सामाजिक चळवळी (२० ते २१)
१९५० ते २०००
१९५० ते २००० हा कालखंड महाराष्ट्रातील दलित चळवळीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीनंतर दलित समाजाला घटनात्मक अधिकार प्राप्त झाले; मात्र केवळ कायदेशीर समानता मिळाल्याने सामाजिक विषमता नष्ट होणार नाही, याची जाणीव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना होती. म्हणूनच त्यांनी दलित मुक्तीचा प्रश्न केवळ राजकीय सत्तेपुरता मर्यादित ठेवला नाही. त्यांनी तो सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तन यांच्याशी जोडला.
या काळातील दलित चळवळीकडे फक्त राजकीय चळवळ म्हणून पाहणे अपुरे ठरते. ही चळवळ सामाजिक विषमतेविरुद्धचा संघर्ष होती. साहित्य, गीत, नाट्य, जलसे, नियतकालिके, आंदोलन आणि वैचारिक लेखन या सर्व माध्यमांतून या चळवळीने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात मोठा बदल घडवून आणला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ विचार
महाराष्ट्रातील दलित चळवळीची वैचारिक पायाभरणी पूर्णतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर उभी होती. आंबेडकरांनी भारतीय समाजरचनेतील जातिव्यवस्थेचे कठोर विश्लेषण केले. त्यांच्या मते सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विषमता या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा मूलमंत्र पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरला. समानता, बंधुता, स्वातंत्र्य आणि मानवता ही मूल्ये दलित चळवळीच्या केंद्रस्थानी राहिली.
धर्मांतर आणि महानिर्वाण, १९५६
भारतीय समाजातील जातिव्यवस्था, अस्पृश्यता आणि सामाजिक अपमान यांच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतराची भूमिका विकसित झाली. हिंदू धर्माच्या चौकटीत दलितांना समानता आणि सन्मान मिळणे अशक्य आहे, अशी त्यांची ठाम धारणा झाली होती. त्यांनी “मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही” अशी ऐतिहासिक घोषणा केली. त्यानंतर त्यांनी विविध धर्मांचा अभ्यास केला आणि शेवटी समता, विवेक, करुणा आणि मानवता यांवर आधारित बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे दलित समाजाला मानसिक गुलामगिरीतून मुक्त करून स्वतंत्र सांस्कृतिक ओळख देण्याचा तो व्यापक सामाजिक प्रयत्न होता.
या पार्श्वभूमीवर १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ. आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. भदंत चंद्रमणी यांच्या हस्ते त्यांनी त्रिशरण आणि पंचशील स्वीकारले. त्यानंतर त्यांनी आपल्या अनुयायांना बावीस प्रतिज्ञा दिल्या. या प्रतिज्ञांमधून जातीयता, अंधश्रद्धा आणि उच्चवर्णीय धार्मिक प्रथा नाकारून समताधिष्ठित जीवनमूल्यांचा स्वीकार करण्यात आला. धर्मांतरामुळे दलित समाजात स्वाभिमानी जीवनदृष्टी निर्माण झाली.
या धर्मांतर आंदोलनाचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावर झाले. दलित समाजात शिक्षण, संघटन आणि वैचारिक प्रबोधनाला नवे महत्त्व प्राप्त झाले. आंबेडकरी जलसे, भीमगीते, बौद्ध साहित्य, स्मृतिदिन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांच्या माध्यमातून स्वतंत्र सांस्कृतिक परंपरा निर्माण झाली. पुढे दलित साहित्य, दलित पँथर, नामांतर आंदोलन आणि सामाजिक न्यायाच्या विविध चळवळींना या धर्मांतर आंदोलनातून वैचारिक ऊर्जा मिळाली. त्यामुळे १९५६ चे धर्मांतर आंदोलन हे दलित समाजाच्या सांस्कृतिक परिवर्तनाच्या इतिहासातील एक निर्णायक टप्पा ठरले.
