समाजभान (१५ ते १६)
१९५० ते २०००
१९५० ते २००० या कालखंडात महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तनाच्या अनेक महत्त्वपूर्ण चळवळी आणि प्रयोग उभे राहिले. स्वातंत्र्यानंतर ग्रामीण दारिद्र्य, दुष्काळ, अशिक्षण, अंधश्रद्धा, जातीय विषमता, आदिवासींची उपेक्षा आणि आरोग्याच्या समस्या समाजासमोर गंभीर स्वरूपात उभ्या होत्या. या प्रश्नांवर केवळ शासनाच्या योजनांनी उत्तर मिळणार नाही, तर लोकसहभाग, संवेदनशील नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकी यांचीही गरज आहे, ही जाणीव अनेक कार्यकर्त्यांना झाली. या जाणिवेतून महाराष्ट्रात विविध क्षेत्रांत अनेक अभिनव प्रयोग उभे राहिले.
महाराष्ट्रातील या सामाजिक कार्यामागे एक मोठी वैचारिक आणि मानवतावादी परंपरा होती. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रात समाजभान, समता आणि परिवर्तनाची जी परंपरा निर्माण केली, त्यातूनच पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळाली. समाजातील दुःख आणि विषमता पाहून अस्वस्थ होणे आणि त्यावर प्रत्यक्ष कृती करणे, ही वृत्ती महाराष्ट्रात मजबूत झाली. या कार्यकर्त्यांनी शासनाकडे केवळ मागण्या करण्याचा मार्ग स्वीकारला नाही; तर स्वतः लोकांमध्ये उतरून, लोकांना सोबत घेऊन आणि स्वतः श्रम करून परिवर्तन घडवण्याचा मार्ग स्वीकारला. श्रमदान, स्वावलंबन, लोकसहभाग आणि निस्वार्थ सेवा ही या चळवळींची खरी ताकद होती.
नानाजी देशमुख, अण्णा हजारे, पोपटराव पवार, बाबा आमटे, डॉ. अभय बंग, डॉ. नरेंद्र दाभोळकर, डॉ. बाबा आढाव, ताराबाई मोडक, डॉ. श्रीनाथ कलबाग अशा अनेक व्यक्तींनी आपल्या कार्यातून समाजपरिवर्तनाचे नवे आदर्श निर्माण केले. काहींनी जलसंधारण आणि ग्रामविकासातून गावे स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी शिक्षण, आरोग्य, व्यसनमुक्ती, आदिवासी विकास आणि सामाजिक समता यांसाठी आयुष्य वेचले. या प्रयोगांचे वैशिष्ट्य म्हणजे लोकसहभाग, श्रमदान, स्वावलंबन आणि मानवतावादी दृष्टिकोन. या चळवळींनी केवळ समस्या सोडवल्या नाहीत, तर समाजाला विचारांची नवी दिशा दिली. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात या प्रयोगांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानावे लागेल.
महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तन चळवळींचा विचार केला, तर त्यांचा आढावा पुढील पाच प्रमुख प्रवाहांत घेता येतो — १. ग्रामविकास, २. शिक्षण आणि तंत्रज्ञान, ३. आरोग्य आणि पुनर्वसन, ४. आदिवासी विकास आणि ५. सामाजिक प्रबोधन व समता. या सर्व चळवळींनी महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाला नवी दिशा दिली. विषयाचा व्यापक आवाका लक्षात घेऊन हा लेख दोन भागांत विभागला आहे. पहिल्या भागात ग्रामविकास तसेच शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रयोग व चळवळींचा आढावा घेतला आहे. तर दुसऱ्या भागात आरोग्य व पुनर्वसन, आदिवासी विकास तसेच सामाजिक प्रबोधन आणि समता या क्षेत्रांतील कार्याचा वेध घेतला आहे.
ग्रामविकास
महाराष्ट्रातील ग्रामविकासाच्या चळवळींमध्ये जलसंधारणाला केंद्रस्थानी ठेवून अनेक महत्त्वाचे प्रयोग उभे राहिले. दुष्काळ, पाणीटंचाई, शेतीची अधोगती आणि ग्रामीण बेरोजगारी या गंभीर समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न या प्रकल्पांतून करण्यात आला. पाणी अडवणे, जमिनीत जिरवणे, शेती सुधारणा करणे आणि गावांना स्वावलंबी बनवणे हा या प्रयोगांचा मुख्य उद्देश होता. लोकसहभाग, श्रमदान आणि सामूहिक जबाबदारी यांच्या बळावर ग्रामीण विकासाचा नवा आदर्श या चळवळींनी निर्माण केला.
