनुसरणारे विषय रेखाटले. त्यांनी ५०,००० हून अधिक चित्रं काढली. त्यात त्यांनी प्रसिद्ध 'घोड्यांची चित्रमालिका' साकारली. त्यांच्या ‘होळी’, ‘मराठी स्त्रिया’, ‘टोपलीतील मूल’, ‘बाहुलीचं लग्न’, ‘मदर तेरेसा’ आणि ‘घाशीराम कोतवाल’ यांसारख्या चित्रांना विशेष लोकप्रियता मिळाली. त्यांच्या ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ मालिका देखील जागतिक स्तरावर गाजल्या. ‘द रामन इफेक्ट’ आणि जपानमधील हिरोशिमा-नागासाकी विध्वंसाच्या स्मृत्यर्थ ‘नेव्हर अगेन’ नावाचा ३३ फुटांचा कॅनव्हास त्यांनी रंगवला; तोदेखील अतिशय प्रसिद्ध झाला.
त्यांना भारत सरकारनं ‘पद्मविभूषण’ (१९९१) या सर्वोच्च नागरी सन्मानानं गौरवलं. १९८६ मध्ये त्यांची राज्यसभेवर नेमणूकही झाली. हुसेन यांचं व्यक्तिमत्त्व प्रचंड लोकप्रियतेसोबतच सदैव वादग्रस्त राहिलं. त्यांनी काढलेल्या हिंदू देवदेवतांच्या आणि ‘भारतमातेच्या’ आक्षेपार्ह नग्न चित्रांमुळे त्यांच्यावर खटले चालले. सर्वोच्च न्यायालयानं त्यांना निर्दोष ठरवलं तरीही वाढत्या विरोधामुळे २००९ मध्ये त्यांना देश सोडावा लागला.
शंकर बळवंत पळशीकर (१९१६–१९८४) हे भारतीय आधुनिक चित्रकलेतील अत्यंत महत्त्वाचे, प्रभावशाली चित्रकार आणि कलाशिक्षक होते. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील शंकर पळशीकरांनी लहान वयातच कलेच्या शोधात १९३८ मध्ये मुंबई गाठली. त्यांनी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून पदवी घेतल्यानंतर तिथंच अध्यापनाला सुरुवात केली आणि अखेर डीन या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले. पळशीकरांची चित्रशैली अमूर्त असूनही त्यांच्या चित्रांमध्ये एक सखोल अर्थ दडलेला असायचा. विशिष्ट रंगांचा वापर करून ते चित्रात अंतर्मुख करणारी शांतता निर्माण करत. भारतीय परंपरा आणि आधुनिक विचार यांचा त्यांच्या चित्रांत सुरेख समन्वय असायचा. त्यांच्या प्रसिद्ध कलाकृतींमध्ये ‘ग्रीन लोटस’ आणि ‘क्रुसेड फॉर फ्रीडम’ यांसारख्या चित्रांचा समावेश होतो. याशिवाय त्यांनी लोकमान्य टिळक, लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांची उत्कृष्ट व्यक्तिचित्रंही रंगवली. ललित कला अकादमीनं त्यांना भारतातील नऊ प्रमुख कलाकारांच्या यादीत मानाचं स्थान दिले. पुढची पिढी त्यांच्याकडे एक निष्ठावान शिक्षक म्हणून आदरानं पाहते.
प्रभाकर बरवे (१९३६–१९९५) हे भारतीय आधुनिक चित्रकलेतील अत्यंत महत्त्वाचे आणि श्रेष्ठ चित्रकार होते. त्यांचं आधुनिक कलेतील योगदान लक्षणीय मानलं गेलं. बरवे हे प्रामुख्यानं प्रतीकवादी आणि अमूर्तवादी चित्रकार म्हणून ओळखले जातात. दैनंदिन जीवनातील सामान्य वस्तूंचं चित्रण करून त्यातून भावनिक आणि गूढ संदर्भ निर्माण करणं हे त्यांच्या शैलीचं प्रमुख वैशिष्ट्य होतं. त्यांच्या अनेक चित्रांची शीर्षकं काव्यात्मक असत. १९७४ मध्ये त्यांनी ‘अस्तित्व’ नावाचा चित्रकारांचा गट स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता. त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना १९७६ मध्ये ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांची चित्रं अमेरिका, फ्रान्स आणि झुरिचसह जगभरातील अनेक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये झळकली. त्यांनी ‘कोरा कॅनव्हास’ हे पुस्तकही लिहिलं आहे.