बौद्ध धर्माची दीक्षा दिल्यानंतर अवघ्या दीड महिन्यात, ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निधन झाले. त्यांच्या महानिर्वाणामुळे दलित समाजावर मोठा मानसिक आघात झाला. दलित चळवळीने आपला सर्वोच्च वैचारिक नेता, संघटक आणि मार्गदर्शक गमावला. सामाजिक समता, शिक्षण, संघटन आणि आत्मसन्मान यांसाठी संघर्ष करणारा एक प्रखर आवाज अचानक शांत झाला. आंबेडकरांच्या निधनानंतर दलित चळवळीत नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आणि पुढे रिपब्लिकन पक्षात गटबाजी व मतभेद वाढले. तरीही त्यांनी दिलेला समता, मानवता आणि संघर्षाचा विचार दलित समाजासाठी प्रेरणास्थान राहिला. त्यांच्या मृत्यूनंतरही दलित चळवळ अधिक व्यापक सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूपात पुढे विकसित झाली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना १९९० साली मरणोत्तर ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, १९५७
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राजकीय विचारांतून दलित समाजाला स्वतंत्र राजकीय नेतृत्व मिळावे यावर विशेष भर दिला होता. त्यांच्या मते, सामाजिक समतेसाठीचा संघर्ष प्रभावीपणे पुढे न्यायचा असेल तर दलित समाजाला स्वतःचे राजकीय व्यासपीठ असणे आवश्यक होते. या भूमिकेतूनच त्यांनी ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ या पक्षाची संकल्पना मांडली होती. मात्र, ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांच्या मृत्यूमुळे ही योजना त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकली नाही. त्यानंतर त्यांच्या अनुयायांनी पुढाकार घेऊन १९५७ मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली. या पक्षामागे केवळ निवडणूक राजकारणाचा हेतू नव्हता; तर दलित, कामगार, शेतकरी आणि वंचित घटकांना संघटित करून सामाजिक न्यायासाठी व्यापक संघर्ष उभारण्याची भूमिका होती.
रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेमुळे दलित समाजाला स्वतंत्र राजकीय व्यासपीठ मिळाले. डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य या पक्षाने केले. महाराष्ट्रात आणि देशातील अनेक भागांत दलित समाज राजकीयदृष्ट्या अधिक जागृत झाला. परंतु, पुढील काळात पक्षात गटबाजी आणि नेतृत्वातील मतभेद वाढले. त्यामुळे पक्षाची ताकद कमी होत गेली.
भूमिहीनांचा सत्याग्रह, १९६४
१९६४ सालचा भूमिहीनांचा सत्याग्रह हा महाराष्ट्रातील आणि देशातील शोषितांच्या चळवळीच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. ग्रामीण भारतात जमिनीची मालकी ही केवळ उपजीविकेची बाब नव्हती; तर ती सामाजिक प्रतिष्ठा, सत्ता आणि सन्मानाचे प्रतीक होती. भूमिहीन दलित आणि शेतमजूर समाज पिढ्यानपिढ्या जमीनदारांवर अवलंबून असल्यामुळे त्यांचे आर्थिक आणि सामाजिक शोषण कायम राहिले होते. या पार्श्वभूमीवर कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी भूमिहीनांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी व्यापक आंदोलन उभारले. २१ ऑक्टोबर १९६४ रोजी त्यांच्या नेतृत्वाखाली संसदेवर एक विराट मोर्चा काढण्यात आला. देशभरातून एक लाखांहून अधिक भूमिहीन आणि शेतमजूर या मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चाद्वारे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना दहा प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले. “कसेल त्याची जमीन” ही मागणी या आंदोलनाचा केंद्रबिंदू होती. तसेच भूमिहीनांना पडीक जमिनी द्याव्यात, झोपडपट्टीवासीयांना घरे मिळावीत, नवबौद्धांच्या सवलती कायम ठेवाव्यात आणि दलितांवरील अत्याचार थांबवावेत अशा व्यापक मागण्या सरकारपुढे ठेवण्यात आल्या.
सरकारने मागण्यांची दखल न घेतल्यामुळे ६ डिसेंबर १९६४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतिदिनी देशव्यापी भूमिहीन सत्याग्रह सुरू करण्यात आला. हा सत्याग्रह केवळ दलितांचा नव्हता; तर सर्व भूमिहीनांचा लढा बनला. यात दलितांसह मराठा, माळी, कोळी, तसेच हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध समाजातील हजारो भूमिहीन सहभागी झाले. “कसेल त्याची जमीन, पण नसेल त्याचे काय?” या दादासाहेब गायकवाड यांच्या घोषणेने शोषित समाजात मोठी जागृती निर्माण केली. या आंदोलनात सुमारे साडेतीन लाख सत्याग्रहींनी तुरुंगवास पत्करला. तुरुंग अपुरे पडल्यामुळे शाळा आणि मंदिरांमध्येही सत्याग्रहींना ठेवावे लागले. या सत्याग्रहात महिलांचाही मोठा सहभाग होता. हजारो महिला मुलाबाळांसह आंदोलनात उतरल्या. हा संघर्ष अत्यंत शांततापूर्ण आणि सनदशीर मार्गाने चालवण्यात आला.