नानाजी देशमुख यांचा बीड ग्रामीण विकास प्रकल्प, विलासराव साळुंखे यांची पाणी पंचायत, अण्णा हजारे यांचे राळेगण सिद्धी आणि पोपटराव पवार यांचे हिवरे बाजार हे त्यातील विशेष उल्लेखनीय प्रयोग मानले जातात.
बीड प्रकल्प:
नानाजी देशमुख (१९१६-२०१०) हे भारतातील एक दूरदृष्टीचे सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत नेते होते. सक्रिय राजकारणातून स्वतःहून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य ग्रामीण विकासासाठी अर्पण केले. “गावे स्वयंपूर्ण झाली तरच देशाचा खरा विकास होईल,” हा त्यांचा ठाम विश्वास होता. या विचारातून त्यांनी दीनदयाल शोध संस्थान या संस्थेची स्थापना केली. उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात यशस्वी प्रयोग उभा केल्यानंतर १९८४ मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याची पुढील कार्यक्षेत्र म्हणून निवड केली.
त्या काळात बीड हा मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त आणि मागास जिल्हा मानला जात होता. पावसाचे अत्यल्प प्रमाण, पाण्याची तीव्र टंचाई, शेतीतील अनिश्चितता आणि रोजगाराच्या अभावामुळे अनेकांना स्थलांतर करावे लागत असे. या समस्यांवर तात्पुरते नव्हे, तर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा नानाजींनी निर्धार केला आणि लोकसहभागाच्या बळावर गावांचा विकास घडवून आणला.
या प्रकल्पात जलसंधारणाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले. पाटोदा तालुक्यातील सोंदरा तलावातील गाळ काढण्यासाठी “धन्यता अभियान” राबवण्यात आले. शेकडो तरुणांनी श्रमदानातून यात सहभाग घेतला. तलावातील सुपीक गाळ शेतात टाकल्यामुळे पाणीसाठवण क्षमता आणि जमिनीची सुपीकता दोन्ही वाढली. १९९२ मध्ये आंबेजोगाई येथे कृषी विज्ञान केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, सुधारित बियाणे, सेंद्रिय शेती आणि पूरक व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे शेती उत्पादन आणि उत्पन्न वाढले. तरुणांना स्वावलंबी करण्यासाठी ‘उद्यमीत विद्यापीठ’ स्थापन करून जन शिक्षण संस्थान सुरू करण्यात आले. शिवणकाम, लघुउद्योग आणि विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. महिलांसाठी योग शिबिरे आणि मुलांसाठी संस्कार शिबिरेही आयोजित करण्यात आली.
या सर्व प्रयत्नांमुळे बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात सकारात्मक बदल घडून आला. लोकसहभाग, श्रमदान आणि योग्य नियोजन यांच्या साहाय्याने दुष्काळावर मात करता येते, हे या प्रकल्पाने सिद्ध केले. नानाजी देशमुख यांना पद्मविभूषण (१९९९) आणि मरणोत्तर भारतरत्न (२०१९) प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
पाणी पंचायत:
विलासराव साळुंखे (१९३७-२००२) यांनी महाराष्ट्रातील जलव्यवस्थापनाला नवी दिशा दिली. १९७२ च्या भीषण दुष्काळानंतर त्यांनी पुणे जिल्ह्यातील नायगाव येथे १९७४ मध्ये “पाणी पंचायत” हा अभिनव प्रयोग सुरू केला. पावसाचे पाणी ही संपूर्ण गावाची सामूहिक संपत्ती आहे आणि त्यावर सर्वांचा समान हक्क असला पाहिजे, हा या प्रयोगाचा मुख्य विचार होता.
