साहित्य (११ ते १४)
१९५० ते २०००
१९५० ते २००० हा काळ मराठी साहित्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक पातळीवर मोठे बदल घडत होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, औद्योगिकीकरण, शिक्षणाचा प्रसार, शहरीकरण, दलित चळवळी, स्त्रीवादी विचार आणि जागतिकीकरण यांचा परिणाम मराठी समाजमनावर होत होता. या बदलांचे प्रतिबिंब साहित्यामध्ये उमटले. नवकथा, नवकविता, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य आणि लघुनियतकालिकांची चळवळ असे अनेक प्रवाह या काळात निर्माण झाले. मात्र हे प्रवाह केवळ लेखकांच्या व्यक्तिगत प्रतिभेमुळे निर्माण झाले नाहीत. त्यामागे दूरदृष्टी असलेले प्रकाशक, विचारवंत संपादक आणि ध्येयवादी नियतकालिकांचे मोठे योगदान होते.
या काळातील प्रकाशन संस्था आणि संपादक हे केवळ पुस्तके छापणारे व्यावसायिक नव्हते. ते साहित्यिक संस्कृतीचे निर्माते होते. त्यांनी नवोदित लेखकांना संधी दिली, वाचकांची अभिरुची घडवली, नव्या विचारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि मराठी साहित्याला आधुनिकतेची दिशा दिली. अनेक वेळा त्यांनी आर्थिक अडचणी, सामाजिक विरोध आणि मर्यादित साधने यांचा सामना करत साहित्यसेवा सुरू ठेवली.
मौज प्रकाशन
या काळातील सर्वात प्रभावशाली प्रकाशन संस्था म्हणजे ‘मौज प्रकाशन’. श्री. पु. भागवत यांच्या नेतृत्वाखाली मौजने मराठी साहित्यात उच्च दर्जाची भाषिक आणि कलात्मक अभिरुची निर्माण केली. ‘सत्यकथा’ हे मासिक नवकथा आणि नवकवितेचे प्रभावी व्यासपीठ बनले.
श्री. पु. भागवत (१९२३-२००७) हे अत्यंत काटेकोर संपादक होते. लेखकाच्या लेखनातील सूक्ष्म बारकावे ओळखून त्यावर ते मेहनत घेत. त्यांच्या संपादनामुळे मराठी गद्याला एक विशिष्ट सौंदर्य आणि नेमकेपणा प्राप्त झाला. काही समीक्षकांनी त्यांच्या संपादनशैलीवर लेखकाच्या अभिव्यक्तीत हस्तक्षेप केल्याचा आरोप केला; तरीही मराठी साहित्यात भाषिक परिपूर्णतेचा जो मानदंड तयार झाला, त्यामागे मौजचे योगदान अत्यंत मोठे आहे. मौज प्रकाशनाच्या मराठी साहित्यातील योगदानात श्री. पु. भागवत यांचे सहकारी राम पटवर्धन यांचाही मोठा वाट आहे.
मौज प्रकाशनने प्रकाशित केलेल्या अनेक पुस्तकांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाले. या पुरस्कारप्राप्त पुस्तकांमध्ये बा. सी. मर्ढेकर यांचा ‘सौंदर्य आणि साहित्य’ (१९५६), श्री. ना. पेंडसे यांची ‘रथचक्र’ (१९६३), पु. ल. देशपांडे यांचे ‘व्यक्ती आणि वल्ली’ (१९६५), दुर्गा भागवत यांचे ‘पैस’ (१९७१), गोदावरी परुळेकर यांचे ‘जेव्हा माणूस जागा होतो’ (१९७२), आत्माराम रावजी देशपांडे यांचा ‘दशपदी’ (१९७७), चिं. त्र्यं. खानोलकर यांचे ‘नक्षत्रांचे देणे’ (१९७८), मंगेश पाडगावकर यांचे ‘सलाम’ (१९८०), आणि महेश एलकुंचवार यांचे ‘युगान्त’ (२००२) यांसारख्या उल्लेखनीय साहित्यकृतींचा समावेश होतो. याशिवाय अनेक दिग्गज लेखकांचे मौलिक लेखन मौजने या काळात प्रकाशित केले.