या व्यापक जनआंदोलनामुळे केंद्र सरकारला भूमिहीनांच्या प्रश्नाची दखल घेणे भाग पडले. ३० जानेवारी १९६५ रोजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दादासाहेब गायकवाड आणि इतर नेत्यांना चर्चेसाठी बोलावले. सरकारने भूमिहीनांना पडीक जमिनी वाटप करण्याचे आणि संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ४ फेब्रुवारी १९६५ रोजी हा ऐतिहासिक सत्याग्रह मागे घेण्यात आला. या आंदोलनात १३ सत्याग्रहींना बलिदान द्यावे लागले. भूमिहीनांचा सत्याग्रह हा केवळ आर्थिक हक्कांसाठीचा संघर्ष नव्हता; तर तो सामाजिक सन्मान, आणि समतेसाठीचा व्यापक लढा होता. या आंदोलनामुळे दादासाहेब गायकवाड हे देशातील सर्व भूमिहीन आणि शेतमजुरांचे लोकनेते म्हणून उदयास आले.
दलित पँथरची स्थापना, १९७२
१९७० च्या दशकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील दलित तरुणांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर रिपब्लिकन पक्षात गटबाजी वाढली होती आणि दलितांवरील अत्याचारही सुरूच होते. मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या सुशिक्षित दलित तरुणांनी या परिस्थितीविरुद्ध अधिक आक्रमक संघर्षाची भूमिका स्वीकारली. अमेरिकेतील ‘ब्लॅक पँथर’ चळवळीपासून प्रेरणा घेत जून १९७२ मध्ये ‘दलित पँथर’ या संघटनेची स्थापना करण्यात आली. नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज. वि. पवार आणि अरुण कांबळे हे या चळवळीचे प्रमुख संस्थापक होते. डॉ. आंबेडकरांच्या समतेच्या विचारांना आणि ब्लॅक पँथरच्या संघर्षशीलतेला एकत्र आणून दलितांवरील अत्याचारांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न दलित पँथरने केला. दलित पँथरच्या कार्यकर्त्यांमध्ये कवी, लेखक आणि विचारवंत मोठ्या प्रमाणात होते. नामदेव ढसाळ यांच्या ‘विद्रोह’ या नियतकालिकातून प्रसिद्ध झालेल्या कविता आणि लेखांनी दलितांच्या वेदना, संताप आणि विद्रोह अत्यंत वास्तववादी पद्धतीने मांडले.
दलित पँथरने केवळ साहित्यिक किंवा वैचारिक चळवळ उभी केली नाही; तर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची नवी परंपरा निर्माण केली. दलितांवरील अत्याचारांना प्रत्यक्ष प्रतिकार करणे, मोर्चे काढणे, काँग्रेस सरकारविरुद्ध निदर्शने करणे आणि सामाजिक विषमतेविरुद्ध आक्रमक भूमिका घेणे हे त्यांच्या कार्याचे प्रमुख स्वरूप होते. १९७३ मध्ये दलित पँथरने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात दलितांच्या प्रश्नांना भांडवलशाही, जमीनदारी आणि सामाजिक शोषणाशी जोडण्यात आले. “दलित” या संकल्पनेत त्यांनी केवळ अस्पृश्य समाज नव्हे, तर भूमिहीन, गरीब शेतकरी, शोषित महिला आणि इतर वंचित घटकांचाही समावेश केला. पुढे मार्क्सवाद आणि बौद्ध विचारधारा यांबाबत संघटनेत मतभेद निर्माण झाले. आणीबाणीच्या काळातील सरकारी दडपशाहीमुळेही संघटना कमकुवत झाली आणि १९७७ मध्ये दलित पँथर बरखास्त करण्यात आली.
तरीही दलित पँथरने महाराष्ट्रातील दलित साहित्य, सामाजिक संघर्ष आणि राजकारणावर कायमस्वरूपी प्रभाव टाकला. दलित साहित्याला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात आणि दलित तरुणांमध्ये आत्मसन्मान व संघर्षशीलता निर्माण करण्यात या चळवळीचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
नामांतर आंदोलन
१९७६ ते १९९४ या काळात चाललेले नामांतर आंदोलन हे महाराष्ट्रातील दलित चळवळीतील सर्वात प्रदीर्घ आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आंदोलन मानले जाते. औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे, या मागणीसाठी हा संघर्ष उभा राहिला. १९७७ मध्ये महाराष्ट्र विधानसभेने नामांतराचा ठराव मंजूर केल्यानंतर जातीयवाद पेटला आणि त्याच्या संपूर्ण मराठवाड्यात हिंसक प्रतिक्रिया उमटल्या. अनेक ठिकाणी दलित वस्त्यांवर हल्ले झाले, घरे जाळण्यात आली. या हिंसाचारातून प्रस्थापित समाजातील जातीय मानसिकता आणि सांस्कृतिक वर्चस्व टिकवून ठेवण्याची प्रवृत्ती स्पष्ट झाली.