या कामासाठी त्यांनी ग्राम गौरव प्रतिष्ठान स्थापन केले. पाण्याचे वाटप जमिनीच्या आकारावर नव्हे, तर कुटुंबातील व्यक्तीसंख्येवर आधारित करण्यात आले. प्रत्येक व्यक्तीमागे अर्धा एकरासाठी पुरेल एवढेच पाणी देण्याची मर्यादा ठेवण्यात आली. भूमिहीन कुटुंबांनाही पाण्यावर समान हक्क देण्यात आला. ऊस आणि केळी यांसारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकांवर बंदी घालून कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्रोत्साहन देण्यात आले. गावकऱ्यांच्या श्रमदानातून छोटे तलाव बांधण्यात आले आणि पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवण्यात आले. त्यामुळे नायगावमध्ये शेती सुधारली, उत्पादन वाढले आणि स्थलांतर थांबले.
या प्रयोगाने लोकसहभागातून दुष्काळावर मात करता येते, हे सिद्ध केले. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना जमनालाल बजाज पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राळेगण सिद्धी ग्रामविकास:
अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली राळेगण सिद्धी हे गाव आदर्श ग्रामविकासाचे प्रतीक बनले. अहमदनगर जिल्ह्यातील हे गाव एकेकाळी दुष्काळ, गरिबी आणि व्यसनाधीनतेने त्रस्त होते. पाणीटंचाईमुळे शेती कोरडी राहत होती आणि गावात बेरोजगारी वाढली होती.
लष्करातून निवृत्त झाल्यानंतर अण्णा हजारे यांनी १९८० च्या दशकात गावाच्या विकासासाठी काम सुरू केले. त्यांनी “पंचसूत्री” राबवली. त्यात दारूबंदी, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, कुटुंब नियोजन आणि श्रमदान या नियमांचा समावेश होता. लोकांच्या श्रमदानातून नाल्यांवर बांध घालण्यात आले, चर खणण्यात आले आणि मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. पावसाचा प्रत्येक थेंब अडवून जमिनीत मुरवण्याचा प्रयत्न झाला.
या उपायांमुळे पाण्याची पातळी वाढली आणि शेतीत मोठा बदल घडला. शेतकरी वर्षातून दोन-तीन पिके घेऊ लागले. दुग्धव्यवसाय वाढला आणि गावाची आर्थिक स्थिती सुधारली. शिक्षण, बँकिंग आणि सौर ऊर्जेच्या सुविधा उपलब्ध झाल्या. व्यसनाधीनता, गुन्हेगारी आणि गरिबी यांवरही नियंत्रण मिळाले. आण्णा हजारे यांनी गावात अभिनव शिक्षणाच्या सोइ निर्माण केल्या.
लोकसहभाग, शिस्त आणि स्वावलंबन यांच्या बळावर दुष्काळ आणि गरिबीवर मात करता येते, हे अण्णा हजारे यांनी सिद्ध करून दाखवले. त्यांच्या कार्यासाठी भारत सरकारने पद्मभूषण (१९९२) पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.
हिवरे बाजार ग्रामविकास:
अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार हे गाव पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली आदर्श ग्रामविकासाचे प्रतीक बनले. एकेकाळी दुष्काळ, गरिबी आणि बेरोजगारीने त्रस्त असलेल्या या गावाने लोकसहभाग, जलसंधारण आणि शिस्तबद्ध नियोजन यांच्या बळावर मोठे परिवर्तन घडवून आणले.
१९८९ पूर्वी गावात पाणीटंचाई, बेरोजगारी आणि व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात होती. अनेक लोक रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतर करत होते. सरपंच झाल्यानंतर पोपटराव पवार यांनी ग्रामसभेच्या माध्यमातून गावकऱ्यांना एकत्र आणले. अण्णा हजारे यांच्या प्रेरणेने त्यांनी दारूबंदी, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी आणि श्रमदान यांसारखे नियम लागू करण्यात आले.
गावाच्या विकासात जलसंधारणाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले. डोंगर उतारांवर चर खणणे, नाल्यांवर बांध घालणे आणि वृक्षलागवड अशी कामे श्रमदानातून करण्यात आली. जास्त पाणी लागणाऱ्या पिकांवर निर्बंध आणण्यात आले आणि कूपनलिका खोदण्यावर बंदी घालण्यात आली. या उपायांमुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली आणि शेती पुन्हा सक्षम झाली.