पॉप्युलर प्रकाशन
‘पॉप्युलर प्रकाशन’नेही मराठी वाचनसंस्कृती घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. लोकप्रिय, वाचनीय आणि दर्जेदार साहित्य मोठ्या प्रमाणावर वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या संस्थेने केले. मौज आणि पॉप्युलर यांनी मिळून मराठी साहित्यात मध्यमवर्गीय अभिरुचीचा एक प्रभावी मानदंड निर्माण केला. या संस्थांमुळे पुस्तक हे केवळ अभ्यासाचे साधन न राहता घराघरात पोहोचणारे सांस्कृतिक माध्यम बनले. वाचन हा मध्यमवर्गीय जीवनशैलीचा भाग झाला. कथासंग्रह, कादंबऱ्या, विनोदी साहित्य, वैचारिक पुस्तके आणि चरित्रग्रंथ मोठ्या प्रमाणावर प्रकाशित होऊ लागले.
मराठी प्रकाशनविश्वात पॉप्युलर प्रकाशन आणि त्याचे प्रमुख प्रेरणास्थान रामदास भटकळ यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. रामदास भटकळ यांनी प्रकाशन व्यवसायाकडे केवळ व्यापारी दृष्टीने न पाहता, तो सामाजिक आणि वैचारिक जबाबदारी म्हणून पाहिला. दर्जेदार साहित्य, वैचारिक पुस्तके, समाजशास्त्र, विज्ञान, इतिहास, चरित्रे आणि अनुवादित साहित्य सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे कार्य त्यांनी केले. नवोदित लेखकांना संधी देणे, पुस्तकनिर्मितीत गुणवत्ता राखणे आणि मराठी वाचकांची अभिरुची व्यापक करणे ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये होती. मराठीसह इंग्रजी प्रकाशन क्षेत्रातही त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली. ‘पॉप्युलर प्रकाशन’मुळे अनेक महत्त्वाचे लेखक आणि विचारप्रवाह व्यापक समाजापर्यंत पोहोचले. त्यामुळे रामदास भटकळ हे केवळ प्रकाशक न राहता मराठी साहित्य-संस्कृतीचे संवेदनशील वाहक आणि आधुनिक प्रकाशन संस्कृतीचे महत्त्वाचे शिल्पकार ठरले.
पॉप्युलर प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या अनेक पुस्तकांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाले. या पुरस्कारप्राप्त पुस्तकांमध्ये इंदिरा संत यांचे ‘गर्भरेशीम’ (१९८४), विश्राम बेडेकर यांचे ‘एक झाड आणि दोन पक्षी’ (१९८५), एकूण कविता - १ (काव्यसंग्रह) - दिलीप चित्रे (१९९४), एका मुंगीचे महाभारत (आत्मचरित्र) - गंगाधर गाडगीळ (१९९६), उत्सुकतेने मी झोपलो (कादंबरी) - श्याम मनोहर (२००८) यांचा समावेश होतो. साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेल्या या पुस्तकांव्यतिरिक्त, भालचंद्र नेमाडे यांची अजरामर ठरलेली 'कोसला' कादंबरी, विजय तेंडुलकर यांची अनेक प्रख्यात नाटके, तसेच विंदा करंदीकर, नारायण सुर्वे आणि दलित साहित्यातील अनेक महत्त्वाच्या लेखकांची काव्यसंग्रह आणि पुस्तके प्रकाशित करून पॉप्युलर प्रकाशनाने मराठी साहित्यात एक स्वतंत्र आणि प्रगल्भ ओळख निर्माण केली आहे.