या आंदोलनाने दलित समाजामध्ये आत्मसन्मान आणि सांस्कृतिक अधिकारांविषयी तीव्र जागृती निर्माण केली. दलित पँथर आणि विविध दलित संघटनांनी हा संघर्ष व्यापक स्वरूपात उभा केला. तब्बल सोळा वर्षांच्या संघर्षानंतर १४ जानेवारी १९९४ रोजी विद्यापीठाचा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ” असा नामविस्तार करण्यात आला. या विजयामुळे दलित चळवळीला नवी वैचारिक ऊर्जा मिळाली. नामांतर आंदोलन हे महाराष्ट्रातील दलित समाजाच्या सांस्कृतिक हक्कांच्या लढ्याचे एक ऐतिहासिक प्रतीक ठरले.
रिडल्स आंदोलन, १९८७
१९८७ सालचे रिडल्स आंदोलन हे महाराष्ट्रातील दलित चळवळीच्या वैचारिक परिपक्वतेचे एक महत्त्वपूर्ण उदाहरण मानले जाते. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘लेखन आणि भाषणे’ या मालिकेतील ‘रिडल्स इन हिंदुइझम’ या ग्रंथावर काही हिंदुत्ववादी संघटनांनी बंदी घालण्याची मागणी केली होती. या ग्रंथात डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्मग्रंथ, देवदेवता आणि सामाजिक परंपरांची अत्यंत तर्कशुद्ध चिकित्सा केली होती. ही भूमिका प्रस्थापित समाजाला अस्वस्थ करणारी ठरली. या बंदीच्या मागणीविरोधात दलित तरुण, लेखक आणि विचारवंत मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.
या आंदोलनाचे वैचारिक नेतृत्व राजा ढाले यांच्यासारख्या प्रखर विचारवंतांनी केले. त्यांनी फुले-आंबेडकरी विचारधारा अत्यंत आक्रमक आणि तर्कशुद्ध पद्धतीने मांडून बंदीची मागणी करणाऱ्यांना वैचारिक आव्हान दिले. या आंदोलनामुळे दलित तरुणांमध्ये वैचारिक आत्मविश्वास आणि चिकित्सक दृष्टी अधिक बळकट झाली. अखेरीस, बाळ ठाकरे, तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि दलित नेते यांच्यात चर्चा होऊन तडजोड करण्यात आली. “या ग्रंथात व्यक्त झालेल्या मतांशी महाराष्ट्र शासन सहमत असेलच असे नाही” अशी तळटीप जोडून हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला.
रिडल्स आंदोलनाने दलित चळवळ ही केवळ रस्त्यावरील संघर्ष करणारी चळवळ नसून वैचारिक आणि सांस्कृतिक स्तरावरही सक्षम आहे, हे स्पष्टपणे सिद्ध केले.
दलित चळवळीचे सांस्कृतिक योगदान
१९५० ते २००० या काळातील दलित चळवळीचे महाराष्ट्राच्या कला, साहित्य आणि संस्कृतीवर अत्यंत दूरगामी परिणाम झाले. या चळवळीने मराठी साहित्याला नवा आशय आणि नवी भाषा दिली. पारंपरिक मराठी साहित्य मुख्यतः मध्यमवर्गीय आणि सुखवस्तू जीवनाभोवती केंद्रित होते. दलित साहित्याने मात्र गावकुसाबाहेरील जीवन, जातीय अपमान, दारिद्र्य, भूक, संघर्ष आणि मानवी वेदना साहित्याच्या केंद्रस्थानी आणल्या. बाबूराव बागूल, शंकरराव खरात, नामदेव ढसाळ, दया पवार आणि लक्ष्मण माने यांसारख्या लेखकांनी दलित समाजाचे वास्तव निर्भीडपणे मांडले. आत्मकथन, कथा, कविता आणि कादंबऱ्यांमधून दलित समाजाचा आत्मशोध आणि अस्मितेचा संघर्ष व्यक्त झाला. त्यामुळे मराठी साहित्याला सामाजिक वास्तवाचे नवे भान प्राप्त झाले आणि प्रस्थापित साहित्यिक मूल्यांनाही आव्हान मिळाले.
दलित चळवळीने मराठी रंगभूमी आणि लोककलांमध्येही मोठे परिवर्तन घडवले. आंबेडकरी जलसे, भीमगीते, पथनाट्ये आणि सामाजिक नाटकांच्या माध्यमातून समाजप्रबोधन आणि आत्मविश्वास निर्माण करण्यात आला. भीमराव कर्डक आणि वामनदादा कर्डक यांसारख्या शाहिरांनी डॉ. आंबेडकरांचे विचार लोकभाषेतून आणि गीतांमधून घराघरात पोहोचवले. दलित रंगभूमीने मनोरंजनापेक्षा सामाजिक प्रश्नांना अधिक महत्त्व दिले. दलित नाटककारांच्या लेखनातून समता आणि सामाजिक न्याय यांचा पुरस्कार करण्यात आला. पथनाट्ये आणि प्रयोगशील नाटकांतून दलितांचे वेदना आणि विद्रोह समाजासमोर आले. त्यामुळे मराठी नाट्यसृष्टीला सामाजिक बांधिलकीची नवी दिशा मिळाली.
या चळवळीचा प्रभाव चित्रपट, चित्रकला, शिल्पकला आणि सांस्कृतिक उत्सवांवरही पडला. सुरुवातीला चित्रपटांत दलित समाजाचे चित्रण अत्यंत मर्यादित होते; मात्र पुढे दलितांचे वास्तववादी जीवन आणि त्यांचे प्रश्न चित्रपट व माहितीपटांमधून मांडले जाऊ लागले. अनेक दलित कलाकारांनी आपल्या चित्रांमधून आणि शिल्पांमधून सामाजिक दुःख, संघर्ष आणि विद्रोह व्यक्त केला. गावोगावी डॉ. आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांचे पुतळे उभारण्यात आले.
‘आंबेडकर जयंती’ आणि ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ हे मोठे सांस्कृतिक उत्सव बनले. या निमित्ताने लाखो लोक एकत्र येऊ लागले. विचारांची देवाणघेवाण, व्याख्याने, पुस्तक प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांमधून एक व्यापक सांस्कृतिक चळवळ उभी राहिली. याच काळात दलित समाजाने स्वतःची वर्तमानपत्रे आणि लघुअनियतकालिके सुरू करून प्रस्थापित व्यवस्थेवर थेट प्रश्न उपस्थित केले.
दलित साहित्य, रंगभूमी, गीते आणि लोककला सामाजिक परिवर्तनाची प्रभावी साधने बनली. या चळवळीमुळे मराठी संस्कृतीचे लोकशाहीकरण झाले. प्रस्थापित सांस्कृतिक मक्तेदारीला आव्हान मिळाले आणि उपेक्षित समाजाच्या अनुभवांना मुख्य प्रवाहात स्थान प्राप्त झाले. दलित समाजाने स्वतःची स्वतंत्र सांस्कृतिक ओळख निर्माण केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या आधुनिक सांस्कृतिक इतिहासात दलित चळवळीचे योगदान अत्यंत मूलभूत, परिवर्तनवादी आणि ऐतिहासिक मानले जाते.
समारोप
१९५० ते २००० या काळातील महाराष्ट्रातील दलित चळवळ सामाजिक समता आणि आत्मसन्मानाची व्यापक चळवळ बनली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला समता, मानवता आणि स्वाभिमानाचा विचार या काळात समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचला. धर्मांतर आंदोलन, भूमिहीन सत्याग्रह, दलित पँथर, नामांतर आंदोलन आणि रिडल्स आंदोलन यांसारख्या संघर्षांतून दलित समाजाने आपले सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क प्रखरपणे मांडले. या चळवळीने उपेक्षित समाजात आत्मभान निर्माण केले आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची नवी मानसिकता घडवली.
या चळवळीचा प्रभाव महाराष्ट्राच्या साहित्य, कला, संगीत, रंगभूमी आणि सांस्कृतिक जीवनावर अत्यंत खोलवर पडला. दलित साहित्याने मराठी साहित्याला नवे वास्तव दिले. भीमगीते, जलसे, पथनाट्ये आणि लोककलेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाची व्यापक चळवळ उभी राहिली. आंबेडकर जयंती आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन यांसारखे उत्सव सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्याचे केंद्र बनले. दलित समाजाने स्वतःची स्वतंत्र सांस्कृतिक ओळख निर्माण करत प्रस्थापित सांस्कृतिक मक्तेदारीला आव्हान दिले.
१९५० ते २००० या काळातील दलित चळवळ ही महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील एक परिवर्तनवादी आणि प्रेरणादायी अध्याय म्हणून कायम स्मरणात राहील.