शेती, दुग्धव्यवसाय आणि रोजगाराच्या संधी वाढल्यामुळे गावाची अर्थव्यवस्था सुधारली. विशेष म्हणजे, रोजगारासाठी शहरांकडे गेलेले अनेक लोक पुन्हा गावात परतले. आज हिवरे बाजार हे देशातील सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेल्या गावांपैकी एक मानले जाते. स्वावलंबन, लोकसहभाग आणि शाश्वत विकास यांचा आदर्श या गावाने घालून दिला. त्यांच्या या कार्यासाठी भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने पोपटराव पवार यांचा गौरव केला.
शिक्षण आणि तंत्रज्ञान
शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर व्यक्तीला जीवन जगण्याची क्षमता देणारी प्रक्रिया आहे, हा विचार महाराष्ट्रातील काही शिक्षण प्रयोगांनी प्रभावीपणे मांडला. मुलांना व्यवहारज्ञान, कौशल्य, स्वावलंबन आणि सामाजिक जबाबदारी यांचे शिक्षण देण्याचा प्रयत्न या प्रकल्पांतून करण्यात आला. पारंपरिक घोकंपट्टीच्या शिक्षणपद्धतीला पर्याय म्हणून ‘करून शिकणे’, नेतृत्व विकास आणि जीवनोपयोगी शिक्षण यांवर भर देण्यात आला. विनायकराव पेंडसे यांच्या ज्ञानप्रबोधिनी ने बुद्धिमान विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वगुण विकसित करण्याचे काम केले. डॉ. चित्रा नाईक यांनी अनौपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून शाळाबाह्य मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. तर डॉ. श्रीनाथ कलबाग यांच्या विज्ञान आश्रम ने “करून शिकणे” या पद्धतीतून ग्रामीण मुलांना तांत्रिक कौशल्ये आणि स्वावलंबनाचे शिक्षण दिले. या प्रयोगांनी शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन बनवले.
ज्ञानप्रबोधिनी:
विनायकराव पेंडसे यांना “अप्पा” या नावाने ओळखले जात असे. देशासाठी चारित्र्यवान, कार्यक्षम आणि सामाजिक बांधिलकी असलेले नेतृत्व घडले पाहिजे, या विचारातून त्यांनी १९६२ मध्ये पुण्यात ज्ञानप्रबोधिनी ची स्थापना केली. “सामाजिक बदलासाठी बुद्धिमत्तेला प्रेरणा” हे संस्थेचे मुख्य ध्येय होते.
ज्ञानप्रबोधिनीने प्रज्ञावान विद्यार्थ्यांसाठी विशेष शाळा सुरू करून शिक्षणाला नवी दिशा दिली. येथे केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता शारीरिक क्षमता, नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि व्यक्तिमत्त्व विकास यांवर लक्ष दिले गेले. स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू करून अनेक सक्षम प्रशासकीय अधिकारी घडवण्यात आले.
संस्थेने ग्रामीण भागातही ग्रामविकास, जलसंधारण आणि रोजगारनिर्मितीचे उपक्रम राबवले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी “स्त्री शक्ती प्रबोधन” विभाग सुरू करण्यात आला. महिलांचे बचत गट, व्यावसायिक प्रशिक्षण आणि महिलांसाठी पौरोहित्य प्रशिक्षण असे अभिनव उपक्रम राबवले गेले.
भूकंप, पूर यांसारख्या संकटांच्या काळातही ज्ञानप्रबोधिनीचे कार्यकर्ते मदत आणि पुनर्वसनासाठी पुढे आले. लातूर-उस्मानाबाद भूकंपानंतर हरळी येथे संस्थेने महत्त्वाचे पुनर्वसन कार्य केले.
ज्ञानप्रबोधिनीच्या कार्यातून महाराष्ट्रात हजारो ध्येयवादी, चारित्र्यवान आणि सामाजिक जाणीव असलेले तरुण घडले. शिक्षण, ग्रामविकास आणि सामाजिक परिवर्तन क्षेत्रातील ही संस्था आजही प्रेरणादायी मानली जाते.