राजहंस प्रकाशन
राजहंस प्रकाशनाने मराठी प्रकाशन व्यवसायाला आधुनिक आणि व्यावसायिक स्वरूप दिले. श्री.ग. माजगावकर, दिलीप माजगावकर आणि डॉ. सदानंद बोरसे यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेने दर्जेदार वैचारिक, ऐतिहासिक आणि अनुवादित साहित्य प्रकाशित केले. ‘मंडेला’, ‘भगतसिंगचा खटला’ आणि ‘रोश विरुद्ध ॲडॅम्स’ यांसारखी जागतिक पातळीवरील पुस्तके मराठीत आणून त्यांनी वाचकांचे वैचारिक क्षितिज विस्तारले. राजहंसच्या ‘सिनेमाची गोष्ट’ या पुस्तकासाठी १९९३ साली राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. राजहंस प्रकाशनाच्या विश्वास पाटील यांच्या ‘झाडाझडती’ (कादंबरी, १९९२) याला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. या पुरस्कारप्राप्त पुस्तकाव्यतिरिक्तही राजहंस प्रकाशनने मराठी साहित्यात मोठे योगदान दिले आहे. विश्वास पाटील यांच्या ‘पानिपत’ आणि ‘महानायक’ यांसारख्या महाकादंबऱ्या, सामाजिक लेखन, लोकप्रिय प्रवासवर्णने व्यापक वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य या प्रकाशन संस्थेने केले.
मॅजेस्टिक प्रकाशन
मॅजेस्टिक प्रकाशन आणि कोठावळे कुटुंबाचे मराठी साहित्यातील योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. केशवराव कोठावळे यांनी लेखकांशी आत्मीय संबंध जपले. लेखकांवर विश्वास ठेवणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे ही मॅजेस्टिकची ओळख बनली. त्यांचे सुपुत्र अशोक कोठावळे यांनीही ही परंपरा पुढे चालवली.
‘मॅजेस्टिक गप्पा’ हा मराठी साहित्यविश्वातील महत्त्वाचा सांस्कृतिक उपक्रम ठरला. इंटरनेटपूर्व काळात वाचकांना लेखकांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी यातून मिळाली. गिरगावातील साहित्य संघ मंदिरातील या गप्पांनी साहित्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले. १९६४ मध्ये सुरू झालेले ‘ललित’ मासिकही विशेष गाजले. साहित्यचर्चा, पुस्तकपरिचय आणि वैचारिक लेखांमुळे ते लोकप्रिय झाले. दर्जेदार साहित्य लोकप्रिय होऊ शकते, हे ‘ललित’ने सिद्ध केले. मॅजेस्टिकचे सामाजिक भानही उल्लेखनीय होते. समाजप्रबोधन करणाऱ्या साहित्याला त्यांनी प्राधान्य दिले. केशवराव कोठावळे पुरस्कार आजही प्रतिष्ठेचा मानला जातो.
मेहता पब्लिशिंग हाऊस
अनिल मेहता यांनी स्थापन केलेल्या ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने मराठी प्रकाशनाला जागतिक आयाम दिला. बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड आणि जागतिक साहित्याचे मोठ्या प्रमाणावर मराठीत अनुवाद करण्यात आले. वि. स. खांडेकर, शिवाजी सावंत, रणजित देसाई, व. पु. काळे, विश्वास पाटील आणि राजन गवस यांसारख्या लेखकांचे साहित्य मोठ्या प्रमाणावर प्रकाशित झाले. या संस्थेने ई-बुक्स आणि डिजिटल प्रकाशनाची सुरुवात करून मराठी प्रकाशनाला तांत्रिक आधुनिकतेची दिशा दिली.
मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या अनेक पुस्तकांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले. त्यात झोंबी - आनंद यादव (१९९०), यांचा समावेश होतो. ययाति - वि. स. खांडेकर (१९६०), स्वामी - रणजित देसाई (१९६४) इत्यादी. वि. स. खांडेकर आणि रणजित देसाई यांच्या साहित्यासह व. पु. काळे यांच्याही संपूर्ण साहित्याचे अधिकृत प्रकाशन आणि वितरण 'मेहता पब्लिशिंग हाऊस'तर्फेच केले जाते.
ग्रंथाली
‘ग्रंथाली’ ही संस्था मराठी साहित्यविश्वातील एक वेगळी आणि महत्त्वाची चळवळ ठरली. दिनकर गांगल आणि अशोक जैन यांनी सुरू केलेल्या या संस्थेने “वाचक चळवळ” उभी केली. पुस्तक फक्त दुकानात विकण्याऐवजी ते थेट वाचकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रस्थापित चौकटीबाहेरील साहित्यकृतींना ग्रंथालीने मोठे व्यासपीठ दिले. ग्रामीण, दलित आणि उपेक्षित समाजाचे वास्तव मुख्य प्रवाहात आणण्याचे धाडस या संस्थेने केले. ‘रुची’ मासिकाद्वारे वैचारिक चर्चांनाही चालना मिळाली. ग्रंथालीमुळे साहित्य आणि समाज यांच्यातील संबंध अधिक मजबूत झाले. लेखक आणि वाचक यांच्यातील अंतर कमी झाले.
ग्रंथालीच्या प्रकाशनाची सुरुवातच मुळी दुर्गा भागवत यांच्या ‘डूब’(१९७५) या गाजलेल्या निबंधसंग्रहापासून झाली. याशिवाय अरुण साधू यांचे ‘सिंहासन’, दया पवार यांचे ‘बलुतं’ (१९७८) हे आत्मकथन, अरुण लिमये यांचे ‘क्लोरोफॉर्म’ (१९७८) आणि ग्रंथालीने प्रकाशित केलेली इतर अनेक पुस्तके यांनी मराठी साहित्य अधिक समृद्ध केले. ग्रंथालीने प्रकाशित केलेले ‘उपरा’ (१९८०) हे मराठी दलित आणि उपेक्षित साहित्याच्या प्रवाहातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानले जाते. लक्ष्मण माने यांच्या या आत्मकथनाला १९८१ साली प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. या पुस्तकांनी समाजातील उपेक्षित घटकांचे वास्तव प्रभावीपणे साहित्याच्या केंद्रस्थानी आणले. या शिवाय डॉ. नरेंद्र जाधव लिखित ‘आमचा बाप आन् आम्ही’ (१९९३), डॉ. किशोर काळे लिखित कोल्हाट्याचं पोर’ (१९९४) ही ग्रंथालीने प्रकाशित केलेली पुस्तके खूप गाजली.
नियतकालिकांची परंपरा
१९५० ते २००० या कालखंडात मराठी साहित्य आणि सामाजिक विचारविश्व घडवण्यात नियतकालिकांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. ही नियतकालिके केवळ साहित्य प्रकाशित करणारी माध्यमे नव्हती, तर ती सामाजिक परिवर्तन, वैचारिक जागृती आणि नव्या चळवळींची प्रभावी व्यासपीठे होती. दलित साहित्य, स्त्रीवादी विचार, पुरोगामी सामाजिक चळवळी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांना व्यापक समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केले. अनेक नवोदित लेखक, विचारवंत आणि कार्यकर्त्यांना या नियतकालिकांमुळे अभिव्यक्तीची संधी मिळाली. ‘अस्मितादर्श’, ‘स्त्री’, ‘मिळून साऱ्याजणी’ आणि ‘साधना’ यांसारख्या नियतकालिकांनी मराठी साहित्य आणि समाजजीवनात वैचारिक परिवर्तनाची नवी दिशा निर्माण केली.
‘हंस’, ‘मोहिनी’ आणि ‘नवल’
अनंत अंतरकर यांनी संपादित केलेली ‘हंस’, ‘मोहिनी’ आणि ‘नवल’ ही मासिके मराठी कथासाहित्यातील प्रयोगशीलतेची केंद्रे ठरली. त्यांनी अद्भुत, रहस्य, विनोदी आणि कल्पनारम्य साहित्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. या मासिकांनी वाचकांच्या कल्पनाशक्तीला चालना दिली. साहित्य हे केवळ वास्तववादी असावे, या मर्यादित दृष्टिकोनापलीकडे जाऊन त्यांनी मनोरंजन आणि कलात्मकता यांचा सुंदर संगम साधला. अनंत अंतरकर हे मराठीतील संवेदनशील संपादक, कथालेखक आणि साहित्यप्रेमी म्हणून ओळखले जातात. त्यांनी विशेषतः नियतकालिकांच्या माध्यमातून मराठी साहित्यविश्वात महत्त्वाचे योगदान दिले. मराठी कथासाहित्यातील अनेक महत्त्वाचे लेखक आणि प्रवाह वाचकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र आनंद अंतरकर यांनी त्यांची परंपरा पुढे चालू ठेवली.
स्त्री आणि ‘मिळून साऱ्याजणी’
मराठी साहित्याच्या १९५०-२००० या कालखंडातील विकासाचे मूल्यमापन करताना स्त्रीवादी साहित्याचा आणि त्यामागील संस्थात्मक व संपादकीय प्रयत्नांचा विचार करणे अनिवार्य आहे. या क्षेत्रात 'स्त्री' मासिक, 'मिळून साऱ्याजणी' आणि त्यांच्या संपादिका विद्या बाळ यांचे कार्य युगप्रवर्तक मानले जाते.
विद्या बाळ यांनी मराठी साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात स्त्रीवादी विचार प्रभावीपणे मांडले. लेखिका, संपादक आणि कार्यकर्त्या म्हणून त्यांनी स्त्रियांचे प्रश्न सार्वजनिक चर्चेत आणले. त्यांनी शिक्षण, विवाहसंस्था, कौटुंबिक हिंसा, लैंगिक विषमता, आर्थिक स्वावलंबन आणि स्त्रीचे आत्मभान यांसारख्या विषयांवर स्पष्ट व परखड लेखन केले. त्यांच्या लिखाणात आक्रमकतेपेक्षा संवाद आणि विधायक सामाजिक परिवर्तनावर भर दिसतो. विद्या बाळ यांनी स्त्रीवादी विचार सामाजिक वास्तवाशी जोडून मराठी साहित्य-संस्कृतीत महत्त्वपूर्ण वैचारिक परिवर्तन घडवले.
साधना साप्ताहिक
‘साधना’ हे महाराष्ट्राच्या वैचारिक आणि सामाजिक जीवनातील एक महत्त्वाचे साप्ताहिक मानले जाते. साने गुरुजी यांनी १५ ऑगस्ट १९४८ रोजी ‘साधना’ची स्थापना केली. पुरोगामी, लोकशाहीवादी आणि सुधारणावादी विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य या साप्ताहिकाने सातत्याने केले आहे. साने गुरुजींनंतर अनेक प्रगल्भ विचारवंतांनी या साप्ताहिकाचे संपादन केले. रावसाहेब पटवर्धन, यदुनाथ थत्ते, वसंत बापट, ग. प्र. प्रधान आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ‘साधना’ला वैचारिक बळ दिले.
विशेषतः यदुनाथ थत्ते यांच्या संपादकत्वाच्या काळात हे साप्ताहिक जनमानसात अत्यंत लोकप्रिय झाले. त्यांनी अनेक नव्या लेखकांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. वसंत बापट आणि ग. प्र. प्रधान यांनी या काळात ती परंपरा पुढे चालू ठेवली. महाराष्ट्रातील अनेक सामाजिक चळवळींना ‘साधना’ने वैचारिक पाठबळ दिले आहे.
अस्मितादर्शन
दलित साहित्याच्या उदयामध्ये संपादक आणि नियतकालिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. डॉ. गंगाधर पानतावणे यांनी संपादित केलेले ‘अस्मितादर्श’ हे मासिक दलित साहित्याचे प्रभावी व्यासपीठ ठरले. दलित समाजाचे दुःख, अपमान, संघर्ष आणि विद्रोह प्रथमच इतक्या ताकदीने मराठी साहित्यात व्यक्त झाले. या साहित्याने मराठी साहित्यविश्वाला हादरा दिला. बाबुराव बागुल, नामदेव ढसाळ, दया पवार, लक्ष्मण माने आणि शरणकुमार लिंबाळे यांसारख्या लेखकांना व्यापक ओळख मिळाली. संपादकांनी केवळ साहित्य प्रकाशित केले नाही, तर एका सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला दिशा दिली.
दिवाळी अंकांची परंपरा
या काळातील मराठी साहित्याच्या विकासात दिवाळी अंकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे. दिवाळी अंक ही केवळ प्रकाशनाची परंपरा नव्हती, तर ती मराठी संस्कृतीचे एक वैशिष्ट्यपूर्ण रूप बनली. अनेक नवोदित लेखकांना आपले पहिले व्यासपीठ दिवाळी अंकांतून मिळाले. त्यामुळे नव्या साहित्यप्रवाहांना आणि नव्या लेखनशैलींना चालना मिळाली. कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, विनोदी लेखन, मुलाखती, संशोधनपर लेख आणि आकर्षक कलात्मक मांडणी यांमुळे दिवाळी अंक वाचकांच्या उत्सवाचा अविभाज्य भाग बनले. दर्जेदार साहित्याची निवड, विषयवैविध्य आणि देखणी मांडणी यांमुळे या परंपरेला अनेक संपादकांनी समृद्ध केले.
या काळात विविध प्रकारचे दिवाळी अंक लोकप्रिय झाले. ‘मौज’, ‘सत्यकथा’, ‘ललित’ आणि ‘साधना’ यांसारखे वैचारिक दिवाळी अंक वाचकांमध्ये विशेष मानाचे होते. ‘आवाज’ आणि ‘जत्रा’ हे विनोदी दिवाळी अंक लोकप्रिय होते. तर ‘धनंजय’ आणि ‘नाविक’ यांनी रहस्यकथांच्या दिवाळी अंकांची स्वतंत्र परंपरा निर्माण केली. ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘मेनका’ आणि ‘मोहिनी’ यांसारख्या कौटुंबिक दिवाळी अंकांनाही मोठी लोकप्रियता मिळाली. या सर्व दिवाळी अंकांनी मराठी वाचनसंस्कृती अधिक समृद्ध आणि वैविध्यपूर्ण केली.
समारोप
१९५० ते २००० हा काळ मराठी साहित्याच्या इतिहासातील परिवर्तनाचा आणि वैचारिक विस्ताराचा महत्त्वपूर्ण कालखंड ठरला. या काळात साहित्याचे आशय, अभिव्यक्ती आणि सामाजिक भान यांमध्ये मोठे बदल घडले. नवकथा, दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य, ग्रामीण साहित्य, लघुनियतकालिकांची चळवळ आणि वैचारिक लेखन अशा अनेक प्रवाहांनी मराठी साहित्य अधिक व्यापक आणि बहुआयामी केले. मात्र या परिवर्तनामागे केवळ लेखकांची प्रतिभा नव्हती; त्यामागे दूरदृष्टी असलेले प्रकाशक, विचारशील संपादक आणि ध्येयवादी नियतकालिकांचेही मोठे योगदान होते.
या काळातील प्रकाशन संस्था आणि नियतकालिकांनी साहित्याला केवळ व्यासपीठ दिले नाही, तर नव्या विचारांचे स्वागत करून समाजातील बदलत्या वास्तवाला अभिव्यक्ती दिली. त्यांनी नवोदित लेखकांना संधी दिली, वाचकांची अभिरुची घडवली आणि साहित्य समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचवले. अनेक संपादकांनी साहित्याला सामाजिक जबाबदारीची जाणीव दिली. त्यामुळे मराठी साहित्य अधिक लोकाभिमुख, चिकित्सक आणि सामाजिकदृष्ट्या सजग बनले.
मौज, पॉप्युलर, राजहंस, मॅजेस्टिक, मेहता पब्लिशिंग हाऊस आणि ग्रंथाली यांसारख्या संस्थांनी मराठी प्रकाशनविश्वाला नवे परिमाण दिले. ‘सत्यकथा’, ‘अस्मितादर्श’, ‘साधना’, ‘मिळून साऱ्याजणी’ आणि लघुनियतकालिकांनी वैचारिक चळवळींना दिशा दिली. दिवाळी अंकांनी वाचनसंस्कृती अधिक समृद्ध केली. या सर्वांनी मिळून मराठी साहित्याभोवती एक सशक्त सांस्कृतिक परिसंस्था निर्माण केली.
श्री. पु. भागवत, रामदास भटकळ, अनंत अंतरकर, डॉ. गंगाधर पानतावणे, दिनकर गांगल, दिलीप माजगावकर, विद्या बाळ आणि इतर अनेक ध्येयवेड्या व्यक्तींनी मराठी साहित्याला केवळ पुस्तके दिली नाहीत; त्यांनी विचार, संवाद आणि सामाजिक परिवर्तनाची परंपरा निर्माण केली. आजच्या डिजिटल युगातही मराठी साहित्य ज्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे, त्यामागे या संपादक, प्रकाशक आणि नियतकालिकांनी घातलेला भक्कम पाया आहे.