मूळच्या धुळे जिल्ह्यातील राम वंजी सुतार (१९२५–२०२५) यांनी १९५३ मध्ये मुंबईच्या ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’मधून शिल्पकलेतील पदविका मिळवली आणि कार्याला सुरुवात केली. राम सुतार यांना स्मारकशिल्पं आणि व्यक्तिशिल्पं घडविण्यात मोठी ख्याती मिळाली. अजिंठा आणि वेरूळ येथील शिल्पांची डागडुजी, चंबळ नदीवरील गांधीसागर धरणावर उभारलेलं ४५ फुटी स्मारकशिल्प, संसद भवनातील त्यांचं महात्मा गांधींचं १७ फुटी विचारमग्न शिल्प ही त्यांची प्रमुख योगदानं आहेत. त्यांचं सर्वांत उत्तुंग कार्य म्हणजे गुजरातमधील सरदार सरोवरावरील ५९७ फूट उंचीचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’! त्यांनी आपल्या ७५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत १५० हून अधिक स्मारकशिल्पं आणि अनेक महत्त्वाच्या नेत्यांचे पुतळे घडवले. शिल्पकलेतील या अद्वितीय योगदानासाठी भारत सरकारनं त्यांना २०१६ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्कारानं सन्मानित केले.
या व्यतिरिक्त मुंबईनं अनेक अमराठी कलाकारांना मानाचं स्थान दिले आणि त्या कलाकारांनी मुंबईला आपली कर्मभूमी मानून भारताची कीर्ती जगभर पसरवली. त्यात के. के. हेब्बर, अकबर पदमसी आणि के. एच. आरा यांचा आवर्जून उल्लेख करणं आवश्यक आहे.
मूळचे कर्नाटक प्रांतातील विख्यात चित्रकार के. के. हेब्बर (१९११–१९९६) यांनी मुंबई हीच कर्मभूमी मानून तेथूनच कलेची सेवा केली. स्वातंत्र्योत्तर काळात अस्सल भारतीय आशय मांडणाऱ्या कलावंतांमध्ये त्यांचं नाव अग्रगण्य आहे. वास्तववाद ते अमूर्त शैलीपर्यंत त्यांची कला विस्तारलेली होती. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतल्यानंतर १९३९–४६ दरम्यान त्यांनी तिथेच अध्यापन केलं. ‘एनर्जी’ या चित्रमालिकेत त्यांनी पंचमहाभूतांचं प्रतीकात्मक चित्रण केलं. बांगलादेश युद्ध, भोपाळ दुर्घटना यांसारखे विषयही त्यांनी चित्रकलेतून हाताळले. १९८९ मध्ये भारत सरकारनं त्यांचा ‘पद्मभूषण’ या सन्मानानं गौरव केला.
अकबर पदमसी (१९२८–२०२०) हे कलेतील रूढ वाटा नाकारून मुक्त आविष्कार करणारे एक बंडखोर चित्रकार होते. १९६० च्या दरम्यान त्यांनी जहाँगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शित केलेल्या नग्न स्त्री-पुरुषांच्या चित्रांमुळे त्यांना समाजाचा असंतोष आणि खटल्यांनाही सामोरं जावं लागलं होतं. त्यांच्या चित्रांमधून युद्ध आणि सत्तास्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भरडला जाणारा सामान्य माणूस, त्याची कोंडलेली ऊर्जा आणि उद्विग्नता अत्यंत सशक्तपणे व्यक्त होत असे.
के. एच. आरा हेदेखील ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप’चे एक महत्त्वाचे सदस्य होते, ज्यांनी आपल्या कलाकृतींनी तत्कालीन कलाविश्वात खळबळ माजवली. ते त्यांच्या ‘नाईव्ह’ शैलीतील नग्न चित्रं आणि ‘स्टिल लाईफ’ रंगवण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांचा थेट भाष्य आणि आविष्कार अत्यंत प्रभावी असायचा.
समारोप
या पन्नास वर्षांच्या कालखंडाकडे पाहिलं, तर महाराष्ट्रातील चित्र–शिल्पकलेनं पारंपरिकतेच्या चौकटीतून बाहेर पडत आधुनिकतेकडे वाटचाल केली, असं स्पष्ट दिसतं. या प्रवासात मुंबईनं केंद्रस्थानी राहून कलाकार, संस्था, गॅलऱ्या आणि बाजारपेठ यांचा प्रभावी संगम घडवला. त्याच वेळी महाराष्ट्राच्या इतर भागांत स्थानिक परंपरा जपत आधुनिकतेचा स्वीकार करण्याची प्रक्रिया सुरू राहिली. एकूणच, १९५० ते २००० हा काळ महाराष्ट्राच्या कलेसाठी अत्यंत समृद्ध ठरला. या काळात कलेची केवळ रूपरचना बदलली नाही, तर तिची दृष्टी, व्याप्ती आणि समाजावरचा प्रभावही मोठ्या प्रमाणावर विस्तारला. त्यामुळे पुढील पिढ्यांसाठी हा काळ प्रेरणादायी आणि मूल्यवान वारसा ठरतो.