विज्ञान आश्रम, पाबळ:
डॉ. श्रीनाथ कलबाग यांनी १९८३ मध्ये पुणे जिल्ह्यातील पाबळ येथे विज्ञान आश्रम ची स्थापना केली. पारंपरिक शिक्षणात पाठांतराला जास्त महत्त्व दिले जाते, पण व्यवहारातील कौशल्यांचा अभाव राहतो, ही जाणीव त्यांना होती. त्यामुळे त्यांनी “Learning by Doing” म्हणजेच “करून शिकणे” ही अभिनव शिक्षणपद्धती विकसित केली.
विज्ञान आश्रमात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामातून शिक्षण दिले जाते. “मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख” (IBT व DBRT) या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना सुतारकाम, वेल्डिंग, वीजकाम, प्लंबिंग, शेती आणि इतर तांत्रिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे शिक्षणासोबत रोजगारक्षम कौशल्येही विकसित होऊ लागली.
या संस्थेने शाळाबाह्य आणि नापास विद्यार्थ्यांसाठीही नवी संधी उपलब्ध करून दिली. त्यांना तंत्रज्ञान आणि व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवण्यात आले. अनेक युवकांनी आपल्या गावातच छोटे उद्योग आणि सेवा व्यवसाय सुरू केले. विज्ञान आश्रमात ग्रामीण समस्यांवर विज्ञानाच्या मदतीने उपाय शोधण्यावरही भर देण्यात आला. कमी खर्चातील घरे, माती परीक्षण, ठिबक सिंचन आणि शेतीसाठी नवी साधने यांसारखे प्रयोग येथे करण्यात आले. त्यामुळे विज्ञान थेट ग्रामीण जीवनाशी जोडले गेले.
विज्ञान आश्रमाने विकसित केलेला IBT अभ्यासक्रम पुढे महाराष्ट्र शासनाने मान्य केला. आज अनेक शाळांमध्ये हा विषय शिकवला जातो. विज्ञान, शिक्षण आणि ग्रामीण विकास यांची प्रभावी सांगड घालणाऱ्या या कार्यासाठी डॉ. कलबाग यांना जमनालाल बजाज पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ग्रामविकास, शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील या प्रयोगांनी महाराष्ट्रात स्वावलंबन, लोकसहभाग आणि सामाजिक जबाबदारीची नवी जाणीव निर्माण केली. जलसंधारणातून गावे सक्षम झाली, तर शिक्षणाच्या अभिनव पद्धतींमधून नेतृत्वक्षम आणि कौशल्यसंपन्न तरुण घडले. मात्र सामाजिक परिवर्तनाचा हा प्रवास केवळ आर्थिक किंवा शैक्षणिक विकासापुरता मर्यादित नव्हता. समाजातील उपेक्षित, आजारी, व्यसनाधीन, आदिवासी आणि वंचित घटकांपर्यंत माणुसकी, आरोग्य, शिक्षण आणि सन्मान पोहोचवण्याचे मोठे कार्यही या काळात उभे राहिले. त्यामुळे पुढील टप्प्यात आरोग्य, पुनर्वसन, आदिवासी विकास आणि सामाजिक प्रबोधनाच्या चळवळींना विशेष महत्त्व प्राप्त झाले.
पाबळ येथील विज्ञान आश्रम हा प्रयोग डॉ. श्रीनाथ कलबाग यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन या संस्थेच्या प्रेरणेने सुरु केला.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन या संस्थेच्या प्रणेत्या आणि प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. चित्रा नाईक (१९१८–२०१०) यांनी ग्रामीण आणि वंचित मुलांसाठी शिक्षण अधिक व्यवहार्य, कौशल्याधारित आणि जीवनोपयोगी करण्यावर विशेष भर दिला. त्यांच्या या शैक्षणिक दृष्टिकोनातूनच पाबळ येथील विज्ञान आश्रम या उपक्रमाची आखणी करण्यात आली. विज्ञान आश्रमाबरोबरच सेंटर फॉर एज्युकेशनल स्टडीज, ग्रामीण महिला विकासिनी यांसारख्या संस्थाही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या प्रेरणेतून उभ्या राहिल्या. या संस्थांच्या स्थापनेपुरतेच न थांबता, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन त्यांच्यासोबत सातत्याने कार्यरत राहिले. डॉ. चित्रा नाईक यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवले.